मल्टिव्हर्स (Multiverse) आणि सनातन धर्म: हॉलीवूडच्या कल्पनेपलीकडचे 'सत्य'!
नमस्कार मंडळी,
आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो वाचायला आणि समजायला थोडा किचकट वाटू शकेल. पण एक 'सनातनी' म्हणून, हे सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मोह मला आवरता येत नाहीये. जास्त काही फापटपसारा न मांडता, थेट विषयाला हात घालूया.
सनातन हिंदू धर्मातील अनेक कथा आजच्या 'अतिशहाण्या', स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या माणसाला काल्पनिक वाटू शकतात. काल्पनिक वाटण्याचे मुख्य कारण म्हणजे माणूस स्वतःच्या अल्प बुद्धीलाच विज्ञानाची सीमा समजतो. जोपर्यंत एखादी घटना प्रयोगशाळेत सिद्ध होत नाही, तोपर्यंत ती मान्य करणे त्याला कठीण जाते. मुळात सनातन धर्मातील ग्रंथ आणि कथा इतक्या अथांग आणि विस्तृत आहेत की, त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध, त्यांची गुंफण आणि त्यांची विज्ञानाशी असलेली सांगड पाहून आजचे वैज्ञानिकही थक्क होतात.
आजचा आपला विषय आहे मल्टिव्हर्स' (Multiverse), म्हणजेच 'बहुब्रह्मांडवाद'. आपण राहतो ती पृथ्वी, आपली सूर्यमाला आणि आपल्याला दिसणारे आकाश, हे विश्व केवळ एकच आहे का? की अशा अनेक सूर्यमाला, अनेक पृथ्वी आणि अनेक विश्व समांतरपणे (Parallelly) अस्तित्वात आहेत? आजचे विज्ञान यावर केवळ शक्यता वर्तवत आहे, पण आपल्या पुरातन सनातन धर्मात या प्रत्येक गोष्टीची सप्रमाण माहिती हजारो वर्षांपूर्वीच देऊन ठेवली आहे. आपले दुर्दैव हे की, आपल्याच ज्ञानाची चोरी करून परकीय शास्त्रज्ञांनी वेगवेगळे प्रयोग साध्य केले आणि आपण त्यांना टाळ्या वाजवतोय! उदाहरण द्यायचे झाले तर आपले 'ज्योतिष शास्त्र' घ्या. आज 'नासा' (NASA) सारखी संस्था चंद्र-सूर्याची उगवण्याची-मावळण्याची वेळ, ग्रहांची स्थिती आणि ग्रहण यांची माहिती देण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचे संगणक वापरते. पण ही सगळी माहिती केवळ पंचांग बघून आपले सनातनी लोक वर्षानुवर्षे अचूकपणे सांगत आले आहेत. तरीही, जेव्हा आपण अशा सनातन गोष्टींची वैज्ञानिक माहिती सांगतो, तेव्हा आपलेच लोक आपल्यावर हसतात, आपली हेटाळणी करतात!
आजकाल 'ब्रह्मांड' आणि त्यातील अजब गोष्टींवर बनणारे चित्रपट पाहून लोक लेखकांच्या कल्पशक्तीचे कौतुक करतात. तुम्ही 'डॉ. स्ट्रेंज इन द मल्टिव्हर्स ऑफ मॅडनेस' (Dr. Strange in the Multiverse of Madness), 'स्पायडरमॅन: नो वे होम' (Spider-Man: No Way Home), किंवा 'इंटरस्टेलर' (Interstellar) सारखे चित्रपट नक्कीच पाहिले असणार. हे चित्रपट पाहताना त्या जादुई चित्रीकरणाने तुमचंही आणि माझंही तोंड उघडंच राहिलं असेल.
पण मी जर तुम्हाला सांगितलं की, या चित्रपटांपेक्षा जुन्या, हजारो ब्रह्मांड असलेली 'सत्यकथा' आपल्या सनातन धर्मात आधीच आहे, तर तुम्हाला पटेल का? नाही पटणार! पण अश्याच कथा तुमच्यासमोर मांडून सनातन हिंदू धर्माचे महात्म्य सांगण्याचा वसा घेतल्याने, आज अशीच एक गोष्ट तुमच्यासमोर सादर करत आहे.
कथा १: हनुमानाची अंगठी आणि अनंताचे दर्शन
महाशक्तीशाली, चिरंजीवी हनुमान यांचे श्रीरामांवरचे प्रेम तर जगाला ठाऊक आहे. प्रभू श्रीरामाच्या दीर्घायुष्यासाठी माता सीता आपल्या केसात शेंदूर लावायच्या हे पाहून, हनुमानाने आपले संपूर्ण शरीर शेंदूराने माखून घेतले होते, ते केवळ आपल्या आराध्यासाठी. हनुमानजींच्या शक्तीपुढे कोणत्याही देवाची शक्ती तोकडी पडायची; म्हणूनच स्वतः यमराज देखील श्रीरामांचे अवतारकार्य संपल्यावर त्यांना वैकुंठात नेण्यासाठी दरबारात यायला घाबरत होते.
अवतारकार्य संपल्यामुळे श्रीरामांना देहत्याग करायचा होता, पण हनुमान जोपर्यंत सावलीसारखा जवळ आहे, तोपर्यंत यमराज त्यांच्याजवळ येऊ शकत नव्हते. म्हणूनच श्रीरामांनी एक दिवस एक युक्ती केली. हनुमान त्यांना भेटायला येत आहेत हे पाहून, त्यांनी आपल्या बोटातील अंगठी काढली आणि दरबारातल्या जमिनीच्या एका भेगेत फेकून दिली. सूक्ष्म रूप घेऊन ती अंगठी काढून आणण्याची आज्ञा त्यांनी हनुमानाला केली. क्षणार्धात सूक्ष्म अतिसूक्ष्म देह रूपांतर करून हनुमान त्या भेगेत शिरले. पण ती छोटीशी भेग काही संपतच नव्हती. शेवटी, निमुळत्या होत गेलेल्या रस्त्याने जात ते थेट नागलोकात' पोहोचले. तिथे नागलोकाच्या रखवालदाराने हनुमानाला पाहिले आणि तिथे येण्याचे कारण विचारले. हनुमानाने सांगितले की, ते श्रीरामाची हरवलेली अंगठी शोधण्यासाठी तिथे आले आहेत. रखवालदाराच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. त्याने एका चमचमणाऱ्या डोंगराकडे बोट दाखवून, अंगठीचा पत्ता दिला.
हनुमानाने तिकडे झेप घेतली आणि एक अंगठी उचलली. पण काय आश्चर्य! तिथे तश्याच हुबेहूब अनेक अंगठ्या पडून होत्या, ज्याचा एक मोठा डोंगर तयार झाला होता. इतक्या साऱ्या अंगठ्या पाहून हनुमान संभ्रमात पडले की, यातली नेमकी श्रीरामांची अंगठी कोणती? शेवटी न राहवून त्यांनी रखवालदाराला या इतक्या अंगठ्यांचे रहस्य विचारले.
नागलोकाच्या रखवालदाराने स्मित हास्य करत हनुमानाला सांगितले की, "हे पवनपुत्र, तू ज्या ब्रह्मांडातून आला आहेस, तशीच अनेक ब्रह्मांडं अस्तित्वात आहेत. प्रत्येक अवताराच्या अंताच्या वेळी भगवान विष्णू अशीच एक अंगठी भेगेत टाकतात आणि तुला त्याच्यापासून काही काळ दूर करतात. कारण जोअपर्यत तू त्यांच्याबरोबर उभा राहतोस, तोपर्यत खुद्द यमराजदेखील श्रीरामाचा अवतार कार्य पूर्ण झाल्यावर घ्यायला यायला घाबरतात. भगवान विष्णू दरवेळी एक अंगठी फेकून ती शोधण्याची जबाबदारी तुझ्यासारख्या प्रत्येक हनुमानाला देतात. हा अंगठ्याचा डोंगर दुसरा-तिसरा काही नसून वेगवेगळ्या ब्रह्मांडातून टाकलेल्या विष्णूच्या अवतार समाप्तीची घोषणाच आहे."
हनुमानाला हे सत्य समजताच दुःख तर झाले, पण प्रभू श्रीरामाच्या सहवासासाठी केलेल्या बालिश हट्टाची शरम देखील वाटली. पण तरीही हे विश्वसत्य त्यांनी आनंदाने स्वीकारले.
कथा २: रेवतीचे लग्न आणि ब्रह्मदेवाचा वेळ-सिद्धांत (Time Dilation)
मग कशी वाटली आजची मल्टिव्हर्स गोष्ट? निश्चितच बहुतांश हिंदूंना ही माहिती नसेल. बरं, ही एकच गोष्ट आहे का सनातन धर्मात? तर नाही, अश्या अनेक गोष्टी आहेत. त्यातील अजून एक गोष्ट संक्षिप्त रूपात तुमच्यासमोर मांडतो.
पुरातन काळात रेवतक राजा आपली अत्यंत सुंदर आणि गुणी मुलगी रेवतीच्या लग्नासाठी योग्य वर शोधत होता. पण त्यांना पृथ्वीवर कोणीही योग्य वर मिळत नव्हता. शेवटी, ते स्वतः आणि त्यांची मुलगी ब्रह्मलोकात परमपिता ब्रह्मा यांच्याकडे गेले आणि आपल्या मुलीसाठी योग्य वर कोण, असा प्रश्न केला. ब्रह्माजींना त्यांचे आगमन आणि असा प्रश्न ऐकून आश्चर्य वाटले.
ते स्मित हास्य करत म्हणाले की, "हे राजा, तू ज्या वरांची यादी मनात घेऊन आला आहेस, ते सर्व आता पृथ्वीवर अस्तित्वातच नाहीत!" राजा गोंधळला. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना काल-सिद्धांत' (Time Dilation) समजावला. ते म्हणाले की, "पृथ्वीवरील वेळ आणि ब्रह्मदेवाच्या वेळेत प्रचंड तफावत आहे. तुम्ही सतयुगात असताना ब्रह्मलोकात आले होते, पण ब्रह्मलोकांतून परतत असेपर्यंत पृथ्वीवर सतयुग आणि त्रेतायुग संपून द्वापारयुग चालू झाले आहे!"
वेळेचा हा खेळ न समजलेले ते दोघे ब्रह्नदेवाला नमस्कार करून जेव्हा पिता-पुत्री परत पृथ्वीवर आले, तेव्हा तिथले सगळे चित्रच बदलले होते. पृथ्वीवरची सगळी माणसे, घरे त्यांच्या तुलनेत खूपच बुटकी झाली होती. झाडाखाली बसलेल्या बलरामाना पाहून त्यांनी त्यांच्या परिस्थितीबद्दल प्रश्न केला. बलरामाने त्यांना बदललेल्या काळाची आणि प्रत्येक युगात माणसाची उंची कमी होत गेल्याची माहिती दिली. हे ऐकून रेवती काळजीत पडली आणि आपल्या लग्नाची चिंता करू लागली. तिची चिंता पाहून बलरामाने आपल्या हातातील नांगर रेवतीच्या डोक्यावर दाबला, ज्यामुळे रेवतीची उंची द्वापारयुगामधील लोकांसारखी योग्य झाली. त्यानंतर बलराम आणि रेवतीचे लग्न थाटामाटाने संपन्न झाले.
सनातन सत्य आणि आपले अज्ञान
मंडळी, ह्या दोन्ही कथा सनातन धर्माची शक्ती आणि आजच्या विज्ञानाची सत्यता स्पष्ट करतात. आज अनेक वैज्ञानिक मल्टिव्हर्स असण्याची शक्यता बोलतात, त्यावर चित्रपट बनवतात. वेगवेगळ्या ब्रह्मांडात वेळेचा वेग वेगळा असतो असाही शोध आजचे प्रगत शास्त्र मान्य करते.
या कथा केवळ 'काल्पनिक' नसून, त्या हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी बुद्धीला समजायला कठीण होत्या म्हणूनच त्या कथा रूपाने मांडल्या गेल्या आहेत. आज विज्ञान त्या कथांच्या दिशेने एक-एक पाऊल टाकत आहे. हे पुरावे आहेत की, आपली सनातन संस्कृती, ज्ञान किती प्रगत होते.
पण आजच्या पिढीला ह्या गोष्टी माहीत नसतात. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बुद्धिमत्ता सिद्ध करण्याच्या नादात आपण पौराणिक, सनातन गोष्टी नाकारण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय ह्या गोष्टी कुटुंबात चर्चा केली जात नाही. म्हणूनच ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून सनातन धर्माची महत्ता सर्वदूर पोहोचवण्यासाठी तुम्ही मदत करणार ना?
ही माहिती इतर सनातनी मित्रांसोबत शेअर करा, आवडल्यास कमेंट करून सांगा. अशीच दुसरी एखादी सनातन गाथा घेऊन परत तुमच्यासमोर येईपर्यंत माझा नमस्कार.
#MultiverseInSanatan
#TimeDilationMarathi
#HinduAwakening
#SanatanDharma
#Kathavachak
#MarathiBlog
#मराठीब्लॉग #कथावाचक #सनातन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा