लॉग आऊट : ती आणि मी
माझा आणि तिचा संबंध फक्त ऑफिसपुरता होता, किंवा तसं जगाला वाटत होतं. मी नवीनच जॉईन झालेलो, एक साधा ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह. आणि ती? ती सिनियर होती. ऑफिसमध्ये तिची एक वेगळीच हवा होती. ती मीटिंगमध्ये बोलायला लागली की पिन-ड्रॉप सायलन्स व्हायचा. तिचं ते कॉर्पोरेट ड्रेसिंग, गळ्यात आय-कार्ड, हातात डायरी आणि चेहऱ्यावर एक प्रोफेशनल कडकपणा... तिला बघून मला भीतीच वाटायची सुरुवातीला.
पण ऑफिसच्या त्या चकचकीत काचेच्या केबिनच्या पलीकडे एक दुसरी 'ती' होती, जी मला फक्त लंच ब्रेक किंवा पँट्री दिसायची.
माझं प्रेम (?) हे कॉलेजसारखं उनाड नव्हतं. हे ऑफिसचं प्रेम होतं, दडपलेलं, मोजून मापून केलेलं आणि 'एच.आर. पॉलिसी'च्या (HR Policy) भीतीखाली वावरणारं. आमची पहिली ओळख कामाच्या निमित्ताने झाली. मी काहीतरी चूक केली होती आणि मला वाटलं आता ओरडा पडणार. पण ती माझ्या डेस्कवर आली, शांतपणे चूक समजावून सांगितली आणि जाताना फक्त इतकंच म्हणाली, "पुढच्या वेळी सांभाळून, नवीन आहेस म्हणून सोडतेय." त्या दिवशी मला तिच्यातला 'बॉस' नाही, तर एक 'माणूस' दिसला.
दिवस जात होते. ऑफिसच्या कम्युनिकेटरवर (Teams/Slack) तिच्या नावापुढचा तो 'Green Dot' (ऑनलाईन स्टेटस) बघितला की मला बरं वाटायचं. कामाच्या बहाण्याने मी तिला मेसेज करायचो आणि तिच्या रिप्लायच्या प्रतीक्षेत स्क्रीनकडे बघत बसायचो. ती जेव्हा "Typing..." दिसायची, तेव्हा हृदयाचे ठोके वाढायचे. तिचं ते कामापुरतं बोलणं, अधूनमधून स्माईली पाठवणं, हेच माझ्या दिवसाचं इंधन होतं.
हळूहळू आमची मैत्री झाली, पण एका मर्यादेत. आम्ही कँटीनमध्ये एकत्र बसू लागलो. मला कळलं की या कडक बॉसच्या मागे एक साधी मुलगी आहे, जिला घरच्या जबाबदाऱ्यांचं टेन्शन आहे. जिला ऑफिसच्या राजकारणाचा कंटाळा येतो. जसा पहिल्या कथेत तो मित्र होता, तसा इथे एक सहकारी होता जो मला कोपरखळी मारायचा, "काय, मॅडम आज निळ्या साडीत भारी दिसतायत ना?" मी फक्त हसायचो, पण मनात कुठेतरी हे मान्य केलं होतं की, ती माझ्या आवाक्याबाहेरची आहे. तिचा पगार, तिचं पद आणि तिचं राहणीमान माझ्यापेक्षा कितीतरी पटीने वरचं होतं. मध्यमवर्गीय मुलाला प्रेमात पडताना सुद्धा आधी खिशातला पगार आणि भविष्याची एफ.डी. (FD) बघावी लागते.
एका पावसाळी संध्याकाळी, ऑफिसमधून निघायला उशीर झाला होता. आम्ही दोघेच लिफ्टमध्ये होतो. ती खूप शांत होती, नेहमीसारखी कणखर वाटत नव्हती.
"काय झालं मॅडम?" मी धाडस करून विचारलं.
तिने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, "काही नाही रे, घरी लग्नासाठी तगादा लावलाय. आणि मला अजून करिअरमध्ये सेटल व्हायचंय."
त्या दिवशी मला कळलं, ती सुद्धा माझ्यासारखीच लढतेय. मला तिला सांगावंसं वाटलं, "मी आहे ना, आपण बघूया." पण मी गप्प राहिलो. माझं पद आणि पगार तिच्या पालकांच्या अपेक्षांच्या चौकटीत बसणारा नव्हता, हे कटू सत्य मला माहीत होतं.
आणि मग तो दिवस आला. ती माझ्या डेस्कवर आली, हातात पेढे घेऊन. चेहऱ्यावर हसू होतं, पण डोळ्यात काय होतं ते मला वाचता आलं नाही.
"माझं लग्न ठरलं. आणि पुढच्या महिन्यात मी रिझाइन करतेय. हे घे पेढा."
मी पेढा घेतला. तो घशाखाली उतरला नाही. "अभिनंदन मॅडम," इतकंच बोललो. तिने थँक यू म्हटलं आणि ती पुढच्या डेस्कवर पेढे वाटायला निघून गेली.
तिचा फेअरवेलचा दिवस आजही आठवतो. सगळ्यांनी भाषणं दिली, केक कापला. मी मात्र कोपऱ्यात उभा होतो. तिला जाताना बघताना पुन्हा एकदा मनात एकच विचार आला आपण प्रेम व्यक्त केलं नाही हे चांगलंच झालं. कारण नकार पचवणं सोपं असतं, पण 'स्टेटस' आणि 'वास्तव' यांच्या भिंतीवर डोकं आपटून रक्तबंबाळ होण्यापेक्षा, शांतपणे माघार घेणं कधीही शहाणपणाचं.
ती गेली. तिची केबिन आता दुसऱ्या कोणाची तरी झाली आहे. पण आजही जेव्हा मी त्या केबिनकडे बघतो, किंवा ऑफिस कम्युनिकेटरवर जुन्या चॅट्स स्क्रोल करतो, तेव्हा एक हुरहुर वाटते.
ऑफिसच्या या धकाधकीच्या जगात, जिथे लोक फक्त फायद्यासाठी नाती जोडतात, तिथे माझं तिच्यावरचं प्रेम हे त्या 'अनसेव्ह्ड एक्सेल फाईल' (Unsaved Excel File) सारखं राहिलं.ज्यात खूप मेहनत होती, खूप डाटा होता, पण लाईट गेली आणि सगळं एका क्षणात पुसलं गेलं... सेव न होताच!
आता मी कामात लक्ष देतो, टार्गेट पूर्ण करतो, प्रमोशनच्या मागे धावतो. कारण मला हे समजलंय की, रिकाम्या खिशाने पाहिलेली स्वप्नं आणि अपूर्ण राहिलेलं ऑफिस प्रेम, हे माणसाला खूप लवकर 'मॅच्युअर' (Mature) बनवतं.
ती जिथे असेल तिथे सुखात असो, तिचा 'प्रॉजेक्ट' यशस्वी होवो. माझी फाईल मात्र 'इनकम्प्लीट' राहिली तरी चालेल, कारण काही हिशोब जुळवण्यात नाही, तर ते सोडून देण्यातच शांती असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा