अस्तित्वाची' तांत्रिक अडचण!
आपल्या आयुष्यात 'एन्गेजमेंट' नावाचा एक मोठा बागुलबुवा असतो. फेसबुकवर पोस्ट टाकली की किती 'लाईक्स' आले, व्हॉट्सॲपवर मेसेज वाचला की नाही, यातच आपलं अस्तित्व सामावलेलं असतं पण या माणसाचं काय? याच्या आयुष्यात 'ब्लू टिक' देणारं कोणी उरलं नाहीये का?
माणूस जेव्हा एकटा पडतो, तेव्हा तो शांत होतो असं आपल्याला वाटतं पण खरं तर तो 'डिलीट' झालेला असतो. त्याच्या मनात एक भयंकर उलथापालथ चालू असते आणि ही उलथापालथ पहिले आणि दुसरे जागतिक महायुद्धात जितकी हानी झाली होती त्यापेक्षा जास्त हानी त्या व्यक्तीची होत असते. फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये त्याचं नाव असतंच, पण त्यावर कधी रिंग वाजत नाही. त्याच्या घरातला टीव्ही मोठ्या आवाजात सुरू असतो, बहुधा त्याला शांततेची भीती वाटत असावी. तो भाजीवाल्याशी उगाच पाच मिनिटं जास्त बोलतो, कारण कदाचित पूर्ण दिवसातलं त्याचं तेवढंच काय ते 'सोशल नेटवर्किंग' असतं.
आजच्या जगात तुमचं महत्त्व तुमच्या 'उपयुक्ततेवर' (Utility) ठरतं. जोपर्यंत तुम्ही कोणाच्या कामाचे आहात, तोपर्यंत तुमचं 'स्टेटस' अपडेटेड राहतं. ज्या दिवशी तुम्ही निवृत्त होता किंवा कोणाच्या तरी चौकटीतून बाहेर पडता, त्या दिवशी तुमचं अस्तित्व एखाद्या जुन्या, विसरलेल्या फाईलसारखं होतं.जी रद्दीत टाकायची राहून गेलीये, इतकंच!
आपण आपल्या मोबाईलचं व्हर्जन दर महिन्याला अपडेट करतो. पण आपल्या आसपास असलेल्या या 'जुन्या व्हर्जन'च्या माणसांचं काय? त्यांच्याकडे अनुभव असतो, पण तो ऐकायला कोणाकडे 'बँडविड्थ' नसते. ते एकटे पडतात कारण ते आजच्या 'फास्ट फॉरवर्ड' जगाशी मॅच होऊ शकत नाहीत. शेवटी काय, माणसं ही सुद्धा डेटासारखीच झाली आहेत. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत बॅकअप घेतला जातो, नाहीतर 'क्लिअर कॅशे' करून त्यांना आयुष्यातून काढून टाकलं जातं. तो बाकावर बसलेला माणूस म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून, आपल्या सर्वांचं कदाचित 'फ्यूचर व्हर्जन' आहे, ज्याची आपल्याला सध्या कल्पनाही करवत नाही.
जगाने दुर्लक्षित केलेल्या लोकांना मोह असतो, इच्छा असते पण ती कोणापुढे व्यक्त करत नाही कारण त्यातून येणारा नकार पचवण्याची शक्ती त्याच्यात राहिलेली नसते. एकटेपण एकटे येत आणि आत्मविश्वास निघून जात असतो. एक्कलकोंडा झालेला हा व्यक्ती इतका खचलेला असतो की कोणी त्याच्याकडे बोलायला आलेंत्री त्याच्या छातीत धस्स होते. माणसं ओळखण्याचे कसब निघून जाते. ज्याच्यावर विश्वास ठेवावा तीच लोक दगा देतात तर अनोळखी माणूस त्यांना कधी कधी मदत करून जातो.
...एकटेपण हा असा आजार आहे की त्याचे औषध फक्त त्या व्यक्तीकडे असते, पण ते औषध घेऊन जगण्याची उमेद मात्र आता संपलेली असते.
तो बाकावरचा माणूस अचानक उठला. त्याची थरथरणारी पावलं घराच्या दिशेने वळली. घराचा दरवाजा उघडताच, त्या बंद खोलीतला कुबट वास आणि टीव्हीचा तोच कर्कश आवाज त्याचं स्वागत करायला तयार होता. त्याने कोचावर बसून समोरच्या भिंतीवरच्या एका जुन्या फोटोकडे पाहिलं. फोटोतली माणसं हसत होती, पण त्या हसण्याला आता फक्त काचेचं संरक्षण होतं.
त्याला जाणवलं, की आपण कोणाकडे तक्रारही करू शकत नाही. कारण आजच्या 'डिजिटल' जगात संवाद महाग झालाय आणि डेटा स्वस्त. लोकांना तुमच्या पोस्टवर 'सॅड इमोजी' टाकायला वेळ आहे, पण तुमच्या घरात येऊन दोन मिनिटं शांत बसायला कोणाकडेच 'डेटा' उरला नाहीये.
त्या माणसाने खिशातून एक जुनी डायरी काढली. त्यातले काही नंबर आता 'आऊट ऑफ सर्व्हिस' झाले होते, तर काही 'नॉट रिचेबल'. त्याने ती डायरी पुन्हा खिशात ठेवली. त्याला आता कोणाला फोन लावायचा नव्हता, कारण त्याला माहित होतं की पलीकडून आवाज येईल तो फक्त यंत्राचा... "कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा."
बाहेर अंधार पडला होता. सोसायटीचे दिवे लागले होते. बाकावर आता दुसरी कुणीतरी तरुण मुलं येऊन बसली होती, त्यांच्या हातातल्या मोबाईलच्या स्क्रीनचा उजेड त्यांच्या चेहऱ्यावर चमकत होता. त्यांना हे माहीतच नव्हतं की ज्या बाकावर ते बसलेत, तिथे नुकताच एक इतिहास बसून गेला होता. एक असा इतिहास, जो भविष्यात त्यांच्याच रूपाने पुन्हा त्या बाकावर येणार होता.
शेवटी, आयुष्य हे एका 'अॅप'सारखं झालंय. कितीही फीचर्स असले, तरी शेवटी 'मेमरी फुल' झाली की जुन्या गोष्टी डिलीट कराव्याच लागतात. फरक इतकाच की, मोबाईल हँग झाला की रिस्टार्ट करता येतो, पण आयुष्य हँग झालं की फक्त 'डिस्कनेक्ट' व्हायची वाट पहावी लागते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा