कोथिंबिरीची जुडी: ती आणि मी कथा
आमच्या गावाचा आठवडी बाजार म्हणजे दर शुक्रवारी भरणारी जत्राच. तसा मला बाजारात जायचा खूप कंटाळा, पण शुक्रवारी मात्र मी आईच्या मागे लागून पिशवी घेऊन तयार असायलो. कारण साधं होतं.त्या गर्दीत, धुळीत आणि भाजीवाल्यांच्या ओरडण्यात मला 'ती' दिसायची.
ती आणि मी एकाच गल्लीतले, पण आमचं जगणं वेगळं. ती कष्टाळू, घरची जबाबदारी उचलणारी आणि मी आपला कॉलेज सांभाळून उनाडक्या करणारा. पण शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता आमची 'वेळ' जुळायची.
बाजारात पाय ठेवायला जागा नसायची. पिवळ्या बल्बच्या उजेडात भाजीवाले ओरडत असायचे, "दहाची जुडी, दहाची जुडी!" त्या कलकलाटात माझे डोळे फक्त तिला शोधायचे. आणि ती दिसायची.भाजीच्या ढिगाऱ्यासमोर खाली बसलेली, पदर कमरेला खोचलेला आणि भाजीवाल्याशी नडणारी.
तिचं ते 'भाव ताव' (Bargaining) करणं बघण्यासारखं असायचं.
"अहो मामा, हे काय वांगी दिलीत? किडकी आहेत सगळी. नीट भाव लावा," ती असा काही दम भरायची की भाजीवाला सुद्धा १० रुपये कमी करायचा. मी मात्र तिच्या बाजूला उभं राहून गप्प बघायलो. मला वांगी कशी निवडायची हे ही माहीत नव्हतं, पण तिच्याकडे बघून मी शिकायचा प्रयत्न करायलो.
कधीतरी तिचं लक्ष माझ्याकडे जायचं. ती हसून म्हणायची, "तुम्ही नका घेऊ इथून, हा लुटतोय. पुढे चला, चांगलं मिळतंय."
त्या एका वाक्यावर मी भाजीवाल्याच्या हातातली पिशवी तशीच सोडून तिच्या मागे निघायलो. तिचं ते 'गाईड' करणं मला भारी वाटायचं.
बाजारातल्या अरुंद गल्ल्यांमधून चालताना खूप गर्दी असायची. धक्के लागायचे. अशा वेळी मी नकळत तिच्या पुढे व्हायलो आणि गर्दी बाजूला सारून तिला रस्ता करून द्यायलो. तिने कधी 'थँक यू' म्हटलं नाही, पण तिचे डोळे बोलायचे. गर्दीचा फायदा घेऊन कधीतरी आमचा खांदा एकमेकाला घासला जायचा, तेव्हा त्या गोंगाटातही मला माझ्या हृदयाचे ठोके ऐकू यायचे.
माझी पिशवी नेहमीच अर्धी रिकामी असायची आणि तिची मात्र काठोकाठ भरलेली. मला वाटायचं, "लाग ना, घेतो मी तुझी पिशवी," पण आजूबाजूला गावचे लोक, ओळखीचे चेहरे. लोकांच्या नजरेच्या धाकाने मी मदतही करू शकत नव्हतो. हे दुर्दैवच होतं.
सर्वात सुंदर प्रसंग म्हणजे शेवटी कोथिंबिरीची जुडी घेतानाचा.
आम्ही एका आजींकडे कोथिंबीर घ्यायला थांबलो.
तिने जुडी घेतली आणि आजींना विचारलं, "आजी, मिरची वर देणार का फुकट?"
आजींनी हसून मूठभर मिरच्या तिच्या पिशवीत टाकल्या.
तिने माझ्याकडे पाहिलं. माझ्या पिशवीत फक्त कांदे-बटाटे होते.
"अहो, कोथिंबीर नाही घेतली का?" तिने विचारलं.
"नाही ग, विसरलो," मी बावळटासारखं उत्तर दिलं.
तिने तिच्या जुडीतली अर्धी कोथिंबीर तोडली आणि काहीही न बोलता माझ्या पिशवीत टाकली.
"घेऊन जा, आई ओरडेल नाहीतर," ती हळू आवाजात म्हणाली.
ती हिरवीगार कोथिंबीर आणि त्यासोबत मिळालेली तिची ती काळजी... माझ्यासाठी त्या बाजारातली ती सर्वात महागडी कमाई होती.
बाजार संपवून आम्ही घराच्या वाटेवर लागायलो. रस्ता एकच होता, पण आम्ही अंतरा अंतराने चालायलो. पुढे ती, मागे मी. पिवळ्या दिव्यांच्या प्रकाशात तिची सावली रस्त्यावर पडायची आणि मी त्या सावलीवर पाय देत तिच्या सोबत चालायलो.
घराचा कोपरा आला की ती वळायची. एकदा मागे वळून बघायची, डोळ्यांनीच निरोप घ्यायची आणि घरात जायची.
मी घरी गेल्यावर आई पिशवी तपासायची.
"अरे, ही कोथिंबीर कुठून आणली? तू तर कधीच आठवणीने आणत नाहीस," आई विचारायची.
मी गालातल्या गालात हसून म्हणायलो, "मिळाली ग स्वस्तात..."
...मी गालातल्या गालात हसून म्हणालो, "मिळाली ग स्वस्तात..."
ते शुक्रवार असेच सरत होते. दर आठवड्याला त्या कोथिंबिरीच्या जुडीसोबत आमच्या मूक प्रेमाची जुडी सुद्धा घट्ट होत होती. मला वाटायचं हे असंच चालत राहील. ती, मी आणि आमचा हा आठवडा बाजार. पण म्हणतात ना, बाजाराची वेळ ठरलेली असते, तशीच काही नात्यांची वेळही ठरलेली असते, हे मला उशिरा उमजलं.
एका शुक्रवारी बाजारात गेल्यावर कळलं की हे सगळं आता बदलणार आहे. तिच्या लग्नाची तारीख ठरली होती. त्या दिवशी ती नेहमीसारखी भाजी घ्यायला आली नव्हती, तर लग्नासाठी लागणारी झेंडूची फुलं आणि पूजेचं सामान घ्यायला आली होती. तिच्या हातावर मेहंदीचा रंग चढला होता. ती नेहमीसारखी भाजीवाल्याशी १०-५ रुपयांसाठी भांडत नव्हती. ती शांत होती, खूपच शांत.
मी एका कोपऱ्यात उभा राहून तिला बघत होतो. त्या दिवशी बाजारातली ती कालवा, ती गर्दी मला खायला उठली होती. तिने फुलं घेतली आणि वळली. आमची नजरभेट झाली. त्या गर्दीत पहिल्यांदा मला भयंकर एकटेपणा जाणवला. तिने माझ्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. तिची ती नजर मला स्पष्ट सांगत होती "सांभाळून घे रे स्वतःला, पुढच्या शुक्रवारी मी नसेन हं इथे!"
आम्ही काहीच बोललो नाही. ना मी तिला शुभेच्छा दिल्या, ना तिने निरोप घेतला. त्या दिवशी मी बाजारातून काहीच खरेदी केलं नाही. रिकामी पिशवी घेऊन मी घरी आलो, पण मन मात्र विचारांनी काठोकाठ भरलेलं होतं.
काही दिवसांतच ती सासरी गेली. गावच्या एसटी स्टँडवरून तिची गाडी धुरळा उडवत गेली आणि माझ्यासाठी तो 'शुक्रवार' कायमचा संपला.
आता आजही आठवडी बाजार तसाच भरतो. तीच गर्दी, तोच गोंगाट आणि तोच भाज्यांचा वास. पण आता त्या गोंगाटात मला संगीत वाटत नाही, तर तो फक्त कानठळ्या बसवणारा आवाज वाटतो. मी आताही आईसाठी भाजी आणायला जातो. पण ज्या कोथिंबीरवाल्या आजींकडून ती हक्काने मिरच्या मागायची, त्या आजी मला बघून आजही विचारतात, "काय रं, ती तुझी मैत्रीण नाही आली का रं आजकाल? दिसत नाही?"
तेव्हा घशात आलेला आवंढा गिळून, खोटं हसून सांगावं लागतं, "ती आता पाहुणी झाली आजी, आपल्या गावची राहिली नाही."
खिशात पैसे असूनही आता बाजारातून रिकाम्या हाताने परतल्यासारखं वाटतं. कारण, बाजार तर तोच आहे, भाज्याही त्याच आहेत, रस्तेही तेच आहेत... फक्त त्या गर्दीत हरवलेला माझा 'तो' कोपरा आणि कोथिंबिरीचा 'तो' सुगंध आता कधीच सापडत नाही.
आठवडी बाजार शिकवून गेला की, माणसं बाजारात भेटतात, सोबत चालतात, पण प्रत्येकाची 'घरची वाट' वेगळी असते!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा