फसवा रिॲलिटी बिग बॉस,
लेखक: कथावाचक
रिअॅलिटी शोचा बुरखा
बिग बॉस मराठीच्या सुरुवातीच्या पर्वांमध्ये जेव्हा हा शो टीव्हीच्या पडद्यावर आला, तेव्हा मराठी प्रेक्षकांसाठी ते एक वेगळं जग होतं. माणसाच्या स्वभावातील पैलू, दबावाखाली काम करताना होणारी चिडचिड, प्रेम, मैत्री आणि रागाचा उद्रेक हे सगळं नैसर्गिक वाटायचं. कलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये ज्या कलाकारांना आपण पाहतो, ते कलाकार आपल्या दैनदिन जगण्यात कसे वागतात, कसे बोलतात आणि महत्त्वाचं म्हणजे ते संकटात किंवा वादात कशी प्रतिक्रिया देतात, हे पाहण्याची एक मोठी उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात असायची. पण जसजसे सिझन पुढे सरकले, तसतसा या शोचा खरा चेहरा समोर येऊ लागला आहे. आज हा शो 'रिअॅलिटी' राहिलेला नसून, तो केवळ एक साचेबद्ध आणि व्यावसायिक ड्रामा झाला आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. सुरुवातीला कधीच बिग बॉस न पाहिलेले प्रेक्षक टास्क आणि भांडणं पाहून कुतूहल व्यक्त करायचे, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज जे स्पर्धक या घरात प्रवेश करतात, ते मागचे सर्व सिझन अक्षरशः 'घोकून' किंवा त्याचा सखोल अभ्यास करून येतात. घरात गेल्यावर कोणत्या वेळी कोणता पवित्रा घ्यायचा, कोणाशी भांडल्यावर जास्त फुटेज मिळेल, कॅमेरासमोर कसं रडायचं किंवा कसं ओरडायचं, हे सगळं त्यांच्या डोक्यात आधीच ठरलेलं असतं. सुरुवातीच्या काळात स्पर्धक निरागस असायचे, पण आता येणारा प्रत्येक स्पर्धक स्वतःला एका स्क्रिप्टेड भूमिकेत फिट करण्यासाठी येतो. हे कलाकार घरात जाताना कलेसाठी जात नाहीत, तर 'स्क्रीन टाईम' मिळवून, वीकेंडच्या वारमध्ये आपल्या नावाची चर्चा घडवून प्रसिद्धी किंवा कुप्रसिद्धीच्या जोरावर घरातील मुक्काम जास्तीत जास्त कसा लांबवता येईल, हेच त्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे या खेळाडूंचा आर्थिक डाव; त्यांना ठाऊक असते की जितका जास्त काळ ते घरात टिकतील, तितकी जास्त प्रसिद्धी मिळेल आणि मुक्काम वाढल्यामुळे पर डे किंवा पर वीक मिळणारे गलेलठ्ठ मानधन खिशात पडत राहील. हा कलेचा सन्मान नसून केवळ व्यवहाराचे गणित आहे.
चित्रपट किंवा नाटकामध्ये कलाकारांना एक लेखी स्क्रिप्ट दिली जाते आणि त्यांना त्या चौकटीत राहून अभिनय करावा लागतो, पण बिग बॉसच्या बाबतीत ही 'स्क्रिप्ट' वेगळ्या आणि घातक पद्धतीने काम करते. इथे खेळाडूंना कागदावरचे संवाद दिले जात नसतीलही, पण हा खेळ व्यवस्थापित करणारी टीम पूर्णपणे 'स्क्रिप्टेड' असते. बिग बॉसची टीम हा खेळ एखाद्या बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे खेळत असते आणि खेळाडू हे केवळ त्यांच्या बोटावर नाचणारे 'पपेट्स' (बाहुले) असतात. व्यवस्थापन टीमला शोचा पूर्ण ग्राफ, कोणाला कधी हिरो बनवायचं आणि कोणाला कधी व्हिलन म्हणून समोर आणायचं, हे आधीच माहित असतं. या टीमला जे रिझल्ट्स अभिप्रेत असतात, ते साध्य करण्यासाठी ते खेळाडूंना आपल्या तालावर नाचवतात. खेळाडू सुद्धा या व्यवस्थापनाच्या बोटावर नाचायला तयार होतात, कारण त्यांना प्रसिद्धी आणि पैशांचा हव्यास असतो. जितके दिवस ते घरात राहतील, तितके दिवस ते जनतेला दिसतील आणि त्यांचा खिसा भरत राहील. या प्रसिद्धीसाठी स्वतःचे व्यक्तिमत्व गहाण ठेवून व्यवस्थापनाला हवा तसा 'ड्रामा' निर्माण करणे ही या खेळाडूंची मजबुरी आणि रणनीती दोन्ही असते.
या खेळात पारदर्शकता नावाची गोष्ट आता उरलेली नाही. बिग बॉस टीमला जे अपेक्षित असतं ते साध्य करण्यासाठी वेळेनुसार नियमांमध्ये सोयीस्कर बदल करणं ही या खेळाची सर्वात मोठी 'गुप्त स्क्रिप्ट' आहे. कधी अचानक 'नो एलिमिनेशन' घोषित केलं जातं, तर कधी एखाद्या लाडक्या पण खेळातील कच्च्या खेळाडूला वाचवण्यासाठी नियमांची मोडतोड केली जाते. टास्कची रचना आणि त्यात होणारी ग्रुप विभागणी ही अशा प्रकारे केली जाते की, ज्यांना बिग बॉसला कपटी म्हणून रंगवायचं आहे, तोच नेमका तसा दिसेल आणि ज्या खेळाडूचा उपयोग शोसाठी संपला आहे, त्याला पद्धतशीरपणे नॉमिनेशनच्या कचाट्यात आणलं जातं. हा खेळ किती साचेबद्ध आहे, हे त्यातील टास्कवरून सहज समजतं. एवढी मोठी टीम आणि बजेट असूनही प्रत्येक सिझनमध्ये तेच ते रटाळ आणि जुने टास्क पुन्हा पुन्हा का खेळवले जातात? याचं साधं उत्तर म्हणजे 'प्रेडिक्टेबल रिअॅक्शन'. गल्लीतल्या लहान मुलालाही आता समजतं की अमुक एक टास्क आला की त्यात पुढे काय होणार आहे, मग कलाकार काय दूधखुळे असतात का? त्यांनाही हे सगळं माहित असतं आणि ते त्याच साच्यात राहून आपला अभिनय करत राहतात. टास्कच्या माध्यमातून ठराविक लोकांमध्ये भांडणे लावून टीआरपी मिळवणे हाच या व्यवस्थापनाचा मुख्य अजेंडा असतो.
या प्रक्रियेत 'वीकेंडचा वार' हा सर्वात मोठा 'मिसलीडिंग' प्रकार वाटतो. आठवडाभर खेळाडू जे काही करतात, त्याचं विश्लेषण करताना सूत्रसंचालकाच्या माध्यमातून बिग बॉसला कोणती स्क्रिप्ट पुढे न्यायची आहे, हे खेळाडूंना सुचवलं जातं. खेळाडूंना अप्रत्यक्षपणे हिंट दिली जाते की त्यांची कोणती बाजू बाहेर जास्त 'विकली' जातेय. जर एखादा खेळाडू शांत असेल, तर त्याला मुद्दाम डिवचले जाते जेणेकरून तो भांडायला सुरुवात करेल. हा एक प्रकारचा रिमोट कंट्रोल आहे, ज्याद्वारे खेळाडूंच्या वागण्याला वळण दिलं जातं. पण मनोरंजनाच्या नावाखाली जो प्रेक्षक वर्ग या खेळाकडे डोळे लावून बसलेला असतो, त्या मेजॉरिटी प्रेक्षकांना यातील सूक्ष्म हालचाली आणि मॅनिप्युलेशन कळत नाही. यात 'एमजी' म्हणजेच मिनिमम गॅरंटी नावाचा प्रकार तर प्रेक्षकांशी केलेली सर्वात मोठी प्रतारणा आहे. मोठे सेलिब्रिटी ठराविक आठवडे घरात राहण्याचा करार करूनच येतात, मग त्यांनी कितीही चुकीचं वागलं तरी त्यांना घरात ठेवणं बिग बॉसला भाग असतं. अशा वेळी त्यांच्या नीच वागण्याला सुद्धा 'गेम' म्हणून गोंजारलं जातं आणि प्रेक्षकांच्या मतांचा अपमान केला जातो.
आजच्या काळात कोणताही मोठा खेळाडू घरात येण्यापूर्वीच आपली बाहेर एक तगडी 'पीआर' (PR) यंत्रणा राबवत असतो. सोशल मीडियावर फेक ट्रेन्ड्स चालवणं, आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना ट्रोल करणं आणि आपण कसं योग्य आहोत हे पटवून देण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. बिग बॉसची टीम या बाह्य यंत्रणेचा वापर करून आपली स्क्रिप्ट अजून मजबूत करते. हे केवळ खेळाडूंचे मानसिक खेळ नसून प्रेक्षकांच्या भावनांचा केलेला एक नियोजनबद्ध व्यापार आहे. खेळाडू जेवढा जास्त वादग्रस्त असेल, तेवढा त्याला जास्त पाठिंबा दिला जातो कारण त्यातून जाहिराती आणि स्पॉन्सर्सना फायदा होतो. यात खेळाची नैतिकता कुठेतरी हरवून जाते आणि उरतो तो फक्त एक 'ब्रँडेड फ्रॉड'. प्रेक्षकांना जे दाखवलं जातं ते एडिटिंगच्या कात्रीतून गेलेले केवळ काही तुकडे असतात. तासनतास चालणाऱ्या संवादांमधील केवळ तेवढाच भाग निवडला जातो जो शोच्या स्क्रिप्टला आणि त्या सिझनच्या 'कथानकाला' सूट होईल. एखाद्याची चांगली बाजू जाणीवपूर्वक दाबून टाकणं आणि एखाद्या किरकोळ वादाला मोठं स्वरूप देऊन तो वारंवार दाखवणं हीच बिग बॉसची खरी ताकद आहे. एडिटिंग टेबलवर बसलेला माणूसच ठरवतो की जनतेला कोणावर प्रेम करायचं आहे आणि कोणाचा तिरस्कार.
बिग बॉसचा खरा चेहरा हा केवळ भांडणं आणि टास्कपुरता मर्यादित नाही, तर तो मानवी संवेदनांना बाजारात विकण्याचा एक अत्यंत हीन दर्जाचा प्रयत्न आहे. जेव्हा आपण म्हणतो की हा शो रिअॅलिटी शो आहे, तेव्हा त्यात पारदर्शकता असणं अपेक्षित असतं. पण जेव्हा घराचे दरवाजे बंद होतात, तेव्हा त्या चार भिंतींच्या आत केवळ एका चॅनेलची आणि त्यांच्या व्यवस्थापन टीमची हुकूमशाही चालते. खेळाडू जेवढे पपेट बनून राहतील, तेवढे ते जास्त काळ टिकतील. जनतेची मते हा केवळ एक देखावा असतो; प्रत्यक्षात कोणाला जिंकवायचं हे व्यवस्थापन टीमने आधीच निश्चित केलेलं असतं. जोपर्यंत प्रेक्षक या साचेबद्ध नाटकाला सत्य मानून त्या भावनिक जाळ्यात अडकत राहतील, तोपर्यंत हा 'फ्रॉड' अव्याहतपणे चालूच राहणार आहे.
निष्कर्षत: सांगायचं झालं तर, बिग बॉस हा शो आता एका अशा वळणावर आला आहे जिथे त्यातील 'रिअॅलिटी' हा शब्द केवळ नावापुरता उरला आहे. हा एक असा प्लॅटफॉर्म झाला आहे जिथे कलाकारांना त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्यातील नकारात्मकता आणि भांडखोर वृत्तीचं प्रदर्शन करायला भाग पाडलं जातं. व्यवस्थापन टीम जेव्हा खेळाडूंच्या कृतींवर नियंत्रण मिळवते आणि स्वतःच्या फायद्यासाठी खेळाचे नियम वाकवते, तेव्हा तो खेळ 'रिअल' राहत नाही. अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी घेतलेले ट्विस्ट आणि नियमांची केलेली मोडतोड हे सर्व सामान्य लोकांना समजत नाही असं टीमला वाटत असेल, तर तो त्यांचा सर्वात मोठा गैरसमज आहे. प्रेक्षक आता सुज्ञ झाले आहेत, त्यांना स्क्रिप्टेड भांडणं आणि ठरवून केलेली कौतुकं यातील फरक स्पष्ट कळतो. बिग बॉसने हे समजून घेण्याची वेळ आता आली आहे की, लोकांच्या भावनांशी खेळून मिळवलेला टीआरपी हा फार काळ टिकणारा नसतो. जो शो सुरुवातीला एक 'सोशल एक्सपेरिमेंट' म्हणून ओळखला जायचा, तो आज केवळ एक 'व्यावसायिक सर्कस' झाला आहे. नवीन खेळाडू, नवीन घर आणि नवीन रंगरंगोटी केली तरी जोपर्यंत खेळाची मूळ वृत्ती बदलत नाही आणि जोपर्यंत व्यवस्थापन टीमच्या स्क्रिप्टेड खेळाचा हा मुखवटा फाडला जात नाही, तोपर्यंत हा शो म्हणजे निव्वळ प्रेक्षकांच्या डोळ्यांत धूळफेक करणारा एक महागडा तमाशाच राहणार आहे. खेळाडूंच्या खऱ्या स्वभावापेक्षा त्यांच्याकडून करवून घेतलेला पपेट-सारखा अभिनय आणि आधीच ठरवलेला विजय हा या खेळाचा आणि पर्यायाने प्रेक्षकांच्या विश्वासाचा सर्वात मोठा पराभव आहे. हे स्क्रिप्टेड नाटक जितक्या लवकर प्रेक्षक नाकारतील, तितक्या लवकर खऱ्या आणि प्रामाणिक मनोरंजनाची सुरुवात होईल.
#BiggBossMarathi #ScriptedSho#RealityShowTruth #MarathiTelevision #TRPGame #ExposeBiggBoss #MarathiKalakar #MarathiEntertainment
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा