सेमी फायनलचे गणित २०२६
विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर: संघर्षातून विजयाकडे टीम इंडियाची वाटचाल!
२६ फेब्रुवारी: पराभव, जिद्द आणि 'गंभीर' प्रश्न
क्रिकेटमध्ये हार-जीत तर होतच असते, पण ती कशी झाली हे जास्त महत्त्वाचे. काल सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपण पराभूत झालो. मिलर आणि ब्रेव्हिसने १८७ धावांचा डोंगर उभा केला, तिथेच आपण अर्धी लढाई हरलो होतो. आफ्रिकन गोलंदाजांनी आपल्या फलंदाजांना ज्या प्रकारे जखडून ठेवले, संथ चेंडू आणि बाहेरील टप्प्यावर चेंडू फेकून जे 'माईंड गेम' खेळले, त्यात आमचे फलंदाज फसत गेले.
पण प्रश्न फक्त खेळाचा नाही, तर मानसिकतेचा आहे. सूर्याची प्रेस कॉन्फरन्स, त्याची देहबोली आज अनेकांना 'ओव्हर कॉन्फिडन्स' वाटू शकते, पण हरल्यावर सगळेच 'क्रिकेट एक्सपर्ट' होतात हेही तितकेच खरे.
खरी त्रुटी कुठे आहे? कदाचित ती मैदानाबाहेर आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून संघात एक प्रकारची 'अरेरावी' जाणवतेय. आवडीनिवडीनुसार संघबांधणी (उदा. शार्दुल, शमी यांना डावलणे) आणि दिग्गज खेळाडूंना निवृत्तीला भाग पाडणे, यामुळे संघाची घडी विस्कटलेली वाटतेय. जर हा वर्ल्ड कप आपण हरलो, तर गंभीरची हकालपट्टी निश्चित आहे, पण प्रश्न असा आहे की—एका व्यक्तीच्या हट्टामुळे आपण विश्वचषक गमावायची किंमत मोजायची का?
क्रमशः
२६ फेब्रुवारी (संध्याकाळी): सेमीफायनलचे गणित
आता सेमीफायनलचे तिकीट मिळवण्यासाठी आपल्याला नुसते जिंकून चालणार नाही, तर 'रन रेट'च्या गणितातही उतरावे लागेल.
* सोपे गणित: आफ्रिकेने उरलेले दोन्ही सामने जिंकावे आणि भारताने विंडीज व झिम्बाब्वेला लोळवावे.
* धोरणात्मक बदल: माझ्या मते, संजू सॅमसनला सलामीला आणून इशानला तिसऱ्या क्रमांकावर खेळवणे ही काळाची गरज आहे. ऑफ-स्पिनच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा ही आक्रमक रणनीती फायदेशीर ठरेल.
क्रमशः
२७ फेब्रुवारी: पुनरागमन आणि नव्या आशा
नशिबाने आणि खेळाने साथ दिली! दक्षिण आफ्रिकेने विंडीजला हरवले आणि आपण झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवून रन रेट सावरला. अभिषेकची ती खेळी आत्मविश्वास देणारी होती, पण आता खरी परीक्षा आहे ती रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध! ईडन गार्डनचे छोटे मैदान आणि विंडीजचे 'दैत्यांसारखे' ताकदीचे खेळाडू, यांना रोखणे म्हणजे आगीशी खेळण्यासारखे आहे.
पण आपण आशा सोडणारे नाही. विश्वविजेता बनायचे असेल, तर आता प्रत्येक सामना हा 'करो या मरो' याच जिद्दीने खेळावा लागेल.
क्रमशः
६ मार्च: वानखेडेचा थरार आणि न्यूझीलंडचे आव्हान
आज आपण पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचलो आहोत! वानखेडेवर इंग्लंडविरुद्ध मिळवलेला तो विजय संपूर्ण सांघिक कामगिरीचा नमुना होता. जसप्रीत बुमराह सारखा कंजूस गोलंदाज आणि सूर्याचे कर्णधार म्हणून घेतलेले धाडसी निर्णय, यामुळे आपण इंग्लंडला रोखले. जरी अभिषेक, सूर्या आणि वरुणला बॅटने चमक दाखवता आली नाही, तरी इतरांनी ती पोकळी भरून काढली.
आता समोर आहे न्यूझीलंड! 🇳🇿
एक असा संघ जो मैदानात जितका शांत आणि सभ्यता पाळणारा असतो, तितकाच प्रतिस्पर्ध्यासाठी घातक असतो. टी-२० वर्ल्ड कपमध्ये आपण आजपर्यंत कधीच न्यूझीलंडला हरवलेले नाही, हा इतिहास आहे. पण उद्याची रात्र इतिहास बदलण्यासाठी आहे!
अंतिम संघ असा असावा:
* संजू (सलामीवीर)
* अभिषेक
* इशान
* सूर्या (कर्णधार)
* हार्दिक
* टिळक
* दुबे
* अक्षर
* कुलदीप (वरुणच्या जागी)
* अर्शदीप
* जसप्रीत
यजमान देश आजवर कधीही टी-२० वर्ल्ड कप जिंकलेला नाही, हा विक्रम मोडीत काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. उद्याचा सामना केवळ खेळाचा नाही, तर 'राष्ट्र प्रथम' या भावनेचा आहे. भारतीय संघाने केवळ न्यूझीलंडला हरवू नये, तर सलग दोनदा विश्वविजेता बनण्याचा मान मिळवावा, हीच सव्वाशे कोटी भारतीयांची इच्छा आहे.
पुन्हा एकदा नवीन लेखासह, नवीन विजयाची वार्ता घेऊन लवकरच भेटू!
जय श्रीराम!
क्रमश
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा