हनुमान
लेखक: कथावाचक
ज्या ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे नाव घेतले जाते, तिथे अदृश्य रूपात एक शक्ती उपस्थित असतेच ते म्हणजे 'हनुमान'. आजच्या धावपळीच्या युगात आपण अनेक पाश्चात्य 'सुपरहिरोज'च्या मागे धावतो, पण खऱ्या अर्थाने ज्याच्याकडे अष्टसिद्धी आणि नवनिधींचे साम्राज्य आहे, अशा महाबली हनुमंताचा आवाका आपण विसरलो आहोत. हनुमानाचे चरित्र केवळ रामायणातील एक पात्र म्हणून न पाहता, ती एक 'शक्ती' म्हणून समजून घेणे काळाची गरज आहे.
हनुमानाचा जन्म ही केवळ एक पौराणिक कथा नसून, ती एक दैवी योजना होती. रावणासारख्या अहंकारी शक्तीचा नाश करण्यासाठी जेव्हा भगवान विष्णूंनी रामावतार घेतला, तेव्हा त्यांच्या मदतीसाठी भगवान शंकरांनी आपला 'अकरावा रुद्र अवतार' घेण्याचे ठरवले.
माता अंजनी आणि पिता केसरी यांनी केलेल्या कठोर तपस्येचे फळ म्हणजे हनुमान. असे म्हटले जाते की, अयोध्येत जेव्हा राजा दशरथाने पुत्राप्राप्तीसाठी यज्ञ केला होता, तेव्हा त्यातील खीर एक भाग पवनदेवाने अंजनी मातेपर्यंत पोहोचवला. म्हणूनच हनुमानाला 'अंजनीपुत्र' आणि 'पवनपुत्र' या दोन्ही नावांनी ओळखले जाते. हनुमानाचा जन्म हा अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या एका महान योद्ध्याचा उदय होता.
हनुमानाचे बालपण अतिशय विलक्षण होते. खेळता खेळता त्याने सूर्याला फळ समजून गिळण्याचा प्रयत्न केला. पण याच बालपणात एका ऋषींच्या शापामुळे हनुमानाला त्याच्या अफाट शक्तीचा विसर पडला. हा शाप खरं तर एक वरदानच होता. कारण शक्ती जेव्हा अफाट असते आणि मन चंचल असते, तेव्हा अहंकार येण्याची भीती असते.
आजच्या काळातही आपल्याकडे खूप टॅलेंट असते, पण आपण स्वतःच्या क्षमतेवर संशय घेतो. हनुमानालाही त्याच्या शक्तीची आठवण करून देण्यासाठी 'जांबुवंता' सारख्या मार्गदर्शकाची गरज लागली. समुद्र ओलांडताना जेव्हा हनुमान शांत बसले होते, तेव्हा जांबुवंताने त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली आणि मग जो 'टेक-ऑफ' हनुमानाने घेतला, त्याने इतिहास रचला.
हनुमान आणि प्रभू श्रीराम यांची भेट हा नियतीने रचलेला एक अदृश्य 'प्लॅन' होता. जेव्हा प्रभू श्रीराम सीतेच्या शोधात ऋष्यमूक पर्वताजवळ पोहोचले, तेव्हा सुग्रीवाच्या सांगण्यावरून हनुमानाने एका बटू ब्राह्मणाचे रूप घेऊन त्यांची परीक्षा घेतली. हनुमानाने रामाशी इतक्या शुद्ध आणि संस्कृत प्रचुर भाषेत संवाद साधला की, साक्षात श्रीराम थक्क झाले. पण खरा 'टर्निंग पॉईंट' तेव्हा आला जेव्हा हनुमानाला जाणीव झाली की, समोर उभी असलेली व्यक्ती साक्षात विष्णूचा अवतार आहे. ज्या क्षणी हनुमानाने रामाचे पाय धरले, त्या क्षणी एका 'दास्य भक्ती'चा जन्म झाला. हनुमानाची भक्ती ही 'कंत्राटी' नव्हती; त्याने कधीच रामाकडे काही मागितले नाही. तो देहाच्या दृष्टीने दास होता, पण आत्म्याच्या दृष्टीने रामाशी एकरूप होता.
हनुमान चालिसेमध्ये आपण वाचतो "अष्ट सिद्धि नव निधि के दाता". या आठ शक्ती आजही विज्ञानाला कोड्यात टाकतात:
१. अणिमा: शरीर अणूइतके लहान करणे.
२. महिमा: शरीर पर्वतासारखे प्रचंड मोठे करणे.
३. गरिमा: स्वतःचे वजन प्रचंड वाढवणे (भीमाचा गर्व हरण करताना हनुमानाने हेच केले होते).
४. लघिमा: स्वतःचे वजन कापसासारखे हलके करणे.
५. प्राप्ती: कोणतीही वस्तू मिळवणे आणि प्राण्यांची भाषा समजणे.
६. प्राकाम्य: पृथ्वीच्या खोलवर जाणे किंवा कोणत्याही रूपात प्रकट होणे.
७. ईशित्व: निसर्गावर नियंत्रण मिळवणे.
८. वशित्व: इंद्रियांवर विजय मिळवणे.
पंचमुखी हनुमान: पाच दिशांचे रक्षण
हनुमानाचे 'पंचमुखी' रूप हे केवळ शक्तीचे नाही, तर पूर्णतेचे प्रतीक आहे. अहिरावणाचा वध करण्यासाठी हनुमानाने हे रूप धारण केले होते. या पाच मुखांचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे:
* हनुमान (पूर्व): शत्रूचा नाश आणि मनाची शांती.
* नरसिंह (दक्षिण): भीती आणि संकटांपासून मुक्ती.
* गरुड (पश्चिम): विषबाधा आणि नकारात्मकतेपासून संरक्षण.
* वराह (उत्तर): समृद्धी आणि कीर्ती.
* हयग्रीव (आकाश/वर): ज्ञान आणि बुद्धिमत्तेची प्राप्ती.
खूप लोकांना प्रश्न पडतो की शनिवारी हनुमानाची पूजा का करतात? लंकेत रावणाने सर्व ग्रहांना आपल्या पायाखाली दाबून ठेवले होते. जेव्हा हनुमानाने लंका दहन केले, तेव्हा त्यांनी शनी देवाची सुटका केली. शनी देवाने प्रसन्न होऊन वर दिला की, जो कोणी हनुमानाची भक्ती करेल, त्याला माझी पीडा सतावणार नाही. म्हणूनच ज्यांच्या पत्रिकेत 'साडेसाती' आहे, त्यांच्यासाठी हनुमान हा सर्वात मोठा 'सुरक्षा कवच' आहे.
काही लोक हनुमानाच्या उडण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पण ज्याला सूर्याच्या आणि पृथ्वीच्या अंतराचे अचूक ज्ञान हजारो वर्षांपूर्वी होते, त्याच्या बुद्धीचा दर्जा काय असेल, याचा विचार 'शेखचिल्ली' विचारवंतांनी करायला हवा. हनुमानाने प्रत्येक वेळी 'मॅच विनिंग' कामगिरी केली आहे.
हनुमानाचे चरित्र अथांग आहे. तो 'चिरंजीवी' आहे, म्हणजेच तो आजही आपल्यात आहे. आजची तरुण पिढी नैराश्याने ग्रस्त आहे, अशा वेळी हनुमंताचे स्मरण हे आत्मबळ मिळवण्याचे सर्वात मोठे साधन आहे. सीतेचा शोध असो किंवा लक्ष्मण मूर्च्छित झाल्यावर द्रोणागिरी पर्वत उचलून आणणे हनुमानाने कधीही 'अशक्य' हा शब्द वापरला नाही.
बोल बजरंग बली की जय! राम राम! जय श्रीराम
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा