चाकण रहदारीच्या गर्दीचे आणि कुत्र्यांच्या दहशतीचे
चाकणच्या रक्ताळलेल्या वाटा आणि प्रशासकीय कर्तव्याची जळजळीत हाक: एक मूक आक्रोश
पुणे जिल्ह्याचे औद्योगिक प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे चाकण आज एका अत्यंत भीषण आणि अस्वस्थ करणाऱ्या वळणावर येऊन ठेपले आहे. चाकण म्हंटले की पंचक्रोशीतील लोकांना आठवते रस्त्यावरची रहदारी, वेळखाऊ आणि अडकून राहण्याची भीती पण आज ह्या विषयावर भाष्य न करता एक वेगळी चर्चा, एक भयानक सत्य यावर बोलायची वेळ आहे. ज्या चाकणच्या प्रगतीची चर्चा जगभर होते, त्याच चाकणच्या गल्लीबोळांतून आज मृत्यूचे तांडव उघड्या डोळ्यांनी पहावे लागत आहे. ही वेळ केवळ हळहळ व्यक्त करण्याची नाही, तर प्रशासकीय व्यवस्थेच्या डोळ्यांत अंजन घालून त्यांना त्यांच्या प्राथमिक कर्तव्याची जाणीव करून देण्याची आहे. जेव्हा एका ३२ वर्षीय महिलेचा अर्धा डझन कुत्र्यांच्या टोळीने अमानुषपणे लचके तोडून जीव घेतला, तेव्हा ती केवळ एका कुटुंबाची हानी नव्हती, तर ती संपूर्ण चाकणच्या सुरक्षिततेवर झालेला एक वर्मी घाव होता. या रक्ताळलेल्या घटनेने हे सिद्ध केले आहे की, इथला सामान्य नागरिक आता आपल्याच शहरात परका आणि असुरक्षित झाला आहे. प्रशासनाने आता कागदी घोडे नाचवणे थांबवून जमिनीवरचे दाहक वास्तव स्वीकारण्याची वेळ आली आहे, कारण मानवी जिवापेक्षा मोठे कोणतेही नियम किंवा कायदे असूच शकत नाहीत.
रात्रीचा प्रहर सुरू झाला की चाकणचे चित्र पूर्णपणे पालटून जाते. ज्या रस्त्यांवरून कष्टकरी कामगार, महिला आणि तरुण आपली रोजीरोटी कमावून घरी परतत असतात, त्याच रस्त्यांवर कुत्र्यांच्या टोळ्यांचे जणू समांतर सरकार सुरू होते. मध्यरात्रीच्या त्या भयाण शांततेत जेव्हा कुत्र्यांच्या भुंकण्याचा आणि एकमेकांवर तुटून पडण्याचा आवाज घुमतो, तेव्हा घराघरांत झोपलेली लहान मुले दचकून जागी होतात. हा केवळ आवाज नसून ती एक दहशत आहे, जी सांगते की आता बाहेर पडणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे. चाकण नगरपरिषदेच्या हद्दीत रात्रीच्या वेळी गस्त घालताना या कुत्र्यांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करणे हे प्रशासनाचे पहिले कर्तव्य असायला हवे. दिवसाच्या गजबजाटात जे कुत्रे शांत वाटतात, तेच रात्रीच्या अंधारात हिंसक शिकारी बनतात. या रात्रीच्या साम्राज्याला वेसण घालण्यासाठी प्रशासनाकडे कोणती ठोस यंत्रणा आहे, हा प्रश्न आज प्रत्येक चाकणकर विचारत आहे.
चक्रेश्वर मंदिराजवळच्या परिसरात जेव्हा एका निष्पाप लहान मुलावर कुत्र्यांनी हल्ला केला, तेव्हाच प्रशासकीय यंत्रणेने सतर्क व्हायला हवे होते. मंदिर हे श्रद्धेचे आणि शांततेचे स्थान, तिथेही जर आमची मुले सुरक्षित नसतील, तर आम्ही जायचे कुठे? आंबेठाण चौकात पिसाळलेल्या कुत्र्याने जेव्हा अनेकांना चावा घेतला, तेव्हा ती केवळ एक वैद्यकीय आणीबाणी नव्हती, तर तो एक प्रशासकीय इशारा होता. पिसाळलेला कुत्रा हा संपूर्ण समाजासाठी एक चालता-फिरता बॉम्ब असतो. अशा वेळी केवळ 'लसीकरण करू' किंवा 'नसबंदी करू' अशी आश्वासने देऊन भागणार नाही. पिसाळलेल्या आणि हिंसक झालेल्या कुत्र्यांना समाजातून तातडीने बाजूला करणे, ही प्रशासनाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. या घटनांकडे केवळ सुट्या सुट्या घटना म्हणून न पाहता, ती एका मोठ्या संकटाची नांदी आहे हे प्रशासनाने ओळखले पाहिजे.
आता प्रश्न उरतो तो म्हणजे प्रशासनाने नेमके काय करायला हवे? केवळ कायद्याचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेऊन हात वर करणे, हे एका जबाबदार प्रशासनाला शोभणारे नाही. 'ॲनिमल बर्थ कंट्रोल' (ABC) नियमावलीनुसार कुत्र्यांना मारता येत नाही, हे सर्वमान्य आहे; पण त्याच नियमावलीत हिंसक आणि आजारी कुत्र्यांच्या व्यवस्थापनाचे अधिकारही प्रशासनाला दिलेले आहेत. चाकण नगरपरिषदेने आता 'इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम' तयार करणे काळाची गरज आहे. ही टीम केवळ नावापुरती नसावी, तर त्यांच्याकडे आधुनिक डॉग व्हॅन, प्रशिक्षित कर्मचारी आणि कुत्र्यांना सुरक्षितपणे पकडण्याची साधने असावीत. तक्रार आल्यावर तातडीने घटनास्थळी पोहोचून त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, हे या पथकाचे मुख्य काम असायला हवे.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चाकणच्या सीमावर्ती भागात किंवा शहराबाहेर एक भव्य आणि सुसज्ज 'डॉग शेल्टर होम' किंवा निवारा केंद्र उभारणे. निव्वळ नसबंदी करून कुत्र्यांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडल्याने त्यांची आक्रमकता कमी होत नाही, हे आता सिद्ध झाले आहे. ज्या भागांत कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत, तिथल्या संपूर्ण टोळ्या उचलून त्यांना अशा निवारा केंद्रात ठेवणे, हाच एकमेव शाश्वत उपाय आहे. तिथे त्यांच्यावर उपचार करणे, त्यांना अन्न देणे आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे, हे काम स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रशासनाने हाती घ्यायला हवे. जर आम्ही मोठमोठी औद्योगिक संकुले उभारू शकतो, तर मानवी जीव वाचवण्यासाठी एक निवारा केंद्र का उभारू शकत नाही, हा जळजळीत प्रश्न आज प्रशासनासमोर उभा आहे.
कचरा व्यवस्थापन हा या समस्येचा दुसरा पैलू आहे. चाकणमधील हॉटेल व्यावसायिक आणि मांस विक्रेते अनेकदा उरलेले अन्न आणि टाकाऊ पदार्थ उघड्यावर टाकतात. हेच अन्न कुत्र्यांना टोळ्या बनवण्यासाठी आणि आक्रमक होण्यासाठी पोषक ठरते. नगरपरिषदेने अशा व्यावसायिकांवर अत्यंत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. जोपर्यंत रस्त्यावर अन्नाचे स्त्रोत उपलब्ध असतील, तोपर्यंत कुत्र्यांची संख्या कमी होणार नाही. कचरा कुंड्यांची नियमित स्वच्छता आणि हॉटेल वेस्टचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे, यासाठी प्रशासनाने कडक नियमावली लागू करून त्याची अंमलबजावणी करायला हवी. उघड्यावर अन्न टाकणे हा केवळ अस्वच्छतेचा प्रश्न नसून तो सार्वजनिक सुरक्षिततेशी जोडलेला गंभीर गुन्हा मानला गेला पाहिजे.
प्रशासकीय संवेनशीलता हा या संपूर्ण प्रकरणातील सर्वात कळीचा मुद्दा आहे. जेव्हा एखादी दुर्घटना घडते, तेव्हा केवळ पंचनामा करणे आणि शासकीय मदत जाहीर करणे, एवढ्यापुरतेच प्रशासनाचे काम मर्यादित नसते. तर अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य असते. चाकणच्या प्रत्येक प्रभागात कुत्र्यांची गणना होणे, त्यांचे लसीकरण पूर्ण करणे आणि ज्या भागात कुत्रे जास्त आहेत तिथे रात्रीची गस्त वाढवणे, या साध्या वाटणाऱ्या पण अत्यंत प्रभावी गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाने आता एसी केबिनमधून बाहेर पडून रस्त्यावरच्या या वास्तवाचा सामना करायला हवा. सामान्य माणसाचा कररूपी पैसा जर त्याच्या जिवाच्या रक्षणासाठी वापरला जात नसेल, तर त्या व्यवस्थेवरचा विश्वास उडू लागतो.
चाकण हे केवळ कंपन्यांचे शहर नाही, तर ते हजारो कष्टकऱ्यांच्या स्वप्नांचे शहर आहे. इथे येणारा प्रत्येक कामगार, इथे राहणारी प्रत्येक गृहिणी आणि शाळेत जाणारे प्रत्येक मूल हे सुरक्षित असलेच पाहिजे. आज पालकांच्या मनात आपल्या मुलाला दुकानात पाठवताना जी भीती दाटून येते, ती भीती घालवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. 'नियम आडवे येतात' ही पळवाट आता जुनी झाली आहे. नियमांच्या आत राहूनही लोकांचा जीव वाचवता येतो, फक्त त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. चाकण नगरपरिषदेने आता युद्धपातळीवर हालचाली करून या भटक्या कुत्र्यांच्या संकटाचा कायमचा बंदोबस्त करावा, हीच संपूर्ण चाकणकरांची मागणी आहे.
शेवटी, प्रशासन हे जनतेसाठी असते, जनता प्रशासनासाठी नसते. एका महिलेचा गेलेला जीव आणि अनेक मुलांच्या शरीरावर उमटलेले कुत्र्यांच्या दाढांचे वळ हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर लागलेला एक डाग आहे. हा डाग पुसण्यासाठी आता केवळ चर्चा नको, तर कृती हवी आहे. चाकणच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा निर्भयपणे चालता येईल, असे वातावरण निर्माण करणे हेच आजच्या घडीला प्रशासनासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. जर आज आपण गप्प बसलो आणि प्रशासनाने आपले डोळे झाकून घेतले, तर उद्याचा सूर्योदय आणखी एखादी भीषण बातमी घेऊन येईल. म्हणूनच, ही वेळ जागे होण्याची आहे, ही वेळ कर्तव्याची आहे आणि ही वेळ चाकणला पुन्हा एकदा सुरक्षित बनवण्याची आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा