ब्लॉग १११: नटराज: ब्रह्मांडाच्या नृत्यातील विज्ञानाचा आविष्कार!

नटराज: ब्रह्मांडाच्या नृत्यातील विज्ञानाचा आविष्कार!

आध्यात्मिक लेख असूनही तुम्ही हे वाचताय हे पाहून खरंच आनंद होतोय. सनातन धर्मातील गोष्टी आपण चर्चिल्या पाहिजे असे माझे ठाम मत आहे. आजकाल आपण शोपीस म्हणून किंवा घराच्या कोपऱ्यात सजावट म्हणून 'नटराज' यांची मूर्ती ठेवतो. अनेकांना असं वाटतं की, ही केवळ नृत्याची एक पोझ आहे. पण मंडळी, ज्यांना आपल्या संस्कृतीचा खोलवर अर्थ माहीत नाही, त्यांना या मूर्तीकडे फक्त एक कलाकृती म्हणून पाहतात. पण खऱ्या अर्थाने विचार केला तर, नटराज म्हणजे केवळ नृत्य नाही, तर ते या संपूर्ण 'ब्रह्मांडाच्या' निर्मितीचं आणि विनाशाचं एक अत्यंत सूक्ष्म विज्ञान आहे.

आज आपण या 'नटराज' शब्दाचा आणि त्यांच्या प्रत्येक मुद्रेचा असा काही 'चर्चा' करणार आहोत की, त्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल.

नटराज: ब्रह्मांडाच्या नृत्यातील विज्ञानाचा आविष्कार!

नटराज हे देवाधिदेव महादेव शंकराचे एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण नाव आहे. 'नटराज' शब्दाची जर आपण फोड केली, तर नट' म्हणजे कला किंवा नृत्य आणि राज' म्हणजे अधिपत्य गाजवणारा राजा. थोडक्यात, जो सर्व कलांचा स्वामी आहे, तो नटराज!

बहुतेक लोकांचा असा समज असतो की, जेव्हा शंकर भगवान तांडव करतात, तेव्हा ते क्रोधीत असतात. पण तांडवमध्ये दोन प्रकार आहेत, हे आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे? जेव्हा शिव विनाशासाठी सिद्ध होतात, तेव्हा ते 'रौद्र तांडव' करतात. पण जेव्हा ते निर्मितीच्या आनंदात आणि विश्वाच्या लयीत नृत्य करतात, तेव्हा त्याला आनंद तांडव' म्हटलं जातं. नटराज ही मुद्रा याच 'आनंद तांडवा'चं प्रतीक आहे.

चला तर मग, नटराजाच्या या चतुर्भुज मूर्तीमधील प्रत्येक प्रतीकाचा सखोल अर्थ जाणून घेऊया:

१. सृष्टीचं सृजन आणि संहार (डमरू आणि अग्नी)

नटराजाच्या वरच्या उजव्या हातात तुम्ही 'डमरू' पाहिला असेल. हे केवळ वाद्य नाही. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, हे 'ब्रह्मांडाच्या' स्पंदनाचं (Vibration) प्रतीक आहे. नाद हा सृष्टीचा पहिला टप्पा आहे. डमरूच्या त्या आवाजातूनच विश्वाची निर्मिती झाली, असं मानलं जातं. त्याच वेळी, त्यांच्या वरच्या डाव्या हातात 'अग्नी' आहे. जर डमरू निर्मितीचं प्रतीक असेल, तर अग्नी हा विनाशाचा किंवा परिवर्तनाचा मार्ग आहे. हे सृष्टीचं चक्र आहे जे निर्माण होतं, त्याचा नाश होणं अटळ आहे. नटराज आपल्याला सांगतात की, निर्मिती आणि विनाश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

२. निर्भयता आणि मुक्तीचा मार्ग (अभय मुद्रा आणि उचलेलं पाऊल).

नटराजाचा तिसरा हात हा 'अभय मुद्रेत' आहे. तो आपल्या भक्तांना सांगतोय की, "घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे." अज्ञानाच्या अंधारात भटकणाऱ्या जीवाला शिव नेहमीच अभय देतात. पण सर्वात महत्त्वाचा आहे त्यांचा चौथा हात, जो खालच्या बाजूला असलेल्या त्यांच्या उचलेल्या डाव्या पायाकडे निर्देश करतो. हे उचलेलं पाऊल म्हणजे 'मोक्ष' मिळवण्याचा मार्ग आहे. हे पाऊल आपल्याला सुचवतं की, संसाराच्या या जंजाळातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल, तर अध्यात्माचा आणि मुक्तीचा मार्ग धरावा लागेल.

३. तो 'बुटका दानव' कोण आहे?

नटराजाच्या उजव्या पायाखाली एक लहान आकृती दिसते. अनेकांना वाटतं की ते लहान बाळ आहे, पण ते बाळ नसून अपस्मार' नावाचा एक बुटका दानव आहे. हा दानव म्हणजे दुसरं तिस्रं काही नसून माणसाचा अहंकार, त्याचं अज्ञान आणि त्याचा विस्मरण आहे. नटराज त्या अहंकाराला आपल्या पायाखाली चिरडत आहेत. जोपर्यंत तुम्ही तुमचा अहंकार आणि अज्ञान सोडत नाही, तोपर्यंत तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश मिळणार नाही, असा हा सडेतोड संदेश आहे.

४. अग्नीचं वर्तुळ आणि ब्रह्मांडाची व्याप्ती

मूर्तीच्या सभोवताली जे आगीचं वर्तुळ दिसतं, त्याला  प्रभामंडल' म्हणतात. हे केवळ डेकोरेशन नाही, तर हे संपूर्ण ब्रह्मांड' आहे. हे वर्तुळ सुचवतं की, हे संपूर्ण विश्व एका लयीत, एका तालात बांधलेलं आहे. आजचं आधुनिक विज्ञान (CERN सारख्या संस्था) देखील मान्य करतं की, अणूच्या आतले सूक्ष्म कण देखील एका लयीत 'नृत्य' करत असतात. म्हणूनच, स्वित्झर्लंडमधील CERN या जगातील सर्वात मोठ्या विज्ञान केंद्राच्या बाहेर नटराजाची मोठी मूर्ती बसवलेली आहे! आपल्या सनातनी पूर्वजांना हे 'कॉस्मिक डान्स'चं विज्ञान हजारो वर्षांपूर्वी माहीत होतं, याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा.

५. गंगा आणि केसांची मुक्तता

नटराजाचे केस चहूबाजूंनी विखुरलेले दिसतात. हे केस म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य आणि आनंदाची पराकाष्ठा आहे. या जटांमधूनच 'गंगा' नदीच्या धारा वाहत आहेत. गंगा ही ज्ञानाची आणि शुद्धतेची नदी आहे. म्हणजेच, शिवाची बुद्धी आणि त्यांचं चैतन्य इतकं अथांग आहे की, त्यातून ज्ञानाचे प्रवाह अखंड वाहत असतात.

मंडळी, नटराज आपल्याला शिकवतात की, आयुष्य म्हणजे एक 'नृत्य' आहे. इथे चढ-उतार येणार, निर्मिती होणार आणि विनाशही होणार. पण या सगळ्यात आपला अहंकार (तो बुटका दानव) पायाखाली दाबून, हाताने चांगल्या कर्मांचा डमरू वाजवत मोक्षाच्या दिशेने वाटचाल करणं, हाच मानवी जन्माचा उद्देश असायला हवा.

मिळालेलं हे ज्ञान स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका. तुमच्या घरातल्या लहान मुलांना सांगा, मित्रांना शेअर करा. जेव्हा एखादी गोष्ट आपण दुसऱ्याला शिकवतो, तेव्हा ती आपल्या कायमची स्मरणात राहते. आपल्या संस्कृतीचं महात्म्य समजून घ्या आणि ताठ मानेने जगा!
असाच एक डोळे उघडणारा पुढचा लेख घेऊन येईपर्यंत...
परत भेटीपर्यंत... जय श्रीकृष्णा!


#Nataraja #LordShiva #MarathiBlog #KathaVachak #HinduCulture #ScienceAndSanatan #AnandaTandava #KnowledgeShare #JaiShriKrishna

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रपती

तिरुपती बालाजी: जगातील सर्वात श्रीमंत देवाच्या संपत्तीचे 'हे' आहे रहस्य!

मुक्त विद्यालय (Open School)