मिशन : एकदिवसीय विश्वचषक २०२७

लेखक: कथावाचक

नुकताच टी-२० विश्वचषक जिंकून भारतीय संघाने जगावर आपली मोहोर उमटवली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सर्वच देश केवळ टी-२० च्या धुंदीत होते, पण आता मात्र खऱ्या क्रिकेटची कसोटी असलेल्या 'एकदिवसीय विश्वचषकाकडे' सर्वांचे लक्ष वळले आहे यात शंका नाही. 
इतिहासाची पाने काय सांगतात?

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने तब्बल ६ वेळा जेतेपद पटकावून मोठी आघाडी घेतली आहे. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि आपल्या लाडक्या भारताचा क्रमांक लागतो. दोन्ही देशांनी प्रत्येकी दोनदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. तर पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड या देशांनी प्रत्येकी एकदा हा चषक उंचावला आहे.

देशानुसार आतापर्यंतची विजेतेपदे:

१. ऑस्ट्रेलिया: ६ वेळा (१९८७, १९९९, २००३, २००७, २०१५, २०२३)
२. भारत: २ वेळा (१९८३, २०११)
३. वेस्ट इंडिज: २ वेळा (१९७५, १९७९)
४. पोर्किस्तान: १ वेळ (१९९२)
५. श्रीलंकाः १ वेळ (१९९६)
६. इंग्लंड: १ वेळ (२०१९)

२०२७ चे रणांगण: आफ्रिका खंड सज्ज

२००३ नंतर यंदाचा विश्वचषक आफ्रिका खंडात आयोजित केला आहे. या भव्य स्पर्धेत एकूण १४ संघ सहभागी होणार असून दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे देश यजमानपदाची धुरा सांभाळतील.

स्पर्धेचे गणित कसे असेल?

थेट प्रवेश: यजमान म्हणून दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे आधीच पात्र ठरले आहेत.
रँकिंगचा आधार: ३१ मार्च २०२७ च्या आयसीसी रँकिंगनुसार पहिले ८ संघ (यजमान सोडून) थेट पात्र ठरतील.
ग्लोबल क्वालिफायर: उरलेल्या ४ जागांसाठी नामिबिया, नेपाळ, स्कॉटलंड, आयर्लंड, नेदरलँड्स आणि ओमान यांसारख्या संघांमध्ये 'ग्लोबल क्वालिफायर' युद्ध रंगेल.

सध्याच्या रँकिंगनुसार संभाव्य ८ संघ:
१. भारत 
२. ऑस्ट्रेलिया 
३. पाकिस्तान 
४. न्यूझीलंड 
५. श्रीलंका 
६. इंग्लंड 
७. अफगाणिस्तान 
८. बांगलादेश / वेस्ट इंडिज (या दोघांमध्ये ८ व्या जागेसाठी चुरस आहे).

भारताचे लक्ष्य: 

विजयाची दरी सांधणे
भारतीय संघाने सध्या आयसीसी चषक जिंकण्याचा जो सपाटा लावला आहे, तो पाहता २०२७ मध्ये आपण प्रबळ दावेदार आहोत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारखे दिग्गज यानंतर कदाचित मैदानावर दिसणार नाहीत, ही शक्यता लक्षात घेता, तरुण रक्ताचा हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील 'विजेतेपदाची दरी' कमी करण्यासाठी जीवाची बाजी लावेल, अशी आशा आहे.

शेड्युलची प्रतीक्षा

सामने कुठे होणार, गट कसे असतील, याचे वेळापत्रक अजून तयार नाही. त्यासाठी आधी 'ग्लोबल क्वालिफायर' मधून चार संघ निवडले जातील आणि रँकिंगनुसार अंतिम संघ निश्चित होतील. पण एक मात्र नक्की, २०२७ चा हा रणसंग्राम क्रिकेट रसिक कधीच विसरणार नाहीत. 

आयसीसीचे महसूल गणित 

गट कसेही पडले तरी आयसीसी ने केवळ महसुलाच्या अपेक्षेने भारत पाकिस्तान संघाला यावेळी एकच गटात ठेवता काम नये. नशिबाने एकमेकांसमोर आले तर हरकत नाही पण ठरवून एकमेकांसमोर आणून आयसीसी पाकिस्तान सारख्या तुक्केबाज आणि दर्जाहीन संघाला प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाच्या समोर पाठवून प्रत्येकवेळी त्याची गोची करतो.त्यात पाकिस्तानने ते टी ट्वेंटी विश्वचषकाच्या सुरुवातीला भारताबरोबर न खेळण्याची जी पुडी सोडली होती ती लक्षात घेता आयसीसीने दोन्ही संघाना वेगवगेळ्या गटात ठेवून प्रेक्षकांवर उपकार करावे. आठव्या स्थानासाठी जर वेस्ट इंडीज संघ पात्र ठरला तर स्वतःच्या हाताने बसलेल्या फांदीवर कुऱ्हाड चालवणाऱ्या बेअक्कल शेखचिल्ली बांगलादेश दुदैवी ठरेल यात शंका नाही.

भारतीय संघ : स्वप्नाला गवसणी घालण्याचा प्रयत्न

आतापर्यंत लेखात केवळ प्रस्तावना होती पण खरा लेख तर आता चालू होणार आहे कारण विषय भारतीय संघाचा असणार आहे. भारतीय संघ हा विश्वचषक जिंकून आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा झपाटा दाखवू शकतो. जितके लिहिताना हे सोप्पे वाटत असले तरी हे काम महा अवघड आहे कारण विश्वचषक जिंकण्यासाठी निवड झालेल्या संघाला रक्ताचे पाणी करावे लागणार आहे. भारतीय संघात निवड होणारे काही खेळाडू ठरलेले आहे तर काहींची जागा ठरायची आहे. विराट, रोहित, जसप्रीत, उपकर्णधार शार्दुल, जडेजा आणि कर्णधार म्हणून शुभमन याची निवड निश्चित आहेच. टी ट्वेंटी मधून डावलेला जैस्वाल हा तिसरा सलामीचा फलंदाज म्हणून तर यष्टिरक्षक म्हणून के एल राहून नाव जवळपास निश्चित असेल. दुसरा यष्टिरक्षक म्हणून पंत आणि ध्रुव जुरेल यात स्पर्धा असेल. पंड्याची निवड झाली तर नितेश, दुबे डावलले जातील किंवा १५ सदस्य संघात दोघांतील एक असतील. गौतम गंभीरचे लाडके सुंदर आणि हर्षित याची निवड तर निश्चित खेळाडूंमध्ये करायला पाहिजे पण घर फिरते तसे कसे फिरतात त्यामुळे त्याचा अनुल्लेख आता करावा लागला. जडेजा बरोबर फिरकी सांभाळण्यासाठी कुलदीप देखील असू शकतो कारण टी ट्वेंटी विश्वचषक मध्ये त्याने केवळ बेंच गरम केले आहे.खरा अवघड खेळ तर जलद गती गोलंदाजासाठी आहे कारण जसप्रीतला सोबत नक्की कोणाची ही ठरणे बाकी आहे. सिराज की डावखुरा गोलंदाज म्हणून अर्शदीप सगळ्यात पहिली निवड येणे स्वाभाविक आहे तर कृष्णा देखील मागे असणार नाही. बऱ्याच खेळाडूना अपेक्षित असलेली साऊथ आफ्रिकेची तिकीट कोणाला जॅकपॉट लागेल सांगणे अवघड आहे. दुर्लक्षित शमी, दर्जा असूनही केवळ समान गुणवत्ता आणि जागेसाठी खेळणारा अक्षर जडेजाला संघात घेतल्याने डावलले जाऊ शकते. स्पर्धा अजून खूप लांब आहे. खूप साऱ्या मालिका खेळल्या जातील आणि खूप सारे खेळाडूना संधी दिली जाईल पण वर उल्लेख केलेल्या बहुतांश खेळाडूंमुळे संघातील जागा भरून जाईल त्यामुळे पर्याय शोधले जाऊनही ह्याच खेळाडूंची निवड होणार हे निश्चित. स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत असल्याने यजमान देश सोडून उरलेल्या देशांना १५ सदस्य संघाबरोबर अजून ३ किंवा ४ खेळाडू अधिक निवडता येतील. हे खेळाडू कोण असतील याचा अंदाज झाल्याप्रमाणे
१.शुभमन
२.रोहित
३.विराट
४.शार्दुल
५ राहुल
६.पंड्या
७.जडेजा
८.कुलदीप
९.जसप्रीत
१० सिराज
११.अर्शदीप
१२.हर्षित
१३. सुंदर
१४. कृष्णा 
१५. जैस्वाल
१६. पंत/ जुरेल
१७.दुबे/ नितेश/अक्षर
१८.__________

शेवटची जागा मुद्दाम रिकामी ठेवली आहे कारण कोणत्या खेळाडूंची लॉटरी लागेल हे सांगता येणार नाही. कितीही खेळाडूना संधी दिली, कितीही प्रयत्न केले तरी विश्वविजेतेपदाला गवसणी घालावी म्हणून निवड समिती, संघ व्यवस्थापक आणि कोच हाच संघ निवडतील अशी आशा आहे. खरं सांगायचे तर काही अनपेक्षित निर्णय देखील घेतले जाऊ शकतात त्यात शुभमन कर्णधार म्हणून उचलबांगडी होऊ शकते, रोहितच्या खांद्यावर शेवटची जबाबदारी दिली जावी शकते. संघाचा समतोल साधण्यासाठी आणि जैस्वाल सारखा खेळाडू संघात जागाच मिळत नसल्याने रोहित तिसऱ्या तर विराट चौथ्या क्रमांकावर खेळतील आणि शुभमन आणि जैस्वाल सलामी देतील यामुळे भारतीय संघाला फायदा होऊ शकतो पण गंभीरचा नावडता श्रेयस संघाबाहेर जाईल आणि गंभीरच्या मनातला डाव ओठावर येईल. अतिविश्वास आणि खेळवायचे म्हणून यष्टिरक्षक म्हणून के एल पाचव्या तर अष्टपैलू खेळाडू म्हणून जडेजा आणि पंड्या सहाव्या आणि सातव्या स्थानी खेळतील. अधिकचा फलंदाज म्हणून कुलदीपेक्षा सुंदरला झुकते माप दिले जाईल तर वेगवान त्रिकुट म्हणून सिराज,जसप्रीत, कृष्णा हिच जोडी खेळताना दिसेल. गंभीरने कितीही आपटली तरी हर्षित, नितेश सारखे लाडके पाणी देण्याची भूमिकेशिवाय एखाद दुसरी विश्वचषकाचा सामना खेळताना दिसतील आणि जर ते त्यापेक्षा जास्त सामने खेळले तर विश्वचषक जिंकणे एक स्वप्न ठरेल. माझा अंदाज किती खरा ठरतो ह्याचे उत्तर कालच देईल पण आजच्या घडीला विश्वचषक जिंकायचा असेल तर निवडसमिती असाच संघ निवडेल ह्याची शाश्वती वाटते. पुढचा लेख घेऊन येईपर्यंत राम राम.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रपती

तिरुपती बालाजी: जगातील सर्वात श्रीमंत देवाच्या संपत्तीचे 'हे' आहे रहस्य!

मुक्त विद्यालय (Open School)