ब्लॉग १०९ :गरुड: आकाशाचा राजा की विष्णूचे वाहन? जाणून घ्या विज्ञानातील चमत्कार आणि धार्मिक रहस्ये.'
रामराम मंडळी, कथावाचक या तुमच्या हक्काच्या व्यासपीठावर तुमचे स्वागत. आजपासून लेखाच्या ह्या सफरीत जंगल सफारी ही लेख मालिका समाविष्ट करत आहे. ही लेख मालिका प्रामुख्य भारतातील पक्षी प्राणी याच्यावर आधारित शैक्षणिक, विज्ञाननिष्ठ माहिती आणि बरोबर सनातन धर्मातील महत्व यावर आधारित असेल. पक्षी,प्राणी याच्या बद्दलच्या अफवा आणि सत्य यावर मार्मिक बोट ठेवले जाणार आहे. ही माहिती केवळ विद्यार्थी नाही तर घरातील आजी आजोबा यांच्यापर्यंत पोहचवण्याची मोठी जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे त्यामुळे लेख लाइक करा, शेयर करायला तर विसरूच नका.
काय मग कशी चाललीये धावपळ आज आपण अशा एका गड्याबद्दल बोलणार आहोत ज्याचा दरारा केवळ जमिनीवरच नाही तर अथांग निळ्याशार आकाशात सुद्धा आहे जेव्हा पाऊस येतो किंवा वादळ सुटतं तेव्हा बाकीचे पक्षी आपल्या घरट्यात लपून बसतात पण हा गरुड मात्र त्या वादळाच्या छाताडावर पाय देऊन ढगांच्याही वर भरारी घेतो म्हणूनच त्याला आकाशाचा अनभिषिक्त सम्राट म्हटलं जातं गरुड हा केवळ एक शिकारी पक्षी नाही तर तो अदम्य इच्छाशक्ती दूरदृष्टी आणि पराक्रमाचं जिवंत प्रतीक आहे गरुडाची माहिती घेताना विज्ञानातील चमत्कार आणि आपल्या सनातनी धर्मातील सखोलता या दोन्ही गोष्टींचा अनुभव येतो तुम्हाला वाटत असेल की हा फक्त एक पक्षी आहे पण अहो मंडळी विचार करा ज्यावेळी निसर्ग कोपतो तेव्हा हा गडी घाबरून न जाता त्या परिस्थितीचा फायदा घेऊन अजून उंचीवर जातो हीच तर खरी जिद्द आहे
सगळ्यात आधी आपण या आकाशाच्या राजाच्या शरीररचनेबद्दल आणि विज्ञानाबद्दल बोलूया गरुड हा निसर्गाचा एक उत्कृष्ट नमुना आहे त्याचे डोळे म्हणजे काय साधी गोष्ट नाही तर जणू काही आकाशात फिरणारी दुर्बीणच म्हणा ना माणसाच्या तुलनेत त्याचे डोळे आकाराने मोठे असतात आणि त्याची दृष्टी आपल्यापेक्षा पाच पटीने जास्त प्रखर असते एखादा गरुड जेव्हा आकाशात तीन चार किलोमीटर उंचीवर असतो ना तिथून सुद्धा त्याला जमिनीवर धावणारा छोटासा ससा किंवा साप अगदी स्पष्ट दिसतो विचार करा इतकी जबरदस्त नजर देवाने त्याला दिली आहे म्हणूनच शिकारीच्या बाबतीत त्याचा हात कोणी धरू शकत नाही त्याच्या पंखांचा विस्तार सुद्धा अफाट असतो हे पंख त्याला तासन् तास न थकता उडायला मदत करतात गरुड हा ऊर्जेचा वापर करण्यात खूप हुशार असतो तो हवेच्या गरम प्रवाहांचा ज्याला विज्ञानात थर्मल्स म्हणतात त्याचा वापर करून पंख न हलवता हवेत तरंगू शकतो यामुळे त्याची ताकद वाचते आणि तो जास्त वेळ टेहळणी करू शकतो
आता त्याच्या पंजांबद्दल बोलायचं झालं तर त्याचे पंजे म्हणजे पोलादासारखी मजबूत पकड आहे एकदा का शिकार तावडीत सापडली की तिची सुटका होणं निव्वळ अशक्य आहे त्याच्या पंजांचा दाब हा बंदुकीच्या गोळीसारखा घातक असू शकतो शिकार पकडली की ती फाडण्यासाठी निसर्गाने त्याला वस्तऱ्यासारखी धारदार आणि बाकदार चोच दिली आहे गरुड हा पक्का मांसाहारी प्राणी आहे तो सहसा उंच कड्यांवर किंवा गगनचुंबी झाडांवर आपली घरटी बांधतो ज्याला इंग्रजीत एरी म्हणतात तिथून त्याला अख्ख्या परिसरावर लक्ष ठेवता येतं गरुड हा स्वभावाने जरी एकाकी वाटत असला तरी तो आपल्या जोडीदाराशी आयुष्यभर एकनिष्ठ असतो संकटात असो वा सुखात हे दोघे मिळून आपलं घरटं सांभाळतात आणि पिलांचं संगोपन करतात ही कौटुंबिक निष्ठा आजच्या माणसाने शिकण्यासारखी आहे
मध्यंतरी सोशल मीडियावर आणि व्हॉट्सॲपवर एक मोठी वावडी उठली होती तुम्हालाही ती कथा माहित असेलच की गरुड वयाच्या चाळीसाव्या वर्षी एकांतवासात जातो आणि आपली चोच नखं दगडावर आपटून तोडून टाकतो मग नवीन चोच येते आणि तो पुन्हा जिवंत होतो अहो मंडळी हे पूर्णपणे खोटं आणि काल्पनिक आहे विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर हे शक्यच नाही एखाद्या पक्षाने आपली चोच तोडली तर तो जेवणार कसा आणि जर तो जेवला नाही तर नवीन चोच येईपर्यंत तो जिवंत कसा राहणार निसर्गात मौलटिंग नावाची प्रक्रिया असते ज्यामध्ये फक्त जुने पंख गळून नवीन येतात पण नखं किंवा चोच तोडण्याचा प्रकार हा निव्वळ अफवा आहे अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा निसर्गाचं खरं आणि वैज्ञानिक रूप समजून घेणं कधीही चांगलं असतं गरुड निसर्गात २० ते ३० वर्षे जगतो आणि तो मरेपर्यंत शिकारी असतो त्याचं शरीर त्याला साथ देतं कारण निसर्गाने त्याला तसंच बनवलं आहे
आता आपण वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे तो म्हणजे आपला सनातन हिंदू धर्म आणि गरुड यांचं नातं भारतीय संस्कृतीत गरुडाला देवासारखं पवित्र स्थान आहे तो साक्षात भगवान विष्णूचं वाहन आहे आता विचार करा विष्णू देवांनी गरुडालाच का निवडलं असेल तर त्यामागे एक मोठं गुपित आहे गरुड हा गती आणि सावधगिरी यांचं प्रतीक आहे भगवान विष्णू हे या अथांग सृष्टीचे पालनहार आहेत सृष्टीचं पालन करताना तुमची नजर गरुडासारखी भेदक आणि दृष्टी व्यापक असायला हवी हेच गरुड सुचवतो पुराणांमध्ये गरुडाला वेदात्मा म्हटलं आहे म्हणजेच तो वेदांचंच एक रूप आहे अशी श्रद्धा आहे की जेव्हा गरुड आकाशात उडतो आणि त्याच्या पंखांची फडफडाट होते ना तेव्हा त्यातून वेदांच्या ऋचा उमटतात इतकं महान स्थान आपण या पक्षाला दिलं आहे
अध्यात्मिक भाषेत सांगायचं तर गरुड म्हणजे आपली बुद्धी आहे जी नेहमी उंचावर झेपावण्यासाठी आतुर असते गरुड पुराणाबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल मानवाच्या मृत्यूनंतरचा प्रवास आणि धर्माचं विवेचन ज्या ग्रंथात केलं आहे त्याला गरुड पुराण म्हणतात हे नाव देण्यामागे सुद्धा हेच कारण आहे की मृत्यूकडे आणि जीवनाकडे पाहण्याची एक तटस्थ आणि उच्च दृष्टी या ग्रंथामुळे मिळते गरुड हा सापांचा शत्रू मानला जातो इथे साप म्हणजे आपल्या मनातील विकार आणि वाईट विचार आहेत गरुड ज्याप्रमाणे सापाला पकडून नष्ट करतो तसंच ज्ञानाचा गरुड आपल्या मनातील अज्ञानाचा नाश करतो म्हणूनच गरुडाची मूर्ती किंवा चित्र पाहिल्यावर मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो
निसर्गचक्रात गरुड हा अपेक्स प्रीडेटर आहे म्हणजे तो अन्नसाखळीच्या शिखरावर आहे तो साप आणि उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचं मोठं काम करतो जर गरुड नसले तर उंदरांची संख्या वाढून शेतीचं नुकसान होईल आणि निसर्गाचा समतोल बिघडेल पण दुर्दैव असं की आजच्या काळात वाढतं प्रदूषण आणि शेतात वापरली जाणारी घातक कीटकनाशकं यामुळे या आकाशाच्या राजाचं अस्तित्व धोक्यात आलं आहे डायक्लोफेनॅक सारख्या औषधांमुळे गरुडांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत या राजाला वाचवणं म्हणजे पर्यावरणाची राखण करणं आहे आपण विज्ञानाचा वापर करताना निसर्गाचा बळी देतोय का याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे
गरुड आपल्याला आयुष्याचे खूप मोठे धडे देऊन जातो तो शिकवतो की उंचीवर पोहोचणं महत्त्वाचं आहेच पण तिथे टिकून राहण्यासाठी तुमच्या नजरेत स्पष्टता आणि चारित्र्यात ताकता असायला हवी गरुड कधीही मेलेली शिकार खात नाही तो नेहमी ताजी आणि स्वतः मिळवलेली शिकार खातो यातून आपल्याला स्वावलंबनाचा धडा मिळतो परिस्थिती कितीही वाईट असो तक्रार करण्यापेक्षा पंखात बळ एकवटून आकाशाकडे झेप घेणं हाच गरुडाचा स्वभाव आहे आपणही आपल्या जीवनात जेव्हा संकटांनी वेढले जातो तेव्हा गरुडासारखा विचार केला पाहिजे संकटात घराचा आसरा शोधण्यापेक्षा संकटाच्या वर उडण्याची जिद्द ठेवली तर विजय आपलाच असतो
मंडळी तुम्हाला काय वाटतं गरुडाची ही माहिती वाचून तुमच्या मनातही त्या आकाशाच्या राजाबद्दल आदर निर्माण झाला असेलच ना गरुड हा केवळ पक्षी नाही तर तो मानवाच्या अफाट स्वप्नांचा आणि आपल्या तेजस्वी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे त्याची ती झेप आणि ती नजर आपल्या सगळ्यांना प्रेरणा देत राहो मिळालेली ही माहिती स्वतःकडे ठेवण्यापेक्षा इतरांना सांगा आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीतील ही प्रतीकं समजावून सांगा कारण जेव्हा त्यांना आपला इतिहास आणि निसर्ग कळेल तेव्हाच ते खऱ्या अर्थाने जबाबदार नागरिक बनतील
पुढच्या भागात आपण अशा एका पक्षाबद्दल बोलणार आहोत ज्याला लोक उगीचच अशुभ मानतात पण तो तर साक्षात लक्ष्मीचं वाहन आहे आणि रात्रीच्या अंधारात तो निसर्गाची राखण करतो ओळखा पाहू कोण असेल तो चला तर मग पुन्हा भेटूच अशाच एका जळजळीत आणि रंजक विषयावर बोलण्यासाठी तोपर्यंत सावध राहा विवेकाने वागा आणि आपल्या सनातनी संस्कृतीचा अभिमान बाळगा
जयोस्तुते
परत भेटीपर्यंत जय श्रीकृष्णा........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा