पु ल, कारल्याची भाजी आणि मी
रामराम मंडळी, मी कथावाचक! माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करतो. "आज काय लिहायचे?" असा प्रश्न मला कधीच पडत नाही. खरं तर, मेंदूच्या जटील संरचनेत तो विचार येतच नाही; कारण मेंदूला विचार करण्यापासून परावृत्त करणाऱ्या अनेक गोष्टींची गर्दी आपण आपल्या आयुष्यात करून ठेवली आहे. तसं पाहायला गेलं तर, कुटुंबातील लोक सोडली तर आजकाल घरात असणारा 'इडियट बॉक्स' म्हणजेच दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी आता कालबाह्य झाले आहेत.
लहानपणच्या आठवणीत डोकावलं की दिसतं ते एकत्र कुटुंब, दूरचित्रवाणी, शालेय शिक्षण आणि दिवसभर मरतो तोवर खेळून दमल्यानंतर झालेली ती भूक! आईने बनवलेली नावडती भाजीही तेव्हा आपण आवडीने संपवायचो. फेकून द्यायच्या उंबरठ्यावर असलेल्या शिळ्या चपातीला तूप-साखर लावून खाण्याचा दांडगा अनुभव असलेला मी, आज काही काम नसल्याने गादीवर लोळत पडलो होतो. हातातील भ्रमणध्वनी (मोबाईल) आणि त्यातील व्हिडिओ पाहण्यात अर्धा दिवस कुठे गेला, हे कळलंच नाही. शाळेत गेलेली मुले आणि वारीला गेलेल्या वडिलांच्या अनुपस्थितीत घरात फक्त मी आणि माझी सौं असे दोनच प्राणी होतो. जगातील इतर स्त्रियांप्रमाणेच आमच्या 'सौं' ना देखील घरच्या न संपणाऱ्या कामात स्वतःला गुरफटून घेण्याचा मोठा छंद आहे.
दुपारी दीडच्या सुमारास स्वयंपाकघरातून "अहो..." अशी हाक ऐकू आली आणि अर्धा दिवस संपून जेवणाची वेळ झालीय याची जाणीव झाली. थोड्याच वेळात शाळेचा किलबिलाट संपवून आमची छोटी आणि मोठी 'चिमणीपाखरे' घरात गलबलाट करायला हजर होतील, याचीही आठवण झाली. आज झिम्बाब्वे विरुद्ध टी-२० मालिकेतील तिसरा सामना असल्याने, जेवायला उठताना मोबाईलला त्याच्या 'कुटुंबाच्या' सर्वात महत्त्वाच्या सदस्याशी म्हणजे चार्जरशी जोडून पुढच्या करमणुकीची सोय केली.
स्वयंपाकघरात गेल्यावर समोर चपाती आणि कारल्याची मसालेदार भाजी असलेले ताट दिसले. ती भाजी बघताच आमच्या चिऊ-काऊंच्या कपाळावर जशा आठ्या पडतात, तशाच माझ्याही कपाळावर आल्या. पण त्या आठ्या 'सौं' ना दिसू नयेत म्हणून, "अरे व्वा! आज कारल्याची भाजी?" असा खोटा पण आनंदी सूर लावत मी पाटावर बसलो. चिऊ आणि काऊंच्या डब्यातही हीच भाजी असणार, हे ओळखून त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल, याचा एक संपूर्ण चित्रपटच माझ्या डोळ्यासमोरून गेला.
पाटावर बसलेलो असतानाच, बाजूला पाचवीत असलेल्या आमच्या चिऊने शाळेच्या ग्रंथालयातून आणलेले भाईंचे, म्हणजेच पु.ल. देशपांडे यांचे 'हसवणूक' हे छोटेखानी पुस्तक पडलेले दिसले. ताटातील ती नावडती भाजी गोड करण्याची हीच सुवर्णसंधी आहे असे समजून मी पुस्तक उचलले. "मराठी माणूस आणि वाचनाचा किडा चावलेला माझ्यासारखा कोणीही असो, आयुष्यात एकदा तरी पु.ल. नक्कीच वाचावेत," असे माझे प्रामाणिक मत आहे. हे 'हसवणूक' पुस्तकच माझ्या जेवणातील नावडती भाजी आवडीची करायला आणि हा लेख लिहायला कारणीभूत ठरले.
'अधाशीपणा' हा शब्द खाण्याशी निगडित असला, तरी जेवताना मी अधाशीपणाने त्या पुस्तकात नजर घुसवली आणि नावडत्या भाजीचा एक-एक घास ढकलू लागलो. मध्येच "भाजी छान झाली आहे," असे म्हणत 'सौं' ची मर्जी राखण्याची संधीही सोडत नव्हतो. पु.ल. यांचे कोकणातील बालपण, नातेवाईक, तिथले अनुभव आणि हरहुन्नरी माणसांमधील वावर हे सगळं वाचताना थक्क व्हायला होतं. आपल्या कल्पनाविस्ताराने आणि प्रत्येक वाक्यात हसू आणण्याच्या कौशल्याने त्यांनी ज्या कथा फुलवल्या आहेत, त्यांना तोड नाही. त्याकाळी जर त्यांच्या हातात मोबाईल असता, तर आज आपण किती मोठ्या अमूल्य कथा आणि साहित्याला मुकलो असतो, याची कल्पनाच करवत नाही.
तसा मी एकलकोंडा स्वभाव असलेला माणूस; त्यामुळे माझी बहीण कोपरापासून हात जोडून मला लाखोली वाहात असते. उपलब्ध वेळेचा सदुपयोग करत, डोक्यात आलेल्या आणि समोर दिसणाऱ्या गोष्टींची सांगड घालत लिहिण्याचा मला छंद लागला आहे. पण 'काय लिहावे' यासाठी मला नेहमीच कशाची ना कशाची मदत लागते; आज ती मदत पु.ल. यांच्या पुस्तकाने केली.
मोठ्या लेखकाची कथा वाचताना कळते की लिहिणे किती सोपे आणि तितकेच अवघड आहे. एखादा विषय निवडणे, त्याचा धागा पकडून कथा फुलवणे आणि त्यात विनोदाचे तुषार उडवत वाचकाला मंत्रमुग्ध करणे, हे अजिबात सोपे काम नाही. चेहऱ्याचे वेडेवाकडे हावभाव करून लोकांना हसवणे सोपे असते, पण केवळ शब्दांच्या आधारे हसू आणणारे 'भाई' काही वेगळेच होते. 'हसवणूक'मधील पहिल्या कथेत त्यांनी जेव्हा एका पात्राला विचारले की, त्याने जीवनासाठी तेच विशिष्ट काम का निवडले, तेव्हा त्यातून निर्माण झालेला विनोद अप्रतिम आहे. भाईंनी केवळ इतरांवर व्यंग केले नाही, तर स्वतःच्या अनुभवांबद्दलही तितक्याच विनोदी शैलीत लिहिले आहे. त्यांची वाक्ये अशी पेरलेली असतात की, कधी चिमटा घेतात तर कधी हलकेच गुदगुल्या करतात.
त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीने बोलणे किंवा कौतुक करणे म्हणजे 'मुंगीने हत्ती बनण्यासारखे' आहे. पण हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, 'हसवणूक'चा पहिला भाग वाचून मनात जे विचार आले, त्यांना या ब्लॉगच्या रूपाने वाट करून दिली. आशा आहे की, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. या ब्लॉगमुळे तुम्हीदेखील कपाटात धूळ खात पडलेले पु.ल. देशपांडे किंवा तुमच्या आवडीच्या लेखकाचे एखादे पुस्तक काढून वाचायला लागाल, अशी अपेक्षा करतो. तासंतास मोबाईलवर 'रील्स' पाहत अडकून राहण्यापेक्षा, पुस्तकातील जिवंत आणि अमूल्य आनंद साजरा करण्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही.
पुढची कथा वाचल्यावर लिहिण्याचा मोह झाला, तर पुढचा ब्लॉग नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत या ब्लॉगला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या; कारण मी जे काही लिहितो, ते केवळ तुमच्या प्रेमासाठी!
परत भेटीपर्यंत... छोटीशी विश्रांती..…..
#पुल
#भाई
#हसवणूक
#मराठीकथा
#मराठीपुस्तक
#कथावाचक
#स्टोरीटेलर
#ब्लॉग
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा