ब्लॉग १०२: HTML शिका मराठीतून - भाग १
लेखक: कथावाचक
रामराम मंडळी!
कसं चाललंय सगळं? मघाशी गादीवर लोळत मोबाईलमध्ये 'रील्स' पाहत होतो. एक-एक व्हिडिओ सरकवत असताना अचानक डोक्यात विचार आला, "अरे, हे जे काही आपण मोबाईलच्या पडद्यावर पाहतोय, हे बनतं कसं?" गुगल असो किंवा फेसबुक, या वेबसाईट्सचा एखादा सांगाडा तर असेलच ना?
तसं पाहायला गेलं तर, आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींचा सांगाडा आधी तयार करतो. मग ते घर बांधताना विटा-सिमेंटचं स्ट्रक्चर असो किंवा संसाराचा गाडा हाकताना केलेली पैशांची जमवाजमव. वेबसाईट्सच्या दुनियेतही तसंच आहे. तिथे जो सर्वात पहिला आणि महत्त्वाचा सांगाडा असतो, त्याला म्हणतात HTML.
ब्लॉग १: HTML शिका मराठीतून ...
HTML म्हणजे काय? वेबसाईटच्या जगातील 'पायाभरणी'
HTML याचा शोध १९९१ मध्ये 'टिम बर्नर्स-ली' (Tim Berners-Lee) यांनी लावला. त्यांचा उद्देश संशोधकांना माहिती शेअर करण्यासाठी एक सोपी पद्धत उपलब्ध करून देणे हा होता. आज आपण HTML चे पाचवे व्हर्जन म्हणजेच 'HTML5' वापरत आहोत, जे अत्यंत प्रगत आणि युजर-फ्रेंडली आहे.
HTML म्हणजे नक्की काय रे भाऊ?
आता तांत्रिक भाषेत सांगायचं तर याचा मोठा फुल फॉर्म आहे HyperText Markup Language. पण आपण साध्या माणसांनी इतक्या जड शब्दात कशाला पडायचं? सोप्या भाषेत सांगतो, जसा आपल्या शरीराचा हाडांचा सांगाडा असतो, तसंच वेबसाईटचं हाड म्हणजे 'HTML'. त्यावर मग आपण नंतर CSS चा 'रंग' लावतो आणि JavaScript ची 'बुद्धी' देतो. पण जोवर हाडांचा सांगाडा मजबूत नाही, तोवर शरीर कसं उभं राहणार?
मला कशाची गरज लागेल?
आता हे शिकायला काय खूप मोठी पदवी लागते की काय? तर मुळीच नाही! माझ्यासारखा एखादा माणूस, जो ऑफिसात जाऊन मिळणाऱ्या फावल्या वेळात बसून काहीतरी लिहायचा छंद जोपासतो, तो सुद्धा हे सहज करू शकतो. तुम्हाला फक्त दोन गोष्टी लागतील:
१. Text Editor: जसं आपण कागदावर लिहितो, तसं कॉम्प्युटरवर कोड लिहिण्यासाठी एक जागा. सुरुवातीला 'Notepad' सुद्धा चालेल, पण जर तुम्हाला प्रोफेशनल व्हायचं असेल तर 'VS Code' वापरा.
२. Web Browser: जो आपला कोड वाचून आपल्याला वेबसाईट दाखवेल. (Google Chrome किंवा Firefox).
चला, पहिला श्रीगणेशा करूया!
स्वयंपाकघरातून 'सौं'नी चहाची हाक मारण्यापूर्वी आपण एक छोटासा कोड लिहून पाहूया. खालील ओळी नीट बघा:
<!DOCTYPE html>
<html>
<head>
<title>माझं पहिलं वेबपेज</title>
</head>
<body>
<h1>रामराम मंडळी!</h1>
<p>मी आज माझी पहिली वेबसाईट बनवली आहे.</p>
</body>
</html>
या कोडचा 'पंचनामा' :
आजच्या ह्या पहिल्या प्रोग्राममध्ये समजून घ्यायच्या मुख्य बाबी खालीलप्रमाणे आहे, प्रोग्राममधील इतर अधिक असलेले टॅग (title, h1, p) पुढे शिकवल्या जाणार आहेत. कोणताही HTML प्रोग्राम लिहण्यासाठी खालील महत्वाच्या टॅगची गरज असते. प्रोग्राम लिहायला बसल्यावर खालील गोष्टी मस्ट. याखेरीज प्रोग्राम लिहायला चालूच होत नाही.आता एकच टॅग दोन वेगवेगळ्या पद्धतीने प्रोग्राममध्ये लिहिलेला दिसेल. सुरुवातीला लिहिलेला ओपनिंग टॅग तर प्रोग्राम शेवटी / करून टॅग लिहला आहे ते क्लोसिंग टॅग आहे.
<!DOCTYPE html>: हे ब्राउझरला सांगतं की, "बाबा रे, हा नवीन काळातला HTML5 कोड आहे, नीट वाच!"
<html>: हा म्हणजे आपल्या वेबसाईटचा 'बाप' टॅग. याच्या आतच सगळं विश्व सामावलेलं असतं.
<head>: याला आपण वेबसाईटचा 'मेंदू' म्हणूया. यात फक्त टायटल आणि गुगलसाठी लागणारी माहिती असते, जी पेजवर दिसत नाही.
<body>: हे मात्र सर्वात महत्त्वाचं! जसा आपला देह असतो, तसं वेबसाईटवर जे काही दिसतं (फोटो, मजकूर), ते सगळं या टॅगच्या पोटात असतं.
माझं प्रामाणिक मत:
कोडिंग करणं हे एखादी गोष्ट लिहिण्यासारखंच आहे. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, जसं पु.ल. वाचताना पहिल्यांदा त्यांतील विनोदाचे पदर पटकन उमजत नाहीत, पण एकदा सवय झाली की मग त्यातला आनंद वेगळाच असतो.
आजचा सराव (Homework):
आता वेळ घालवू नका. मोबाईल बाजूला ठेवा आणि तुमच्या लॅपटॉपवर नोटपॅड उघडा. वर दिलेला कोड टाईप करा आणि फाईल index.html या नावाने सेव्ह करा. मग ती ब्राउझरमध्ये उघडून बघा. जर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर "रामराम मंडळी!" दिसलं, तर समजा तुम्ही वेब डेव्हलपर होण्याच्या मार्गावर पहिलं पाऊल टाकलंय! पण इथेच थांबू नका हाताला आणि मेंदूला प्रोग्राम लिहायचा सराव व्हावा म्हणून एक प्रोग्राम करून थांबू नका. सराव करत रहा. तसही ही केवळ सुरुवात आहे पण पुढे प्रोग्रामिंग अवघड होत राहणार आहे. जितका सराव कराल तितके प्रोग्रामिंग सोप्पे होईल.
जे पालक हा लेख वाचत आहे त्यांना सांगावे वाटते की तुम्ही हे स्वतः एकदा करा आणि मुलांना अडचण आली तर त्यांना मदत करा. घरात घेतलेला कॉम्प्युटर केवळ गेम खेळण्यासाठी नाही असे मुलांना समजून द्या. आज केवळ सुरुवात पण ही लेख मालिका संपेपर्यंत तुम्ही पालक आणि तुमचे पाल्य तंत्रज्ञानाच्या दुनियेत संकेतस्थळाची ढाचा बनवायला शिकणार आहे. ही शैक्षणिक ब्लॉग मालिका दर आठवड्याला दोन प्रकरण तुमच्यासमोर आणणार आहे. पुढचा लेख आता बुधवारी कारण हे सगळे अचूक लिहिणे, मांडणे हे सोपे नाही. दिलेली वेळ पाळण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे पण कामामुळे थोडे मागे पुढे झाले तर राग ठेवू नका. तुम्हाला देखील सरावासाठी वेळ हवाच. फायदा होणार त्या लोकांचा जे संपूर्ण कथा मालिका झाल्यावर येतील कारण त्यांना सगळ स्टडी मटेरियल एकाच वेळी मिळणार आहे. असो...
आजचा हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्समध्ये नक्की द्या. कारण तुमची दाद हीच माझ्या लेखनासाठी खरी 'सुवर्णसंधी' असते.
मित्रांनो, HTML ही वेब विश्वाची जननी आहे. आज आपण फक्त सुरुवात केली आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अक्षरांना बोल्ड, इटॅलिक कसे करायचे आणि लिस्ट कशी बनवायची.
तुम्हाला हा पहिला भाग कसा वाटला? काही शंका असल्यास कमेंट्समध्ये नक्की विचारा.
#HTMLमराठी
#कोडिंगशिका
#वेबडेव्हलपमेंट
#मराठीब्लॉग
#कथावाचक
#तंत्रज्ञान
#ComputerEducationMarathi
#LearnHTML #CodingForKids
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा