नात्याच्या बाजारात
आज सोबतीला गर्दी आहे,
उद्याचे काय सांगू?
स्वार्थाच्या या जगात,
मी कोणाची साथ मागू ?
संशय नाही मनात हा,
तर पक्का विश्वास आहे,
इथे कोणीच कोणाचे नसते,
हाच जगण्याचा श्वास आहे.
बाजारात मिळत नाही अनुभव,
तो जखमांतून येतो,
ज्याला आपले मानलं,
तोच स्वार्थाचा मुखवटा लेतो.
दोष माझा नव्हता काही,
मी फक्त नात्यांत गुंतलो होतो,
माणसांच्या या गर्दीत,
मी एक खुळा ठरलो होतो.
मी तर ठरलो वेडा,
आता तुम्ही तरी सावध रहा,
नात्यांच्या या बाजारात,
पुढे धोका आहे.
नेहमीच्या कट्ट्यावर तो एकटाच वेळेआधी येऊन बसला होता. चेहऱ्यावर उदासीनता, डोळ्यात भरलेले पाणी, नजर शून्यात लावून बसलेला होता. मित्रांनी न राहवून त्याला कैक प्रश्न केले त्यावर तो म्हणाला
मनवू नका रे मला,
मी रुसलेलो नाही.
मनवू नका रे मला,
मी रुसलेलो नाही.
फक्त थोड समजून घ्या,
मी सध्या खूप त्रासलेलो आहे.
त्रासलेल्या मित्राला सोबत म्हणून मित्र त्याच्या आजूबाजूला होते पण त्याच्या मनात नक्की काय चालले होते हे देवाला माहित
मित्रांच्या गर्दीत,
तो अंतरी रीता होता
हिरमुसलेल्या चेहऱ्यामागे,
एक अस्वस्थ चिता होता
जुनी खपली आज,
कुणीतरी मुद्दाम उकरली
काळाने भरलेली जखम,
पुन्हा एकदा भळभळली.
नसेल दिसले रक्त कुणाला,
काळजात जे साचले होते,
पण विव्हळणे त्याचे मात्र,
साऱ्या जगाला रुचले होते.
डोळ्यांतील ते शून्य आजही,
प्रश्नांचे डोंगर विचारते,
ज्याला मानले आपले,
तेच का कातळ होऊन टोचते?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा