तेरे इश्क में: ती आणि मी कथा
रोज क्लास बंक, कॉलेजच्या पटांगणावर क्रिकेट, टेरेसवर बियर, तर कधी चित्रपट पहायला जाणारे आम्ही; अशा टुकार 'बॅक बेंचर' मुलाशी बोलणार तरी कोण?
पण ही परिस्थिती बदलली. कोणालाही विश्वास नसताना त्या सगळ्या 'बॅक बेंचर'मधून मी दुसऱ्या वर्षात आलो. मार्क चांगले पडलेले होते. ते 'बॅक बेंचर' मित्र देखील आता बरोबर नव्हते, त्यामुळे वर्गातील ह्या मुली कधी बोलायला लागल्या आणि कधी आमचा चमूही बहरू लागला, हे कळले नाही. ह्या सगळ्यात जी मुलगी मला आवडत होती, ती मात्र कॉलेजला येत नव्हती. तिच्या घरची परिस्थिती थोडी बिकट होती किंवा मुलींवर इतका खर्च करण्याची तयारी नसावी म्हणून तिने कॉलेज सोडले होते.
दिवसामागून दिवस जात होते. प्रत्येक पोराच्या आयुष्यात तो एक मित्र असतो ना, जो "ती मुलगी तुझ्याकडे पाहते, हसते" सांगून आपली मज्जा घेतो? तो मित्र माझ्या आयुष्यात आला. त्याने एक खूळ डोक्यात घातले आणि त्या दिवसांपासून कॉलेजमधील माझे तिच्याकडे पाहण्याचे आणि बोलण्याची रीतच बदलली.
आता तिच्यापुढे सगळा ग्रुप, कॉलेजमधील मुली मला अस्पष्ट दिसत होत्या. खरंतर प्रेम प्रकरण करणे, ते यशस्वी करत तिच्याबरोबर संसार थाटणे हे होणार नाही, हे माझे घरचे वातावरण, संस्कार आणि मनातील भीतीमुळे मला माहीत होते; तशी तयारी देखील नव्हती. पण ती वेळ, वय असे असते की त्या प्रवाहात कोणताही व्यक्ती आपसूक वाहवत जातो, मीही गेलो. ना मी तिला कधी 'रोज डे'ला रोज दिला, ना 'चॉकलेट डे'ला चॉकलेट. माझे प्रेम म्हणजे कॉलेजला जायचे, तिला पाहायचे, दुपारच्या सुट्टीत एकत्र जेवायला बसायचे, अभ्यासाचे लिखाण काम-कागदे आदानप्रदान आणि कुठे फिरायला जायचे ठरले की ग्रुपमध्ये तिच्यामागे फिरणे. दुसरे वर्ष संपायला आले तरी "माझे तुझ्यावर प्रेम आहे," असे मी म्हणण्याचा प्रश्नच आला नाही. तो सहवास, तो स्पर्श, त्या गप्पा... या सगळ्यात मी आनंदी होतो. वर्गातील मुलांनाच काय, मुलींना देखील काहीतरी शिजत आहे याची चाहूल लागली होती.
बरं, हे सगळे झाले माझ्याबद्दल. आता तिच्याबद्दल! ती सगळ्या मुलींमध्ये देखणी होती असे नाही; घारे डोळे, मेहंदी लावून पांढरे लांबसडक केस बेमालूम पद्धतीने लपवणारी आणि इतर सगळ्या मुलींत ही थोडीशी तब्येतीने वरचढ होती, अंगाखांद्याने सुडौल होती. मुली-महिलांमध्ये असणाऱ्या 'सिक्स सेन्स'चा वापर करत, माझ्या एकंदरीत वर्तणुकीतून तिला माझ्या भावना कळल्या होत्या, हे मला देखील समजले होते. पण ना ती हे उघड करत होती, ना मी प्रयत्न करत होतो. ही खूप हुशारही नव्हती, पण कॉलेजातील सगळा अभ्यास, उपक्रम मात्र पूर्ण असायचे. अक्षरही चांगले होते तिचे. दिवसामागून दिवस असेच स्वैरपणे जात होते. मैत्रीच्या पडद्यामागे तिने सगळ्या गोष्टी दडवून ठेवल्या होत्या कदाचित. दडवण्यात मुलींचा हात कोणी धरू शकत नाही, हे सत्य इथे अधोरेखित होते.
कॉलेजचे ते वर्ष आणि तिच्या सहवासात गुंतलेल्या मला एक गुपित कळले. ह्या मॅडम कॉलेज संपल्यानंतर वर्गातील मुलींच्या गराड्यात झाडाखाली रडताना दिसल्या. मला काही समजेना, कोणी मला काही सांगेना. मी 'मस्तमौला' माणूस; मुलींचे ते चार दिवसाचे प्रॉब्लेम नाहीच तर घरचे काहीतरी असेल, म्हणून तो विषय तिथेच सोडला. पण दुसऱ्या दिवशी वर्गातील गुप्तहेरांनी खबर फोडली. ह्या मॅडमचे त्यांच्याच गल्लीतील, आमच्या कॉलेजमध्ये येणाऱ्या एका पोरावर जीव होता. जीव काय, दोघे एकमेकांच्या प्रेमात होते असेच कळले. त्या पोराचे लग्न ठरलेले आणि त्याच्या प्रेमाचा अंकुर फुटण्याआधीच तो उपटला जात होता, म्हणून ही पोरगी झाडाखाली मुलींच्या गराड्यात आसवे गाळत होती. ही परिस्थिती मला कळल्यावर माझे मन आतून रडत होते. पुरुष समाजात वावरताना डोळ्यात पाणी काढू शकत नाही, म्हणून मी माझे दुःख आत दाबत असलो तरी चेहरा, भावभावना मात्र प्रत्येकाला माझी मनस्थिती काय, याची पोचपावती देत होते. होय, मैत्रीत गुंफलेल्या माझ्या आकर्षणाचा शेवट 'प्रेमविवाह' नाही हे माहीत असतानाही, एक दुःखाची कळ छातीत निघाली होती.
आतापर्यंत वाचत आल्याबद्दल धन्यवाद. मला माहीत आहे की तुम्ही म्हणाल, "ह्या सगळ्या प्रकारात प्रेम आहे कुठे?" आणि हाच प्रश्न त्या प्रसंगाच्या दुसऱ्या दिवशी माझ्याही मनात उधळत होता. परिस्थिती काहीही असो, घटना कशाही घडल्या असो किंवा घडवल्या गेल्या असो; त्यावेळी ती मला आवडत होती. पण तिला मी त्यादिवशीच काय, त्याआधीही आवडत नसेल, पण तिचे त्या दीड-दोन वर्षातील वागणे-बोलणे यात मला हे समजले नाही. समजा हे प्रकरण मला कळले नसते, तरी आधीपासून माझ्यात ती ताकद नव्हती की "मला हिच्याशी लग्न करायचे आहे," असे पालकांसमोर बोलू शकेन. त्यामुळे त्या बालिश वयात देखील, बालिश पोरखेळ असलेले प्रेम प्रकरण विसरणे आणि पुढे चालणे मला शक्य होते. तरीही मनात मात्र 'रेहना है तेरे दिल में' च्या मॅडीसारखे 'सच कह रहा है दिवाना' गाणे मी गुणगुणत होतो...
सहसा सहवासातून निर्माण झालेल्या आकर्षणाला आपण प्रेम समजतो. ह्या प्रेमाच्या कढीला ऊत येतो तो त्या वयामुळे आणि लहानपणापासून पाहत असलेल्या चित्रपटांमुळे. चित्रपटात नायक-नायिका प्रेमात पडतात, ते पाहून आपल्यालाही तसे वाटावेसे वाटते. वास्तव हे चित्रपटापेक्षा वेगळे असते. कदाचित वास्तवात जे शक्य नसते, म्हणून ते चित्रपटात असते असे म्हणायला हरकत नाही. मी पापभिरू, भित्रा म्हणून मी प्रेमाच्या डावात पुढचे पाऊल टाकले नाही; पण असे कैक असतात जे आकर्षणाला प्रेम समजून प्रेमात पडतात.कधी कधी दोन्ही बाजूंनी तर कधी एकतर्फी. जोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीला काही त्रास होत नाही, तोपर्यंत हे प्रेम ठीक असते; पण त्यानंतर ती ठरते ती 'विकृती'. तिला तो आवडतो पण त्याला ती आवडत नसेल, तर कोणत्याही थराला जाऊन प्रेम मिळवणे किंवा अजून काही विचित्र करणे हे प्रेम असू शकत नाही. सहवास, संगत, मैत्री, एकमेकांच्या आवडीनिवडी, बोलणे-चालणे यातून सर्वात पहिले निर्माण होते ते आकर्षण आणि आकर्षणातून निर्माण होते ते प्रेम. चित्रपटात दाखवतात ते 'पहिली नजर का प्यार' ही तर एक अविश्वसनीय, खोटी गोष्ट असते, असे माझे ठाम मत आहे.
प्रेम म्हणजे नक्की काय असते, यावर प्रत्येकाची मते वेगळी असतील, पण प्रेम म्हणजे आकर्षण आहेच. खरे प्रेम आईचे, बापाचे आणि आपल्या घरातील लोकांचे! जन्म देताना मुलांवर प्रेम करायचे हा उद्देश नसला, तरी जन्मल्यानंतर प्रत्येक क्षण आपल्या बाळाचे भले होण्यासाठी प्रयत्न करणारे पालक, कधीकधी स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, स्वप्नांचा त्याग करत मुलाचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी झटत असतात. स्वतःच्या पोटाला चिमटा घेत मुलाचे पोट भरण्यात देखील ते मागे-पुढे पाहत नाहीत. त्यांच्या ह्या प्रेमाला डावलून जेव्हा मुले स्वतःचा निर्णय घेत असतील, तेव्हा त्यांच्या हृदयाचे किती तुकडे पडत असतील? त्यांच्या अपार प्रेमापुढे एखाद-दुसऱ्या वर्षाच्या प्रेमाचा विजय होणे खूपच दुःखकारक आहे.
असो, प्रेम आणि आकर्षण यातील हा गोंधळ संपणारा नाही. पण माझ्यासाठी त्या कॉलेजच्या दिवसांनी आणि त्या एका अनुभवाने प्रेमाची खरी व्याख्या शिकवली. ती म्हणजे - प्रेम मिळवण्यात नाही, तर ते समजून घेण्यात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात असते. 'ती' आता कुठे असेल माहीत नाही, पण तिच्या आठवणीने मला एक चांगला माणूस आणि एक समजूतदार मुलगा नक्कीच बनवले, हे मात्र नक्की!
त्यामुळे मित्रांनो, 'सच कह रहा है दिवाना' म्हणत देवदास होण्यापेक्षा, वास्तवाचे भान ठेवून जगणे केव्हाही उत्तम. कारण चित्रपटात 'हॅपी एंडिंग' असते, पण खऱ्या आयुष्यात 'हॅपी जर्नी' महत्त्वाची असते. आणि ही जर्नी सुखकर करायची असेल, तर पालकांच्या आशीर्वादासारखे दुसरे इंधन नाही. बाकी, ती 'बॅक बेंचर' वाली लव्हस्टोरी आता एक गोड आठवण म्हणून डायरीच्या पानांत बंद झालेलीच बरी!
शेवटी एवढंच सांगेन की, तारुण्यातील प्रेमाचे गुते सोडवताना, ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं त्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचे हास्य हरवणार नाही, याची काळजी नक्की घ्या. कारण आयुष्यात लोक येतील आणि जातील, पण रक्ताच्या नात्याची आणि पालकांच्या त्यागाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. हेच माझ्या त्या अपूर्ण राहिलेल्या 'प्रेमकथेचे' पूर्ण सत्य आहे......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा