तिरुपती बालाजी: जगातील सर्वात श्रीमंत देवाच्या संपत्तीचे 'हे' आहे रहस्य!

लेखक : कथावाचक 

तिरुपती बालाजी: जगातील सर्वात श्रीमंत देवाच्या संपत्तीचे 'हे' आहे रहस्य!

नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा एक 'सनातन' कथा घेऊन तुमच्यासमोर उपस्थित झालो आहे. 'PK' नावाचा तो चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. हिंदू देव-देवता आणि रूढी-परंपरांचा अपमान करून लोकांना हसवण्याचा प्रयत्न त्यात झाला. एका प्रसंगात तो दगडाला भगवा रंग लावून देव असल्याचा बनाव करतो आणि परीक्षार्थी मुले तिथे पैसे टाकून डोकं टेकवतात. हा प्रसंग पाहताना हसू येत असलं, तरी तो एक प्रकारे 'वास्तवदर्शी' वाटतो. हो, मी वास्तवदर्शीच म्हणेन; कारण आजचा मूर्ख हिंदू समाज कोणतीही माहिती न घेता, अज्ञानापोटी कोणत्याही पाषाणावर डोकं ठेवतो. भोंदू, स्वयंघोषित 'बुवा-बापू' यांच्या दावणीला स्वतःला बांधून घेतो, ही वस्तुस्थिती आहे. सध्या चर्चेत असलेला 'खरात बुवा' यांसारखे प्रकार याच गोष्टीला पाठबळ देतात. हिंदूंनी आता तरी सजग आणि डोळस होणं किती गरजेचं आहे, हे यातून स्पष्ट होतं.
आज मी एका अशा देवस्थानाबद्दल बोलणार आहे, जिथे लाखो हिंदू जातात, केस दान करतात, दागदागिने अर्पण करतात; पण त्या देवाची मूळ कथा अनेकांना ठाऊक नसते. केस दान का करायचे? देवाला इतकी संपत्ती का हवी? याबद्दलचे अज्ञान दूर करण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न. चला तर मग, जाणून घेऊया जगातील सर्वात श्रीमंत देव ' श्री व्यंकटेश्वर बालाजी' यांची कथा!

गोष्ट खूप जुनी आहे. एकदा ऋषी-मुनींनी एक मोठा यज्ञ करायचे ठरवले. पण या यज्ञाचा मुख्य 'भोग' कोणत्या देवाला द्यायचा, असा प्रश्न त्यांना पडला. सृष्टीचे जनक ब्रह्मदेव, तारणहार विष्णू की संहारक महादेव? यावर वाद वाढू लागला. अखेर ब्रह्मपुत्र योगी भृगु ऋषींवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. भृगु ऋषींनी परीक्षा घेण्याचे ठरवले. ते आधी ब्रह्मदेवांकडे गेले, पण त्यांना नमस्कार न करता तसेच उभे राहिले. ब्रह्मदेव रागावले आणि त्यांनी भृगुंना शिष्टाचार पाळण्याची आज्ञा दिली. भृगु तिथून निघाले आणि महादेवांकडे गेले. महादेव माता पार्वतीसोबत एकांतात होते. भृगुंनी तिथेही व्यत्यय आणला. रागावलेल्या महादेवांनी त्रिशूळ उचलला, तेव्हा भृगु तिथूनही पळाले. शेवटी ते क्षीरसागरात पोहोचले. भगवान विष्णू शेषनागावर विश्रांती घेत होते आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत होती. भृगु ऋषींनी कोणताही विचार न करता थेट विष्णूंच्या छातीवर पाय मारला! भगवंताची निद्रा भंग पावली, पण त्यांनी रागावण्याऐवजी स्मितहास्य केले. त्यांनी भृगुंचे पाय हातात घेऊन विचारले, "मुनिवर, माझ्या कठोर छातीला लागून तुमच्या कोमल पायाला काही इजा तर झाली नाही ना?" विष्णूंच्या या क्षमाशील वृत्तीमुळे भृगु ऋषींना उत्तर मिळाले. त्यांनी विष्णूंना 'सर्वोत्तम देव' घोषित केले.

कथेचा हा पहिला भाग झाला, पण आता खरा 'ट्विस्ट' पुढे आहे. विष्णूंच्या छातीवर (जिथे लक्ष्मीचा निवास असतो) भृगुंनी पाय मारल्यामुळे माता लक्ष्मी प्रचंड संतप्त झाल्या. पतीचा अपमान सहन न झाल्याने त्यांनी वैकुंठ सोडले आणि पृथ्वीवर 'पद्मावती'च्या रूपात जन्म घेतला. लक्ष्मीशिवाय विष्णूही व्याकुळ झाले. त्यांनी मानवी रूपात 'श्रीनिवास' अवतार घेतला आणि लक्ष्मीला शोधण्यासाठी पृथ्वीवर आले.
एका वनात श्रीनिवासांनी पद्मावतीला जंगली हत्तीच्या हल्ल्यातून वाचवले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. चोल राजाची कन्या असलेली पद्मावती आणि वनात राहणारा श्रीनिवास यांचा विवाह ठरणार होता, पण श्रीनिवास मानवी रूपात असल्याने त्यांच्याकडे लग्नासाठी धन नव्हते.

विष्णू जेव्हा लक्ष्मीपासून वेगळे झाले, तेव्हा ते 'निर्धन' झाले होते. लग्नासाठी धन हवे होते, म्हणून त्यांनी धनाची देवता कुबेर यांच्याकडून प्रचंड कर्ज घेतले. हे कर्ज मानवी देहात राहून घेतलेले असल्यामुळे, त्याचे व्याज फेडण्याची जबाबदारीही श्रीनिवासांनी स्वीकारली. त्यांनी कुबेरांना वचन दिले की, "हे कर्ज माझे भक्त फेडतील. माझ्या कृपेने जे भक्त धनवान होतील, ते मला दान देतील आणि त्या दानातून तुझे कर्ज फेडले जाईल." असे म्हटले जाते की, आजही कुबेराचे कर्ज फिटलेले नाही. म्हणूनच बालाजीचे भक्त श्रद्धेपोटी दान करतात, जेणेकरून आपल्या लाडक्या देवाचे कर्ज फेडण्यास मदत होईल.

तिरुपतीला गेल्यावर अनेक लोक टक्कल करतात. यामागेही एक हृदयस्पर्शी कथा आहे. एकदा एका गवळ्याच्या गाईने वारुळावर दुधाचा अभिषेक केला. चिडलेल्या गवळ्याने वारुळावर कुऱ्हाड मारली. त्या वारुळात श्रीनिवास (बालाजी) लपलेले होते. कुऱ्हाडीचा वार त्यांच्या डोक्याला लागला आणि तिथले केस उडाले. हे पाहून नीला देवी (काही कथांत गंधर्व कन्या, तर काहींत आईचा उल्लेख येतो) व्यथित झाली. तिने तात्काळ स्वतःचे केस कापून देवाच्या जखमेवर लावले. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन बालाजींनी आशीर्वाद दिला की, "सुंदरतेचे प्रतीक असलेले केस जे भक्त मला अर्पण करतील, त्यांच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन." हीच ती परंपरा जी आजही लाखो भक्त पाळत आहेत.

मंडळी, तिरुपती बालाजींची ही कथा आपल्याला दोन गोष्टी शिकवते. पहिली म्हणजे विष्णूंची क्षमाशीलता आणि दुसरी म्हणजे कर्तव्यपूर्ती. आपण देवाला दान करतो, पण ते 'व्यवहार' म्हणून न करता त्यामागचा इतिहास जाणून घेऊन केले पाहिजे. देवाच्या नावावर लोकांची फसवणूक करणाऱ्या 'खरात बुवा' सारख्या भोंदूंकडे जाण्यापेक्षा, आपल्या सण-उत्सवांचा आणि परंपरांचा मूळ गाभा समजून घ्या.
जेव्हा तुम्ही तिरुपतीला जाल, तेव्हा केवळ 'टक्कल' करून येऊ नका, तर श्री विष्णूंच्या त्या संयमाची आठवण ठेवा. अज्ञानाचा अंधकार दूर करा आणि डोळस हिंदू व्हा!
माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. बालाजीला जाणाऱ्या ऑफिसातील मित्रांना, नातेवाईकांना ही माहिती मुद्दाम पाठवा म्हणजे त्यांना श्री बालाजी याची खरी गोष्ट आणि रितीभाती याची ओळख होईल.
पुन्हा भेटूच, एका नवीन विषयासह... तोपर्यंत एक छोटीशी विश्रांती....

पुढचा विषय देखील आध्यात्मिक आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध देवता "विठ्ठल" यावर आहे. अशाच नवनवीन गोष्टी वाचण्यासाठी फॉलो करायला मात्र विसरू नका...

विठ्ठल: विधाता, नीलकंठ आणि लक्ष्मीकांत! 
लेखाची लिंक : 👇👇 https://kathavachak137.blogspot.com/2026/04/blog-post_27.html


#TirupatiBalaji 
#MarathiBlog 
#HinduCulture 
#Venkateswara 
#SanatanDharma 
#MarathiStories 
#मराठी #मराठीकथा #अध्यात्मिकगोष्टी 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रपती

मुक्त विद्यालय (Open School)