केकेआर (KKR)
"करबो, लरबो, जीतबो रे!" हे केवळ केकेआरचे घोषवाक्य नाही, तर ईडन गार्डन्सच्या मैदानात घुमणारा एक हुंकार आहे. आयपीएल २०२६ चा बिगुल वाजला असून क्रिकेट रसिक आता आपल्या आवडत्या संघाच्या रणनीतीवर चर्चा करू लागले आहेत. आयपीएल २०२६ चा महासंग्राम या लेखाच्या श्रृंखलेमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघाबद्दल. यंदाच्या हंगामात केकेआरच्या ताफ्यात मोठे बदल पाहायला मिळत असून चाहत्यांच्या नजरा नव्या समीकरणांकडे लागल्या आहेत. ईडन गार्डन्सच्या हिरवळीवर जांभळ्या रंगाची ही फौज पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. पण यंदाचे आव्हान सोपे नाही, कारण संघात काही नवे चेहरे आले आहेत तर काही जुने हिरे आता दुसऱ्या ताफ्यात चमकत आहेत. या लेखात आपण केकेआरच्या २०२६ च्या संपूर्ण स्क्वॉडचा, त्यांच्या बलस्थानांचा आणि त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. अजिंक्य रहाणेच्या रूपात संघाला एक नवा आणि तितकाच शांत डोक्याचा कर्णधार मिळाला आहे, ज्याच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी आहे. लिलावातील गुंतागुंत आणि दुखापतींचे सत्र यातून मार्ग काढत केकेआरने आपला ताफा सजवला आहे. चला तर मग, जाणून घेऊया आयपीएल २०२६ साठी कोलकाता नाईट रायडर्सची संपूर्ण रणनीती आणि त्यांचा संभाव्य खेळ!
केकेआर (KKR) संपूर्ण स्क्वॉड २०२६
फलंदाज (Batters)
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, मनीष पांडे, राहुल त्रिपाठी, रोवमन पॉवेल.
अष्टपैलू (All-rounders)
सुनील नरेन, कॅमेरून ग्रीन, रचिन रवींद्र, रमणदीप सिंग, अनुकूल रॉय, सार्थक रंजन, दक्ष कामरा.
यष्टीरक्षक (Wicket-keepers)
फिन ॲलन, टिम सायफर्ट, तेस्वी सिंग दहिया.
गोलंदाज (Bowlers)
वरुण चक्रवर्ती, मथीशा पाथिराना, हर्षित राणा, वैभव अरोरा, उमरान मलिक, आकाश दीप, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, ब्लेसिंग मुझाराबानी.
सध्या मथीशा पाथिराना आणि हर्षित राणा हे दोघेही दुखापतग्रस्त असल्याने संघाबाहेर राहतील, ही केकेआर संघासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. बांगलादेशी खेळाडूला संघात निवडून आधीच डोकेदुखी वाढवलेल्या या संघाने, जनतेच्या क्षोभापासून वाचण्यासाठी ब्लेसिंग मुझाराबानी याला बदली खेळाडू म्हणून घेतले आहे. आता वाद निवळला असला तरी लोकांमध्ये चर्चा तर होणारच, नाही का? व्यंकटेश अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांसारखे बरेच हिरे एकतर संघ सोडून गेले किंवा केकेआरने त्यांना रिलीज केले.
संघाचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे:
मुख्य प्रशिक्षक: अभिषेक नायर
मार्गदर्शक (मेंटॉर): ड्वेन ब्राव्हो
सहाय्यक प्रशिक्षक: शेन वॉटसन
गोलंदाजी प्रशिक्षक: टिम साऊदी
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक: दिशांत याज्ञिक
पॉवर कोच: आंद्रे रसेल
शाहरुख खान मालक असल्याने सुरुवातीपासूनच केकेआर संघ प्रसिद्ध होताच, पण संघाने केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी प्रचंड समर्थक मिळवले आहेत.
केकेआर आयपीएल आकडेवारी (२००८-२०२५)
एकूण सामने: २७१
विजय: १३५
पराजय: १२४
टाय: ४
अनिर्णित: ८
विजयाची टक्केवारी: ५०.१८%
विशेष उपलब्धी:
१. आयपीएल विजेतेपद: ३ वेळा (२०१२, २०१४, २०२४)
२. सलग सर्वाधिक विजय: १४ सामने (२०१४-१५ चा विक्रम)
३. सर्वोत्तम नेट रन रेट: +१.४२८ (२०२४ चा हंगाम)
४. उपविजेतेपद: १ वेळा (२०२१)
५. ईडन गार्डन्सवरील सर्वाधिक धावांचा विक्रम.
केकेआरची प्लेइंग ११ निवडताना काही खेळाडूंची जागा निश्चित आहे, पण काही महत्त्वाचे खेळाडू जखमी असल्याने सुरुवातीला संघ निवडताना बरीच जोखीम असणार आहे; संघ सध्या 'सेटल' वाटत नाहीये. खेळाडूंना योग्य संधी देत प्लेइंग ११ निवडण्याचे अवघड काम कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर आले आहे. खालील प्लेइंग ११ असेलच असे नाही, पण माझा अंदाज व्यक्त करताना एक मजबूत संघ म्हणून खालील नावे समोर येत आहेत:
केकेआर (KKR) संभाव्य प्लेइंग ११ - २०२६
१. सुनील नरेन (परदेशी)
२. फिन ॲलन (परदेशी आणि यष्टीरक्षक)
३. अंगक्रिश रघुवंशी
४. अजिंक्य रहाणे (कर्णधार)
५. रिंकू सिंग
६. कॅमेरून ग्रीन (परदेशी)
७. रमणदीप सिंग
८. वरुण चक्रवर्ती
९. वैभव अरोरा
१०. ब्लेसिंग मुझाराबानी (परदेशी)
११. आकाश दीप
एकापेक्षा एक सरस आणि एकसारखे अनेक खेळाडू असल्याने, यावेळी अचूक संघ निवडताना केकेआरची मोठी दमछाक होणार आहे. कदाचित ही ओढाताण शेवटपर्यंत चालू राहिल्यास संघ यावेळी ट्रॉफी जिंकण्याच्या जवळ जाईल असे वाटत नाही. मनीष पांडे, राहुल त्रिपाठी, रोवमन पॉवेल, टिम सायफर्ट आणि रचिन रवींद्र यांसारख्या खेळाडूंना कधी आणि कशी संधी द्यायची, हा प्रश्न व्यवस्थापनाला सतत पडताना दिसेल. कार्तिक त्यागी आणि अनुकूल रॉय यांसारखे खेळाडू ही डोकेदुखी अजून वाढवतील. शेवटपर्यंत योग्य प्लेइंग ११ निवडण्यात जर गोंधळ उडाला, तर केकेआर संघ मैदानात ताळमेळ दाखवून स्पर्धेचे विजेतेपद मिळवेल की नाही, याबाबत माझ्या मनात शंका आहे.
केकेआर २०२६ मधील 'मॅच-विनर्स':
सुनील नरेन (अष्टपैलू): हा खेळाडू केकेआरचा सर्वात मोठा हुकुमी एक्का आहे. मिस्ट्री स्पिन आणि पॉवरप्लेमधील फटकेबाजीने तो एकहाती सामना फिरवू शकतो.
रिंकू सिंग (फलंदाज): कठीण प्रसंगी शांत राहून विजय मिळवून देणारा 'फिनिशर किंग' म्हणून रिंकूवर मोठी मदार असेल.
कॅमेरून ग्रीन (अष्टपैलू): संघातील सर्वात महागडा खेळाडू असलेला ग्रीन आपल्या अष्टपैलू कौशल्याने संघाला संतुलन देतो.
वरुण चक्रवर्ती (गोलंदाज): वरुणची फिरकी आजही फलंदाजांसाठी एक कोडे आहे, विशेषतः ईडन गार्डन्सवर तो कमालीचा घातक ठरतो.
फिन ॲलन / टिम सायफर्ट (यष्टीरक्षक): हे सलामीवीर आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांवर सुरुवातीपासून दडपण निर्माण करू शकतात.
अजिंक्य रहाणे (कर्णधार): अनुभवी कर्णधार म्हणून रहाणेचा शांत स्वभाव आणि डावाला आकार देण्याची पद्धत विजयासाठी मोलाची ठरेल.
केकेआर (KKR) राखीव फळीतील प्रतिभावान खेळाडू २०२६:
१. राहुल त्रिपाठी आणि मनीष पांडे यांच्या रूपाने केकेआरकडे अत्यंत अनुभवी भारतीय फलंदाज उपलब्ध आहेत, जे डावाला स्थिरता देऊ शकतात.
२. उमरान मलिक आणि कार्तिक त्यागी यांच्याकडे ताशी १५० किमी पेक्षा जास्त वेग असून, ते 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून मोठी भूमिका बजावू शकतात.
३. रचिन रवींद्र हा जागतिक दर्जाचा अष्टपैलू पर्याय असून तो कोणत्याही परदेशी खेळाडूची जागा घेऊ शकतो.
४. रोवमन पॉवेल आणि टिम सायफर्ट शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज आहेत.
५. प्रशांत सोलंकी आणि अनुकूल रॉय यांच्यामुळे फिरकीमध्ये वैविध्य आणण्याची संधी मिळते.
६. सार्थक रंजन आणि दक्ष कामरा यांसारख्या युवा खेळाडूंकडे भविष्यातील स्टार बनण्याची क्षमता आहे.
सरतेशेवटी, केकेआरसाठी २०२६ चा हा हंगाम म्हणजे कर्माची परीक्षा आणि कौशल्याचा कस पाहणारा ठरणार आहे, यात शंका नाही. कागदावर संघ मजबूत वाटत असला तरी, मैदानावरील प्रत्यक्ष कामगिरी आणि खेळाडूंचा ताळमेळ हाच विजयाचा मुख्य मार्ग असेल. दुखापतींचे सावट आणि मुख्य खेळाडूंची अनुपस्थिती यामुळे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचा खरा कस लागणार आहे. एक चाहता म्हणून आम्हाला आशा आहे की, ईडन गार्डन्सवर पुन्हा एकदा 'करबो लरबो जीतबो'चा जल्लोष ऐकायला मिळेल. परंतु, संघ निवडीतील धरसोड वृत्ती आणि खेळाडूंचे सतत बदलणारे स्थान केकेआरला महागात पडू शकते. यंदा ही 'पर्पल आर्मी' चौथ्या विजेतेपदाला गवसणी घालणार की केवळ चर्चेचा विषय ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तुम्हाला काय वाटते? केकेआरची ही प्लेइंग ११ यंदा कमाल दाखवू शकेल का? कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि तुमच्या मते केकेआरचा 'एक्स-फॅक्टर' कोण असेल ते सांगा. क्रिकेटच्या या महाकुंभातील अशाच रंजक विश्लेषणासाठी आमच्या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग, भेटूया पुढच्या लेखात, एका नवीन संघाच्या रणनीतीसह!
#KKR #IPL2026 #KolkataKnightRiders #CricketAnalysis #AjinkyaRahane #RinkuSingh #IPLUpdates #MarathiBlog #Kathavachak #PurpleArmy #AmiKKR #CricketFever
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा