विठ्ठल: विधाता, नीलकंठ आणि लक्ष्मीकांत!
लेखक: कथावाचक
रामराम मंडळी,
विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेल्या वारकऱ्याला जसा विठ्ठल डोळ्यांत साठवायचा असतो, तसाच तो आपल्या बुद्धीने आणि अंतरात्म्याने समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. विठ्ठल जन्माची आणि त्याच्या स्वरूपाची ही कथा खरोखरच माहितीपूर्ण आणि डोळ्यांत अंजन घालणारी आहे.
विठ्ठल: विधाता, नीलकंठ आणि लक्ष्मीकांत! विठुरायाचा हा इतिहास तुम्हाला ठाऊक आहे का?
आपण सध्या 'अध्यात्म लेख' मालिकेतील अनेक रंजक गोष्टी वाचत आहात, त्या शेअर करत आहात, हे पाहून खरंच खूप आनंद वाटतोय. दररोज सनातन धर्मातील एखादी नवी गोष्ट तुमच्यासमोर मांडावी, असं मला सारखं वाटत असतं. पण एखादी गोष्ट नुसती वाचून ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येत नाही; तिच्या मुळाशी जाऊन विस्तृत माहिती काढण्यात ४-५ तास कुठे निघून जातात, हे कळतही नाही. पण तरीही, तुम्ही न ऐकलेल्या किंवा विस्मृतीत गेलेल्या या गोष्टी बाहेर काढण्याचं मला एक 'व्यसन' लागलं आहे. या व्यसनाची झिंग तुमच्या बुद्धीवर आणि मनावर चढावी, हीच माझी इच्छा. या ब्लॉगमधून हिंदू जनजागृती व्हावी, हिंदू सजग आणि संघटित व्हावा, यासाठी चाललेल्या या प्रयत्नांना तुमच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे.
विठ्ठल नक्की कोण?
जर मी तुम्हाला विचारलं की, विठ्ठलाच्या जन्माची गोष्ट काय? तर कदाचित अनेकांना याचं नेमकं उत्तर देता येणार नाही. मुळात, विठ्ठल नावाचा वेगळा 'देव' अस्तित्वात नाही, असं म्हटलं तर तुम्ही मला वेड्यात काढाल! पण थांबा, विठ्ठल हे विष्णूच्याच अवताराचे एक स्वरूप आहे आणि हीच आजची आपली कथा आहे. पण त्याआधी, पंढरपूरच्या या नयनरम्य मूर्तीचे दर्शन घेऊया आणि तिचे बारकावे समजून घेऊया.
विठ्ठल: शब्दाची फोड आणि स्वरूप
विठ्ठल या शब्दाचा सोपा अर्थ म्हणजे विट + थल (जमीन). भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर (जमीन) जो उभा आहे, तो विठ्ठल! पण अध्यात्मिकदृष्ट्या या नावाचा दुसरा एक सुंदर अर्थ आहे:
* वि: विधाता (सृष्टीचा जनक ब्रह्मदेव) * ठ्ठ: नीलकंठ (भगवान महादेव) * ल: लक्ष्मीकांत (भगवान विष्णू)
अर्थात, ज्याच्या एका नावात त्रिमूर्ती सामावलेल्या आहेत, तो म्हणजे विठ्ठल!
तुम्ही इतकी वर्षे विठ्ठलाची मूर्ती पाहत आहात, पण तिचे कधी बारकाईने निरीक्षण केले आहे का? विठ्ठलाच्या डोक्यावरची मुकुटासारखी टोपी आपल्याला 'शिवलिंगाचा' भास करून देते. चेहरा उभट, गाल फुगीर आणि डोळे समचरण' म्हणजे भक्ताकडे थेट पाहणारे आहेत. कानात मत्स्यकुंडले, गळ्यात हार आणि उजव्या छातीवर भृगु ऋषींच्या' पायाचा वारसा सांगणारी ती जखम आजही विठ्ठलाच्या मूर्तीवर पाहायला मिळते.
भृगु ऋषींची आणि विष्णूच्या छातीवरील जखम गोष्टीची लेखाची लिंक 👇
विठ्ठलाचे दोन्ही हात कमरेवर आहेत. डाव्या हातात शंख आणि उजव्या हातात कमळाचा देठ आहे. दोन्ही पायाच्यामध्ये उभी काठी दिसते.ही मूर्ती केवळ दगड नसून सनातन धर्मातील कथांची एक सुंदर गुंफण आहे. इतर कोणत्याही पंथाच्या कथानकात अशी तर्कशुद्ध सांगड पाहायला मिळत नाही.
विठ्ठल जन्माची कथा: मुचकुंद राजाचे वचन
द्वापार युगात मुचकुंद नावाच्या पराक्रमी राजाने देवांना असुरांविरुद्धच्या युद्धात मोठी मदत केली होती. देवांचा राजा इंद्र प्रसन्न झाला आणि त्याने राजाला वर मागण्यास सांगितले. थकून गेलेल्या राजाने इंद्राकडे 'गाढ निद्रा' आणि 'जो माझी झोपमोड करेल तो केवळ माझ्या नजरेने भस्म होईल' असा अधिकार मागितला.
कृष्ण अवतारात जेव्हा कालयवन नावाचा राक्षस श्रीकृष्णाचा पाठलाग करत होता, तेव्हा भगवंताने एक लीला केली. कालयवनला मारण्यासाठी कृष्णाने त्याला त्या गुहेत नेले जिथे मुचकुंद राजा झोपले होते. कृष्णाने स्वतःचे उपरणे राजाच्या अंगावर टाकले. कालयवनला वाटले की कृष्णच झोपला आहे. त्याने राजाला लाथ मारली. राजा जागा झाला आणि त्याच्या क्रोधाग्नीने कालयवन तिथेच भस्म झाला. जेव्हा श्रीकृष्ण समोर आले, तेव्हा मुचकुंद राजाने त्यांना विनंती केली की, "तुमचे हे रूप माझ्या डोळ्यासमोर असेच कायम राहावे." तेव्हा भगवंताने वचन दिले की, पुढच्या जन्मी तुझी ही इच्छा पूर्ण होईल. हाच मुचकुंद राजा पुढे 'पुंडलिक' म्हणून जन्माला आला.
पुंडलिकाची भक्ती आणि विठ्ठलाची वीट
एकदा श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा वाद झाला. रुक्मिणी देवी रुसून वनात तपश्चर्या करायला निघून गेल्या. श्रीकृष्ण त्यांना शोधत पंढरपूरजवळच्या वनात आले. तिथे त्यांना मुचकुंद राजाला (आताचा पुंडलिक) दिलेले वचन आठवले. विष्णू पुंडलिकाच्या घरी गेले, पण पुंडलिक तेव्हा आपल्या वृद्ध आई-वडिलांची सेवा करत होता.
साक्षात देव दारात उभे आहेत हे माहीत असूनही, पुंडलिकाने कर्तव्याला प्राधान्य दिले. त्याने भगवंताला उभे राहण्यासाठी एक वीट फेकली आणि सांगितले, "आई-वडिलांची सेवा पूर्ण होईपर्यंत या विटेवर उभे राहा." भक्ताची ओढ पाहून श्रीकृष्ण त्या विटेवर उभे राहिले. सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिकाने भगवंताला तिथेच विटेवर राहण्याची विनंती केली. तेव्हापासून श्रीकृष्ण पंढरपुरात 'विठ्ठल' रूपात भक्तांच्या भेटीसाठी अठ्ठावीस युगे उभे आहेत.
त्यामुळे, विठ्ठल हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात श्रीकृष्णच आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध होते.
मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली? धर्मातील अशा कथा नुसत्या ऐकायच्या नसून त्यातून मिळणारा संदेश आपल्या आयुष्यात उतरायचा असतो. विठ्ठलाची मूर्ती आपल्याला सांगते की, देव तुमच्या कर्मात आणि भक्तीत दडलेला आहे.
सनातन धर्मातील अशाच निवडक आणि सत्य गोष्टी वाचण्यासाठी, धर्मजागृतीसाठी आणि हिंदू संघटन अधिक दृढ करण्यासाठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पुढची अशीच एक रंजक गोष्ट घेऊन लवकरच भेटीन.
।। ॐ नमोः नारायणाय नमः ।।
।। ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः ।।
।। ॐ नमः शिवाय ।।
#विठ्ठल
#पंढरपूर #सनातन #कथा #आध्यात्मिक #मराठीकथा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा