पिवळी छत्री : ती आणि मी कथा
मी बस स्टॉपच्या दिशेने धावत होतो, पण पावसाने मला गाठलंच. अचानक आलेल्या त्या जोरदार सरींमुळे मी एका जुन्या दुकानाच्या आडोशाला उभा राहिलो. माझ्याकडे छत्री नव्हती. भिजलेलं शर्ट आणि खिशातला मोबाईल वाचवण्याच्या नादात मी खाली बघत होतो. तेवढ्यात, माझ्या शेजारी एक पिवळी छत्री येऊन थांबली.
"अजूनही तू छत्री घ्यायला विसरतोस का रे?"
एक ओळखीचा, अत्यंत कोमल आवाज कानावर पडला. मी वळून पाहिलं आणि काळजाचा ठोका चुकला. ती होती... कॉलेज सुटल्यानंतर जवळपास पाच वर्षांनी ती माझ्यासमोर उभी होती. तिने निळ्या रंगाचा कुर्ती घातला होता, हातात तीच कॉलेजच्या दिवसातली सवय असलेली पिवळी छत्री आणि चेहऱ्यावर तेच आश्वासक हसू.
"तू... इथे कशी?" मी शब्दांची जुळवाजुळव करत विचारलं.
"इथेच जवळ एका बँकेत आहे मी. तू ऑफिसमधून?" तिने विचारलं.
आमच्यात औपचारिक गप्पा सुरू झाल्या, पण मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. कॉलेजमध्ये आम्ही रोज सोबत असायचो. लायब्ररीच्या नोट्सपासून ते कॅन्टीनच्या चहापर्यंत आमचा सहवास होता. मला ती प्रचंड आवडायची, पण 'मध्यमवर्गीय मुलाचा न्यूनगंड' नेहमी आडवा यायचा. "माझ्याकडे तिला देण्यासाठी काय आहे? करिअरचा पत्ता नाही, घरची परिस्थिती बेताची..." याच विचाराने मी कधी शब्दांना वाट करून दिली नाही.
"बस स्टॉपपर्यंत यायचंय? पाऊस थांबणार नाही असं वाटतंय," तिने छत्री थोडी माझ्या दिशेने झुकवत विचारलं.
आम्ही चालायला लागलो. त्या एका छोट्याशा छत्रीखाली दोन जीव आणि पाच वर्षांचा मौन संवाद सोबतीला होता. पाऊस इतका जोरात होता की बाहेरचं जग दिसेनासं झालं होतं. छत्रीचा ताबा तिच्याकडे होता, पण वाऱ्यामुळे ती छत्री सावरताना जेव्हा माझा हात तिच्या हाताला स्पर्शला, तेव्हा अंगावर काटा आला. तो स्पर्श जुनाच होता, पण त्यातली ओढ आजही तशीच होती.
"तुला आठवतंय? शेवटच्या दिवशी तू काहीतरी सांगणार होतास, पण बोललाच नाहीस," ती अचानक म्हणाली.
तिच्या प्रश्नाने मी स्तब्ध झालो. मला आठवलं, निरोप समारंभाचा तो दिवस. मी तासन् तास प्रॅक्टिस केली होती तिला 'आय लव्ह यू' म्हणण्याची. पण ऐनवेळी तिचा 'कॅम्पस सिलेक्शन'चा आनंद बघून मी माझे शब्द गिळून टाकले होते. तिच्या प्रगतीच्या आड माझं प्रेम येऊ नये असं मला वाटलं होतं.
"काही गोष्टी न बोललेल्याच चांगल्या असतात," मी कसबसं हसून म्हणालो.
"कदाचित... पण त्या न बोललेल्या शब्दांमुळेच कित्येकदा आयुष्याचा अर्थ बदलतो," तिच्या स्वरात एक अनामिक हुरहुर होती.
बस स्टॉप आला. तिची बस समोर उभी होती. ती बसमध्ये चढली आणि खिडकीपाशी जाऊन बसली. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं, पाऊस अजूनही कोसळत होता. बस सुरू झाली, तिने हात उंचावून निरोप दिला. मी तिथेच पावसात उभा राहून ती पिवळी छत्री गर्दीत हरवेपर्यंत बघत राहिलो.
त्या दिवशी मला उमजलं की, तिलाही कदाचित तेच सांगायचं होतं जे मी कधी बोललोच नाही. पण आता वेळ निघून गेली होती. ती आपल्या आयुष्यात स्थिर झाली होती आणि मी माझ्या.
आजही जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा मी मुद्दाम छत्री न घेता बाहेर पडतो. भिजताना असं वाटतं की, तो पाऊस माझ्या मनावर साचलेली धूळ धुवून टाकेल. पण प्रत्येक थेंबासोबत तिची ती 'पिवळी छत्री' आणि तो 'अपूर्ण संवाद' आठवत राहतो.
काही नाती ही 'पावसाळी' असतात. ती येतात, तुम्हाला ओलं चिंब करतात, जगण्याचा नवा गंध देतात आणि पाऊस थांबला की अचानक निघून जातात. मागे उरतो तो फक्त ओल्या मातीचा सुगंध आणि डोळ्यांच्या कडांवर साचलेलं थोडंसं पाणी!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा