चिकूशेठ : कंजूस माणसाचा बादशहा

राम राम मंडळी, आज तुम्हाला एक वास्तववादी गोष्ट सांगायची आहे पण त्याआधी आपली ओळख व्हावी म्हणून सांगतो की मी तुमच्या आसपास असणारा एखादा गरजू, कष्टाळू व्यक्तीप्रमाणेच एक, कदाचित तुमच्याच एक प्रतिरूप आहे असे समजून पुढची ही गोष्ट नक्की वाचा. 

माझे नाव कुलदीप, घरची गरिबी त्यात तीन मुलींनंतर कूळ चालवण्यास माझा जन्म झाल्याने आई वडिलांनी आवडीने माझे नाव कुलदीप ठेवलेले. महान लेखक शेक्सपिअरने सांगून गेल्यासारखे नावात काय आहे? हे माझे नाव आणि माझी परिस्थिती पाहूनच त्याने लिहिले होते का असा प्रश्न मनात डोकावून जातो. घरची परिस्थिती गरिबीची नसली तरी इतकी विलासी नव्हती की मागेल ते पालकांकडून मिळेल. तीन बहिणींनंतर मी म्हणून लाड असले तरी त्याला काही मर्यादा होत्याच. दिवसामागून दिवस गेले, मी मॅट्रिकची परीक्षा पास झालो तसा अभ्यासात हुशार पण घरची परिस्थिती डामडोल असल्याने घरातील खर्चाला हातभार म्हणून गावातल्याच वाण्याकडे आमच्या आदरणीय वडिलांनी आम्हाला नोकरीस लावले. वाणी तसा भला माणूस, पण नावातील चिकूपणा त्याच्या वागण्यात इतका भिनला होता की त्याच्या चिकूशेठ नावाला तो जागला आणि जगाला अस म्हटले तर चुकीचे ठरू नये. चिकूशेठ पाच फुटी उंचीचा ढेर बाहेर निघालेला आणि कदाचित लहानपणापासून एककल्ली वाढल्याने समाजात माणसांत कसे बोलायचे ह्याची अक्कल नसलेला स्वार्थी, हेकेखोर, प्रचंड चिडचिडा असलेला कंजूस व्यक्ती म्हणजे हा चिकूशेठ.
चिकूशेठ हा एक अत्यंत कठोर आणि चिडचिडा स्वभावाचा माणूस होता. त्याच्या दुकानात काम करणाऱ्या मला तो नेहमीच त्रास द्यायचा. चिकूशेठच्या दुकानात काम करणे म्हणजे आगीत हात टाकण्यासारखे होते. त्याच्या अत्यंत लहान-सहान गोष्टींवरून रागावणे, अनावश्यक टीका करणे आणि नोकरांवर चिडचिड करणे हे सामान्य होते. मला त्याच्या दुकानात अत्यंत कमी पगारावर काम करावे लागायचे आणि त्याच्या कठोर शब्दांचा सामना करावा लागायचा.
चिकूशेठच्या वागणुकीमुळे मला अनेकदा अपमानित वाटायचे. त्याच्या अविचारी वागणुकीमुळे माझ्या मनात त्याच्याविषयी नकारात्मक भावना निर्माण झाल्या. परंतु मी त्याच्या या अनुभवातून शिकून घेतले आणि आपल्या जीवनात अधिक चांगले व्यक्ती बनण्याचा प्रयत्न केला पण केवळ आपण चांगले असून बदल घडत नाही चिकूशेठ इतका एकलकोंडी आणि स्वार्थी होता की त्याला दुसऱ्याचा अपमान करण्याचा जसा छंदच होता. जसे एखाद्याला दुखावल्याशिवाय त्याचे जेवण पचत नसे. मी अनेकदा विचार केला की ही नोकरी सोडावी, पण घरच्या परिस्थितीमुळे तो हतबल होता. वडिलांचे कष्ट आणि बहिणींची लग्ने या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली तो दबला गेला होता. चिकूशेठच्या प्रत्येक टोमण्याला मी शांतपणे गिळत असे, पण आतून मी पूर्णपणे तुटत चाललो होतो. चिकूशेठच्या दुकानात काम करताना माझे दिवस एखाद्या कसरतपटूसारखे चालले होते. शेठचा कंजूसपणा इतका टोकाचा होता की, दुकानातील ट्यूबलाईट जास्त वेळ चालू राहिली तर वीजबिल जास्त येण्याचा 'शॉक' नाही तर 'हार्ट अटॅक' येण्याची भीती वाटायची.

एकदा तर हद्दच झाली! भर उन्हाळ्यात मी घामाघूम झालो होतो, म्हणून दुकानाचा छोटा पंखा चालू केला. चिकूशेठ धावत आले आणि ओरडले, "कुलदीप, पंखा हवा खाण्यासाठी असतो, हवा उडवण्यासाठी नाही ! तुला गरम होतंय ना? मग उभा राहून स्वतःच हात वेगाने हलव, हवा पण लागेल आणि व्यायाम पण होईल. फुकटची वीज कशाला जाळतोस?" त्यांच्या अशा वागण्याने अंगाची लाहीलाही व्हायची, पण घरी आई-वडिलांच्या चेहऱ्याकडे बघून मी गप्प बसायचो.

चिकूशेठ म्हणजे केवळ एक नाव नव्हतं, तर तो एक अजब नमुना होता. पाच फुटी शरीरयष्टी, अंगापेक्षा बाहेर आलेलं ते अवाढव्य पोट आणि त्यावर नेहमी घट्ट बसलेला मळकट सदरा, हे त्याचं बाह्य रूप. पण या रूपापेक्षा त्याच्या स्वभावगुणांची चर्चा गावात जास्त होती. लहानपणापासूनच कोणाचेही न ऐकता, स्वतःच्याच धुंदीत आणि मर्जीप्रमाणे वागल्याने त्याच्यात एक प्रकारचा 'एककल्लीपणा' मुळापासून रुजला होता. समाजात वावरताना चार माणसांत कसं बोलावं, कुणाचा आदर कसा राखावा, याची पुसटशी जाणीवही त्याला नव्हती.
त्याचा स्वार्थीपणा तर इतका पराकोटीचा होता की, समोरच्याचं नुकसान झालं तरी चालेल, पण स्वतःचा एक पैशाचाही तोटा त्याला सहन व्हायचा नाही. गल्ल्यावर बसल्यावर त्याचे डोळे गिधाडासारखे फक्त पैशांवर खिळलेले असायचे. कोणा गरीब ग्राहकाने एखादी वस्तू उधार मागितली किंवा दोन पैसे कमी करण्याची विनंती केली, की चिकूशेठचा हेकेखोरपणा जागा व्हायचा. "दुकाण उघडलंय ते लोकांचं कल्याण करायला नाही, तर धंदा करायला," हे त्याचं ठरलेलं वाक्य.
त्याच्या स्वभावातला चिडचिडेपणा तर अंगात भिनलेल्या विषासारखा होता. दुकानात काम करणाऱ्या माझ्यावर तो कारणाशिवाय खेकसायचा. कधी मालाची मांडणी नीट नाही म्हणून, तर कधी गिराईकाला जास्त वेळ दिला म्हणून. त्याचं बोलणं म्हणजे साध्या शब्दांचा संवाद नसायचा, तर ते समोरच्याच्या मनाला टोचणारे बोचरे बाण असायचे. दुसऱ्याला अपमानित करण्यात त्याला एक प्रकारचा अघोरी आनंद मिळायचा. इतरांच्या भावनांशी खेळणं आणि त्यांना कमी लेखणं हा जणू त्याचा रोजचा विरंगुळाच बनला होता. चिकूशेठच्या लेखी माणुसकीपेक्षा गल्ल्यातल्या नाण्यांचा आवाज जास्त महत्त्वाचा होता, आणि याच स्वभावामुळे तो गावात असूनही सगळ्यांपासून मानसिकदृष्ट्या कोसो दूर, आपल्याच अहंकाराच्या कोषात एकटा पडला होता.

चिकूशेठ नकोसा असला तरी त्याच्याशी संपूर्ण गावातील लोकांचा रोजचा सबंध यायचा. गावातील एकमेव आणि सगळ्या गोष्टी मिळणाऱ्या वाण्याचे दुकान ते त्यामुळे दुकानासमोर गर्दी असायचीच. दुकानासमोरील पार हा गावकऱ्यांचा बैठक करण्याची जागा त्यामुळे सतत दुकानासमोर वर्दळ ठरलेली असायची. चिकूशेठ त्याच्या कंजूस वृत्तीमुळे जितका कुप्रसिद्ध होता तितकाच त्याच्या कंजूस वृत्तीमुळे अडचणीत येण्याबद्दल विशेष प्रसिद्ध होता. गावातील हा पार चिकूशेठच्या किस्से नी लोटपोट होत असे. पारावार आलेली गावकरी दुकानात येणाऱ्या लोकांशी होणारे संभाषण आणि जुने किस्से चर्चा करण्यासाठीच तर बनला नव्हता ना अशी मला शंका येते.

आपल्या चिकुशेठला काय, स्वस्ताईचा नाद भयंकर ! आणि वरून 'फुकट' म्हटलं की चिकुशेठ अगदी जीव ओवाळून टाकायचे. त्यांच्या याच स्वभावामुळे तो नेहमीच काहीतरी भानगडीत अडकायचे.

असंच एकदा चिकुशेठ गावात बसले होते आणि गप्पांच्या ओघात कुणीतरी सांगितलं, "अहो चिकुशेठ, पलीकडच्या जंगलात, त्या जुन्या वडाच्या झाडाला एक भलामोठा मधाच पोळं लागलंय ! इतकं मोठं पोळं मी आयुष्यात पाहिले नाही." चिकुशेठच्या डोक्यात लगेच प्लान शिजला! "अरे वा ! मग तर हे मध आपलंच !" बाजारात शंभर रुपये किलो मध विकत घ्यायला चिकुशेठला जीव येई. इते तर अख्खं पोळं फुकटात मिळत होतं. चिकुशेठनी लगेच एका गोणीत जुनाट चादर, पालापाचोळा आणि एक काठी घेतली आणि निघाले जंगलाकडे. जंगलात पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं, खरंच ते पोळं खूप मोठं होतं! त्यांच ं मन आनंदानं फुलून गेलं. पहिल्यांदा त्यांना थोडी भीती वाटली, कंजुषी पेहलवान मध गोळा करून मिळणाऱ्या पैश्याची स्वप्ने पाहत होता.चिकुशेठनी पोळ्याकडे पाहिलं. हजारो माश्या घोंगावत होत्या. पण फुकटच्या मधाच्या लोभापायी त्यांनी हिंमत केलीच. शेठनी पालापाचोळा पेटवला आणि धूर करायला सुरुवात केली. पण त्यांना कुठे माहीत होतं की त्यांच्या नशिबात आज मधाऐवजी माश्यांचा 'प्रसाद' लिहिलेला आहे! त्यांनी धूर करताना आपलं तोंड नीट झाकलं नव्हतं. जसा धूर पोळ्याकडे गेला, माश्या चिडल्या, थेट चिकुशेठवर हल्ला केला !

"आई गं! बापरे! मेलो, गेलो !" चिकुशेठ ओरडले. एका क्षणात त्यांच्या डोक्यावर, गालावर, नाकावर, हातावर माश्यांनी डंख मारायला सुरुवात केली. शेठ सैरावैरा पळायला लागले. धावता धावता त्यांची नजर एका डबक्याकडे गेली. "चिखलात पडलो तर माश्या दूर होतील !" असा विचार करून चिकुशेठनी थेट डबक्यात उडी घेतली. पण काय उपयोग? माश्या काही त्यांना सोडायला तयार नव्हत्या. आता चिकुशेठ अर्धे चिखलात रुतले होते, अंगाला मध चिकटले होते. माश्या अजूनही त्यांना डंख मारत होत्या. त्यांचे कपडे फाटले होते, चेहरा सुजला होता, अंगातून रक्त येत होतं. चिकुशेठनी जीव वाचवण्यासाठी चिखलातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. पण ते अधिकच आत रुतत चालले होते. त्यांची अवस्था फारच बिकट झाली. त्यांना अक्षरशः रडू कोसळले. शेवटी कसेबस ते चिखलातून बाहेर आले, पण त्यांची अवस्था पाहून कुणीही त्यांना ओळखले नसतं. मध तर नाहीच, उलट अंगावरची सूज कमी करायला डॉक्टरांकडून इंजेक्शन घ्यावं लागलं. त्याचे पैसे गेले ते वेगळेच.

फुकट मिळाले की अंगातला बकासुर जागा व्हायचा चिकूशेठचा. स्वतः कधी कोणाला कवडी न सोडणारा मात्र गावातील सप्ताह असू द्या की कोणता समारंभ, निमंत्रण असले की हक्काने तिथे जाण्याचा त्याचा पायंडा होता.गावातल्या पाटलाच्या घरातील लग्नात पठ्ठ्याने २५ गुलाबजाम पैजेवर खाल्ले आणि पुढेच तीन दिवस लिंबू पाण्यावर काढले. लग्नाला आलोच आहे तर वसूल तर करू दे असा त्याचा अट्टाहास असायचा. गावातल्या प्रत्येक माणसाकडे चिकुशेठचा एक तरी अजब करण्याचा किस्सा होता म्हणजे होताच. माझे त्याच्या दुकानात एक एक दिवस ढकलणे चालू होते. एक दिवशी गोदामात ठेवलेली काचेची बरणी चुकून फुटली तर शेठने लाखोली वाहिली, पगारातून दुप्पटीने पैसे वजा केले आणि कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. गरीब का असेना पण त्या दिवशी माझा स्वाभिमान काही मला शांत बसू देईना. दुसऱ्या दिवसापासून मी काही कामाला गेलो नाही आणि पगाराचे पैसे द्यावे लागू नये म्हणून त्याने मला बोलावले नाही. 

मॅट्रिकच्या परीक्षेचा निकाला लागला आणि पुढे काय करायचे,शहरात जाऊन कुठेतरी काम शोधावे,  पुढे शिकण्याची तयारी करावी असा मानस मी मनोमन केला होता. मी कामावरून निघून गेल्याला आता दोन दिवस झाले होते. मनात भविष्याची चिंता होती, पण स्वाभिमान जपल्याचं समाधानही होतं. तितक्यात गावात आरडाओरडा ऐकू आला, "धावा! पळा! चिकूशेठच्या दुकानाला आग लागली!"
मी धावतच दुकानापाशी पोहोचलो. दुकानातून धुराचे लोट बाहेर येत होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असं वाटत होतं. गावातील लोक तिथे जमा झाले होते, पण कोणीही पुढे जाण्यास धजावत नव्हतं. लोक आपापसात कुजबुजत होते, "जाऊ दे रे, अख्खं गाव लुटलंय त्यानं, आता भोगू दे कर्म!", "पाण्याने आग विझवायला गेलो, तरी हा पाण्याचे पैसे मागेल!" लोकांच्या मनात चिकूशेठबद्दल इतका कडवटपणा होता की, त्या भीषण आगीतही कोणाला त्याची दया येत नव्हती.
तेवढ्यात माझी नजर दुकानाच्या आत गेली. चिकूशेठ वेड्यासारखे आगीत उडी मारून गल्ल्यातील पैसे आणि काही महागड्या वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. "शेठ, बाहेर या! जीव वाचवा!" मी जोरात ओरडलो. पण शेठना पैशांपुढे मृत्यू दिसत नव्हता. अचानक छताचा एक जळता लाकडी वासा दरवाजासमोर पडला आणि शेठ आत अडकले.
"वाचवा! कोणीतरी वाचवा!" आता मात्र शेठचा जीव कंठाशी आला होता. त्यांच्या आवाजातली ती घमेंड कुठल्या कुठे पळाली होती, तिथे फक्त जगण्याची आर्त हाक होती.
माझ्यातला 'कुलदीप' आता शांत बसू शकत नव्हता. त्यांनी मला अपमानित केलं होतं, माझे पैसे कापले होते, पण शेवटी ते एक माणूस होते. मी कसलाही विचार न करता जवळच असलेला पाण्याचा हंडा स्वतःवर ओतला, तोंडाल रुमाल बांधला आणि जळत्या वाशावरून उडी मारून आत घुसलो. आत धुरामुळे श्वास घेणं कठीण होतं. चिकूशेठ कोपऱ्यात निपचित पडले होते, आगीच्या ज्वाळा त्यांच्या जवळ पोहोचत होत्या.
मी मोठ्या हिंमतीने त्यांना खांद्यावर टाकलं आणि बाहेरच्या दिशेला झेप घेतली. आम्ही बाहेर येताच दुकानाचा पुढचा भाग कोसळला. लोकांनी धावत येऊन आमच्यावर पाणी ओतलं. चिकूशेठ शुद्धीवर होते, पण ते पूर्णपणे हादरले होते.
काही वेळाने शेठ सावरले. त्यांनी आजूबाजूला पाहिलं—ज्या गावावर त्यांनी कधी प्रेम केलं नाही, ती माणसं लांब उभी राहून तमाशा बघत होती. आणि ज्याला त्यांनी लाथाडलं होतं, तो कुलदीप स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवून शेजारी बसला होता.
चिकूशेठच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. ज्यांच्या लेखी नाण्यांचा आवाज संगीतासारखा होता, त्यांना आज माणुसकीची किंमत कळली होती. त्यांनी थरथरत्या हाताने माझा हात धरला आणि गहिवरलेल्या आवाजात म्हणाले, "कुलदीप, मला माफ कर रे बाबा! मी पैशांच्या हव्यासापोटी इतका आंधळा झालो होतो की माणसांची किंमतच विसरलो. आज या आगीने माझं दुकान जाळलं नाही, तर माझा अहंकार जाळून खाक केलाय. अख्ख्या गावाने पाठ फिरवली, पण तू धावून आलास..."
त्या दिवशी चिकूशेठ खऱ्या अर्थाने बदलले. त्यांनी केवळ माझा पगारच दिला नाही, तर माझ्या पुढच्या शिक्षणासाठी हवी ती मदत करण्याची जबाबदारीही घेतली. "नावात काय आहे?" असं विचारणाऱ्या शेक्सपिअरला कदाचित उत्तर मिळालं असत नावात काहीही असलं, तरी माणसानं वागावं कसं, ही चिकूशेठ समजले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रपती

तिरुपती बालाजी: जगातील सर्वात श्रीमंत देवाच्या संपत्तीचे 'हे' आहे रहस्य!

मुक्त विद्यालय (Open School)