अंतरात्मा: बाह्यरूप की अंतरंग? एक डोळे उघडणारी मराठी बोधकथा
अंतरात्मा: बाह्यरूप की अंतरंग? एक डोळे उघडणारी मराठी बोधकथा
माणूस म्हणजे एक 'चालता-बोलता मुखवटा' आहे," असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. आपण जगासमोर काय आहोत आणि एकांतात काय आहोत, या दोन टोकांच्या प्रवासात आपला 'अंतरात्मा' कुठेतरी हरवून जातो. कुणी पांढरेशुभ्र कपडे घालून मनामध्ये काळोख साठवून जगत असतं, तर कुणी चिखलात राहूनही आपलं मन चंदनासारखं पवित्र राखतं. आपण माणसांना त्यांच्या व्यवसायावरून, वेशभूषेवरून किंवा समाजातल्या स्थानावरून पारखतो; पण खरंच आपण त्या माणसाच्या अंतरंगात डोकावतो का? आजची ही गोष्ट अशाच दोन टोकाच्या व्यक्तींची आहे, ज्यांच्या कर्माचा हिशोब होतो, तेव्हा न्यायाचे सर्वच निकष बदलले गेले. चला तर मग, अनुभवूया हा अंतर्बाह्य बदलवून टाकणारा प्रवास... 'अंतरात्मा'.
साधारणतः संध्याकाळ झाली की गावाबाहेरील त्या वस्तीत पुरुषांची वर्दळ वाढायची. ती वस्ती शरीर विकणाऱ्या काही स्त्रियांची होती. वेळ वाईट म्हणून त्या या मार्गाला लागल्या असतील, पण एकदा का त्या नरकात पडल्या की तेच त्यांचे आयुष्य बनते. काही स्वतःहून तर काही इच्छेविरुद्ध शरीर विकण्याचे हे काम करत असत. या वस्तीत 'आयशा' नावाची एक सुंदर स्त्री होती, जिच्या सौंदर्यावर भाळलेले अनेक जण देहभान विसरून त्या गल्लीत फेरफटका मारायचे. काही पैशाच्या मोबदल्यात तिच्या शरीराचा मनसोक्त उपभोग घ्यायचे, लचके तोडायचे. एकाची शरीराची भूक संपते ना संपते, तोच दुसरा ग्राहक रांगेत असायचा आणि शरीराचा उपभोग घेण्याचा हा कार्यक्रम अव्याहतपणे चालूच राहायचा...
वस्तीपासून हाकेच्या अंतरावर एक जुनी मशीद होती आणि मशिदीची देखभाल करण्यासाठी तिथे एक मुल्ला, 'अब्दुल' दिवसरात्र काबाडकष्ट करायचा. मशिदीमधली साफसफाई, नीटनेटकेपणा आणि दिवसातून पाच वेळा अजान देणारा अब्दुल दिवसरात्र अल्लाच्या नामस्मरणात काढायचा. त्याच्या दिवसाची सुरुवात उजाडण्यापूर्वी व्हायची, तर शेवट रात्री उशिरा व्हायचा.
दोन भिन्न व्यक्ती, भिन्न कामाचे स्वरूप; एकाला समाजात उच्च स्थान होते, तर दुसऱ्याला समाजात स्थानच नव्हते. असे असले तरी, देवाने बनवलेल्या या सृष्टीवर दोघेही देवाने त्यांच्यासाठी लिहिलेल्या पटकथेत आपापली पात्रे आयशा आणि अब्दुल निभावत होते.
दिवसांमागून दिवस सरत होते. दिवस उजाडण्यापूर्वी अब्दुल ईश्वरी सेवेत रुजू व्हायचा, तर दिवस मावळल्यावर आयशा कामाला रुजू व्हायची. अशाच एका सकाळी अचानक धरणी थरथरू लागली. झोपलेल्यांना जागे होण्याआधीच भूकंप झाला. झाडे, इमारती जोरजोरात डोलू लागल्या. काळ कोणाला काही समजण्याच्या आधीच घाव घालतो; पत्त्यांचा बंगला कोसळावा तशी गावातील मातीची घरे आणि दुमजली इमारती जमीनदोस्त झाल्या. याला अपवाद ना अब्दुलची मशीद होती, ना आयशाची कोठी. काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले आणि सगळीकडे स्मशानशांतता पसरली...
ती शांतता सहन करण्याच्या पलीकडे गेली होती. जड झालेले डोळे मिचकावत, अब्दुल उभे राहण्याचा प्रयत्न करू लागला. डोळ्यासमोर लख्ख पांढरा प्रकाश असल्याने अब्दुलचे डोळे पूर्ण उघडतही नव्हते. डोळे छोटे-मोठे करून अब्दुल सभोवताली पाहू लागला. त्याच्या डोळ्यांसमोर स्वच्छ पांढऱ्या कपड्यांत असलेल्या लहान-मोठ्या लोकांची गर्दी होती. काही काळ्या कपड्यांतील लोक सर्वांना रांगेत उभे करून गर्दीला आवरण्याचे काम करत होते. गर्दीतले बहुतेक सगळेच त्या गावातील लोक होते; काहींचे डोके फुटलेले होते, तर कोणाचे हात-पाय तुटले होते. जखमी लोकांची तर गणनाच होऊ शकत नव्हती. काही कण्हत होते, काही रडत होते, तर कोणी शून्यात पाहत उभे होते. ज्यांना वेदना सहन होत नव्हत्या ते मोठमोठ्याने ओरडत होते. या लोकांचा गोंधळ कमी करण्यासाठी काळे कपडे घातलेले, रांगडे, मोठ्या मिश्या असलेले आणि हातात चाबूक घेतलेले धिप्पाड लोक आकाश-पाताळ एक करत होते. अचानक एक हात अब्दुलच्या खांद्यावर पडला. मागे वळून पाहताच एक धिप्पाड माणूस रांगेत उभे राहण्याची खूण अब्दुलला करू लागला.
तिथे दोन रांगा होत्या, त्यातल्या एका रांगेत अब्दुलला त्या माणसाने उभे केले. हळूहळू दोन्ही रांगा मुंगीच्या गतीने पुढे सरकू लागल्या. अब्दुलला नक्की काय होतंय, हे समजतच नव्हतं. कोणाला काही विचारावं तर कोणी बोलत नव्हतं; बोलायला जावं तर ती धिप्पाड माणसं पाठीवर जोरात चाबकाचे आसूड ओढायला मागे-पुढे पाहत नव्हती. शेवटी पर्याय नसल्याने अब्दुल रांगेत हळूहळू पुढे सरकत राहिला.
आजूबाजूला ओळखीचे कोणी दिसते का, याचा तो अंदाज घेऊ लागला. त्यातच त्याला दुसऱ्या रांगेत गावातील पुरुष जिच्या सौंदर्यावर भाळले होते, ती ललना आयशा दिसली. अब्दुल तिच्या रूपाकडे पाहतच राहिला. आयशा संथ पाण्यासारखी शांत होती. चेहऱ्यावर जखमा असल्या तरी कोणतीही संवेदना न दाखवता, ती दुःखी अंतःकरणाने रांगेत मार्गस्थ होत होती. आयशाला पाहण्यात अब्दुल देहभान विसरला. त्याला वेळेचे भान राहिले नाही, इतक्यात त्याची तंद्री एका कणखर आवाजाने तुटली.
गर्दीवर नियंत्रण मिळवणाऱ्या लोकांचा सरदार अब्दुलला हाक मारत होता. सरदाराच्या हातात एक पुस्तक होते. त्या पुस्तकातील नोंदी पाहत त्याने अब्दुलच्या पायापासून चेहऱ्यापर्यंत निरीक्षण केले आणि तुच्छतेने पाहत तो मोठ्याने ओरडला
"जहन्नुम!"
अतिशय निष्ठुरतेने दोघांनी अब्दुलला पकडले आणि ते त्याला खेचू लागले. अब्दुलला काही समजत नव्हते, पण जखमी असूनही तो त्या धिप्पाड माणसांना प्रतिकार करू लागला; हातपाय झाडू लागला, ओरडू लागला. सरदार पुढच्या व्यक्तीकडे पाहून पुस्तकात पाहू लागला आणि मोठ्याने ओरडला
"जन्नत!"
ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आयशा होती.
जहन्नुम आणि जन्नतच्या रांगा, गर्दीला नियंत्रित करणारे लोक यावरून अब्दुल समजून चुकला की भूकंपाच्या आघातात आपण जिवंत राहिलेलो नाही. रांगेत असलेले हे सगळेच मरण पावले होते. आयुष्यभर केलेल्या कर्माचे फळ म्हणून जहन्नुम आणि जन्नतची विभागणी होत होती. स्वतः अब्दुल जहन्नुममध्ये, तर शरीरविक्री करणारी आयशा जन्नतमध्ये हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
जहन्नुमचा दरवाजा जवळ येत होता. अब्दुल विनवण्या करत होता, ओरडून जाब विचारत होता, गोंधळ घालत होता. हे पाहून सरदाराने त्याला ओढणाऱ्या सेवकांना थांबवले आणि त्याला जवळ बोलावले.
जहन्नुम म्हणजे आगीत होरपळण्याची शिक्षा, तर जन्नत म्हणजे ७२ हूर आणि सुखच सुख! ते सुख हातातून निसटताना पाहून रडवेला चेहरा करत अब्दुल स्वतःबद्दल सांगू लागला. त्याने आयुष्य कसे व्यतीत केले, हे तो सरदाराला सांगत होता. तो सरदाराला पुस्तकात पुन्हा पाहण्यास सांगत होता. "काहीतरी चूक होतेय, माझे नाव जन्नतमध्येच असायला हवे," असे तो ओरडत होता. या सगळ्या झटापटीत त्याचे लक्ष पुन्हा आयशाकडे गेले. अंगातील सगळी शक्ती गोळा करत तो ओरडला, "आयशा एक वेश्या आहे, तिचा दिवस-रात्र व्यभिचारात जात होता; मग ही व्यभिचारी जन्नतमध्ये कशी? आणि माझ्यासारखा अल्लाची जीवापाड भक्ती करणारा जहन्नुममध्ये का?"
सरदाराने गोंधळ थांबवून अनिच्छेने अब्दुलच्या मागणीनुसार पुन्हा पुस्तकात डोकावले. अब्दुल आणि आयशा दोघांचे आयुष्य डोळ्यांखालून घातले आणि आपला निर्णय योग्यच असल्याचा निर्वाळा दिला. अब्दुल ते मान्य करत नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर केवळ नरकातील आग आणि दूर जाणारी जन्नत दिसत होती. जहन्नुम आणि जन्नतच्या दरवाजाची राखण करणाऱ्या त्या सरदाराने कठोर वाणीत सांगितले की, "निर्णय योग्यच आहे. जरी तू तुझे सर्व आयुष्य चांगल्या कामात घालवलेस, तरी तुझ्या मनात मात्र कायम विषयवासना असायची. तू शरीराने मशिदीत असायचास, पण मनाने मात्र कुंटणखान्यात असायचास. तुझे मन सतत शरीरसुखाची अभिलाषा बाळगत होते, पण समाजात असलेल्या तुझ्या प्रतिमेमुळे तू प्रत्यक्षात मात्र सद्विवेकी माणसाचा बुरखा घालून जीवन जगत होतास. याउलट आयशा तिचे जीवन कुंटणखान्यात व्यतीत करत होती, मात्र तिच्या मनात 'कधी या नरकातून बाहेर पडेन आणि ईश्वराची सेवा करेन' असे भाव सदैव असायचे. क्षणाक्षणाला ती ईश्वराची आठवण काढायची आणि त्याचेच हे फळ आहे की आज ती जन्नतमध्ये, तर तू जहन्नुममध्ये जात आहेस. तुझे आणि तिचे बाह्यरूप आणि अंतरात्मा यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. बाह्यरूप कितीही सुंदर का असेना, ज्याचे मन आणि अंतरात्मा कुरूप, त्याला दुसरे काय मिळणार..."
समारोप
'अंतरात्मा' ही केवळ एक गोष्ट नाही, तर ती आजच्या समाजाचं विदारक वास्तव मांडणारा एक आरसा आहे. आपण समाजात वावरताना स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी इतके धडपडतो की, त्या प्रक्रियेत आपण स्वतःच्या मनाशी किती खोटं बोलतोय, हे विसरून जातो.
सामाजिक संदेश:
आज आपण कोणालाही नाव ठेवण्यापूर्वी किंवा कोणाला 'पवित्र' आणि 'पापी' ठरवण्यापूर्वी एकदा स्वतःच्या आत डोकावून बघण्याची गरज आहे. "ज्याचं मन स्वच्छ, त्याचा देव त्याच्या जवळ," हाच या कथेचा मूळ गाभा आहे. आपण समाजात एक 'सज्जन' म्हणून वावरत असताना आपल्या अंतरात्म्याला काळिमा लागेल असं कृत्य तर करत नाही ना? याचे उत्तर प्रत्येकाने स्वतःमध्ये शोधले पाहिजे. कारण शेवटी, माणसाच्या शरीराची राख होईल, पण त्याच्या अंतरात्म्याचा सुगंध किंवा दुर्गंध हाच त्याच्या अस्तित्वाचा खरा पुरावा असेल.
लेखांवर लेख येत जातील, काही तुम्हाला हसवतील,काही रडवतील, काही कान खेचतील, हे सगळे केवळ तुमच्यासाठी मग मला तुमच्याकडून कोणती अपेक्षा करता येईल का? हो लाइक करायला विसरू नका
परत भेटीपर्यंत... जय श्रीकृष्णा!
#अंतरात्मा
#मराठी
#बोधकथा
#Spirituality
#MarathiBlog
#MoralStories
#MarathiStories
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा