श्रीराम
लेखक: कथावाचक
नमस्कार मंडळी,
भारतात मनोरंजनासाठी माणूस काहीही करेल, पण मनोरंजन करण्यासाठी सगळ्यात प्रमुख गोष्ट म्हणजे चित्रपट. नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर रितेश देशमुख याचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट ट्रेलर पाहून मी माझ्या मनातील भावना तुमच्यापुढे एका लेखाद्वारे व्यक्त केल्या, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका केलेल्या कलाकार आणि सगळ्यात भावलेली कलाकृती याबद्दलही व्यक्त झालो. हा लेख वाचायचा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा. विशेष म्हणजे हा लेख माझ्या सगळ्यात जास्तवेळ वाचलेला म्हणजेच माझ्याकडून आतापर्यंत लिहिलेला आणि लोकांनी वाचलेला लेख आहे
लेखाची लिंक: छत्रपती
आज 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला. जुन्या काळातील चित्रण, रामराज्य, त्यावेळी असलेली वेशभूषा आणि अन्य सेट उभे करणे हे अवघड काम. काही लोक सेट उभारतात, तर काही अद्ययावत तंत्रज्ञान वापरून खोटे का होईना पण दर्शनीय चित्रण करतात. रामायण चित्रपटामध्ये ती भव्यता आहे, जे चित्रण दिसते ते अविश्वसनीय आहे हे दिसले, पण ते तंत्रज्ञानाने उभारलेले आहे हे काही प्रसंगांत ओळखून येते. हे ओळखून न येणे म्हणजे चित्रपट बनवणारे यशस्वी झाले असे मानता येईल. असे अनेक चित्रपट बनले आहेत की ज्यांत तंत्रज्ञानाचा वापर असूनही ते प्रेक्षकाला ओळखता आले नाही, उदाहरण द्यायचे झाले तर टायटॅनिक, अवतार सारख्या चित्रपटांची नावे मी प्रामुख्याने घेऊ शकेल. रामायण चित्रपटातील चित्रण पाहून सर्वात प्रथम तो 'आदिपुरुष'सारखा नाही हे पाहून आनंद झाला, पण 'टायटॅनिक', 'अवतार'सारखा नाही याचे दुःख झाले. असे असले तरी रामायण चित्रपट खराब आहे असे कोणीही म्हणणार नाही. भारतीय चित्रपट तंत्रज्ञानाचा वापर करून जी भव्यता निर्माण करत आहे, ती भविष्यातील 'टायटॅनिक'साठी आज 'रामायण' हा पाया आहे.
'राम', हा दोन अक्षरी महामंत्र! त्या व्यक्तीच्या गुणांमुळे ते दैवत बनले. मर्यादापुरुषोत्तम, वडिलांचे वचन पूर्ण करणारा मुलगा, पराक्रमी युवक, आपल्या पत्नीला परत मिळवताना समुद्र ओलांडणारा व्यक्ती, युद्धात पराभव करूनही शत्रूचा सन्मान करणारा आणि दिलेले वचन पूर्ण करणारा श्रीराम हे भारतीय सनातन हिंदू धर्मातील मानाचे दैवत. जी नीतिमूल्ये आणि वागणूक यामुळे सामान्य माणूसदेखील देवता बनतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीराम. या श्रीरामाबद्दल लिहावे तेवढे थोडेच, पण आजचा विषय श्रीराम गाथा नाही, तर श्रीरामाच्या भूमिकेत आजपर्यंत कोणकोणत्या कलाकारांनी आपली कला साकारली, याबद्दल माहिती देणारा आहे. आजकाल तंत्रज्ञानाचा वापर करून ही माहिती चुटकीसरशी काढता येते आणि ती काढूनच मी तुमच्याशी आज या विषयावर बोलत आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक दिग्गज अभिनेत्यांनी प्रभू श्रीरामाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सुरुवातीच्या काळातील पौराणिक चित्रपटांपासून ते आजच्या आधुनिक VFX आधारित चित्रपटांपर्यंत ही परंपरा चालत आली आहे. येथे काही प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध कलाकारांची यादी देण्याचा माझा प्रयत्न आहे. यात सगळ्याच कलाकृतींची नोंद येईलच असे नाही, पण जास्तीत जास्त कलाकृती कोणी सादर केली हे मांडण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे.
१. एन. टी. रामाराव (N. T. Rama Rao):
दक्षिण भारताचे हे महानायक! 'लवाकुसा' (१९६३) असो किंवा इतर पौराणिक चित्रपट, त्यांनी जेव्हा श्रीरामाची भूमिका साकारली, तेव्हा लोक त्यांना प्रत्यक्ष देव मानून त्यांच्या फोटोंची पूजा करू लागले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील ते तेज आजही विसरता येत नाही. श्रीरामाचे रूप पडद्यावर साकारावे तर फक्त याच कलाकाराने, इतका दबदबा त्यांनी निर्माण केला होता. दक्षिणेत बनणाऱ्या पौराणिक कथेत श्रीविष्णू किंवा राम यांची भूमिका पडद्यावर साकारणारा दुसरा कोणीही त्यांच्याइतका यशस्वी झाला नाही, हे मी ठामपणे म्हणू शकतो. कदाचित आजच्या काळात हे सत्य लोकांना पचनी पडणार नाही, पण दक्षिणेत अजूनही या कलाकाराचे फोटो श्रीविष्णू किंवा श्रीराम या देवतेच्या प्रतिमा म्हणून पुजले जातात, हे विशेष.
२. पृथ्वीराज कपूर (Prithviraj Kapoor):
१९४०-५० च्या दशकात त्यांनी ’भारत मिलाप’ चित्रपटांत रामाची भूमिका केली होती.
३. अरुण गोविल (Arun Govil):
टीव्हीच्या पडद्यावर 'रामायण' घरघरात पोहोचवण्याचे श्रेय यांनाच जाते. आजही 'राम' म्हटले की अरुण गोविल यांचा तो स्मितहास्य असलेला चेहरा डोळ्यासमोर येतो. त्यांच्या अभिनयाने एका पिढीला रामायणाशी जोडले. आजच्या पिढीने पाहिलेला आणि सर्वश्रुत असलेला चेहरा म्हणजे अरुण गोविल. त्यांचे केवळ दिसणेच नाही, तर हसणे आणि बोलणे पाहून श्रीराम असेच दिसत असतील, असे जनतेला भासवणारा हा महान कलाकार आहे.
४. नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj):
त्यांनीही रामायण (२००२) एका मालिकेत रामाची भूमिका साकारली होती.
५. नंदामुरी बालकृष्ण (Nandamuri Balakrishna):
'श्री राम राज्यम' (२०११) या चित्रपटात त्यांनी श्रीरामाची भूमिका अत्यंत ताकदीने साकारली. जुन्या परंपरेचा वारसा त्यांनी आधुनिक काळातही समर्थपणे जपला.
६. ज्युनिअर एन.टी.आर. (Jr. NTR):
आजचा ग्लोबल स्टार! पण त्यांनी 'बाल रामायणम' (१९९६) मध्ये बालरामाची भूमिका करून आपल्या अभिनय प्रवासाची दमदार सुरुवात केली होती. एका लहान मुलाने प्रभू रामाचे गांभीर्य मांडणे हे विशेष होते.
७. प्रभास (Prabhas):
'आदिपुरुष' (२०२३) मध्ये प्रभासने 'राघव'ची भूमिका केली. तंत्रज्ञान आणि सादरीकरणावरून वाद झाले असले, तरी प्रभासने आपल्या परीने रामाची भव्यता मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा चित्रपट असा आपटला की, चित्रपट 'कसा नसावा' याचे मूर्तिमंत उदाहरणच या चित्रपटाने निर्माण केले.
८. रणबीर कपूर (Ranbir Kapoor):
आणि आता ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत, तो म्हणजे रणबीर कपूर! नव्या दमाच्या 'रामायण' चित्रपटात तो श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. खरे सांगायचे तर, ट्रेलरमध्ये अलंकार आणि मुकुटधारी रणबीर लोकांच्या समोर येतो, त्यावेळी मला तो श्रीरामाच्या भूमिकेत थोडा अयोग्य वाटला, पण इतर ठिकाणी नाव ठेवावे असे वाटले नाही. एकंदरीत अरुण गोविल यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे रामाच्या भूमिकेत रणबीरला स्वीकारणे थोडे अवघड असले, तरी हा चित्रपट मी नक्कीच पाहणार आहे. इथे त्याचे रूप किंवा त्याची कलाकारी हा माझा विषय नाही, मला पाहायचा आहे श्रीरामाचा प्रवास.
जुन्या काळातील साधेपण, प्रॅक्टिकल लाईट्स, वेशभूषा याचा आजच्या काळात घेतलेला नवीन अंदाज भव्यतेकडे गेला आहे. कदाचित वस्तुतः श्रीरामाच्या काळातील राजवाडे किंवा वेशभूषा अशा नसतील, पण चित्रपट भव्यतेचा बनवण्यासाठी आजकाल VFX तंत्रज्ञानाने आभासी जग उभे केले जाते आणि आपण ते मान्य देखील करतो; त्यामागे आहे ती आपली 'श्रद्धा'. आपला देव असाच असेल असे आपले मन सांगते आणि जर सांगत नसेल, तर तो असाच होता हे मान्य करायला लावते, हे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे.
साधेपणातदेखील लोकांनी रामायण मान्य केले असते, पण आजच्या काळात न भूतो न भविष्यती, अद्भुत आणि 'लॉर्जर दॅन लाईफ' पाहायची सवय झालेला माणूस हे चित्र स्वीकारणार यात शंका नाही. दाक्षिणात्य सिनेमे, त्यातील चित्रण आणि बॉलिवूडमधील चित्रण यात जमीन-अस्मानचा फरक आहे, तो हा चित्रपट पाहताना आपल्या सगळ्यांना जाणवेल. 'छावा', 'बाहुबली' असो की नुकताच आलेला 'धुरंधर', यांसारखाच रामायण हा चित्रपटही यशस्वी व्हावा हे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांचे स्वप्न आहे. माझी मनोमन इच्छा आहे की हा चित्रपट यशस्वी व्हावा, पण जसजसे चित्रपट प्रदर्शना जवळ येईल, तसे त्याला विनाकारण ट्रोल करण्यात येईल. रणबीर कपूर किंवा अन्य अभिनेत्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वागणे-बोलणे, त्यांचे जुने व्हिडिओ काढून चित्रपट बहिष्काराची भाषा केली जाईल. हा चित्रपट प्रसिद्धीचा एक वेगळा मार्ग आहे हे आजकाल सगळे जाणतात, तोच प्रकार आपल्याला पुन्हा अनुभवायला मिळण्याची शक्यता जास्त आहे.
माझे म्हणाल तर, श्रीरामाच्या रूपात मी पाहिलेला कलाकार म्हणजे 'अरुण गोविल'. त्यांनी वठवलेला श्रीराम मनावर असा कोरला गेला आहे की, त्यांची जागा घेऊन दुसरा कलाकार तिथे बसेल असे वाटत नाही. रणबीर ती जागा निर्माण करेल का, हे चित्रपट पाहिल्यानंतर कळेलच, पण श्रीराम म्हणजे अरुण गोविल यांचा चेहरा हे अबाधित राहणारे चित्र कोणीही मिटवू शकणार नाही, हे वास्तव कोणीही नाकारू शकणार नाही.
तुम्ही यातील कोणत्या कलाकाराला श्रीरामाच्या भूमिकेत पाहिले आहे? कोण तुम्हाला योग्य वाटले हे मला सांगणार ना? आणि श्रीरामाच्या भूमिकेत तुम्ही रणबीर कपूरला किती मार्क द्याल?
तुमचा,
कथावाचक
#Ramayan #ShriRam #IndianCinema #RanbirKapoor #ArunGovil #NTR #Kathavachak #MovieReview #MarathiVichar #AdipurushVsRamayan #RajaShivaji #RiteishDeshmukh #MythologyInCinema #VFX #IndianCulture #मराठीलेखन #रामायण #प्रभूश्रीराम
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा