कसोटी क्रिकेटचा नवा अध्याय ‘टू-टायर सिस्टीम’ की विभागणीचा खेळ?

कसोटी क्रिकेटचा नवा अध्याय  ‘टू-टायर सिस्टीम’ की विभागणीचा खेळ?

कसोटी क्रिकेट हा खेळाचा सर्वात शुद्ध आणि पारंपरिक प्रकार मानला जातो. पण गेल्या काही वर्षांत त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. टी-20 आणि फ्रँचायझी क्रिकेटच्या वाऱ्यात कसोटी क्रिकेट मागे पडत चालले आहे. त्यामुळे कसोटीला पुन्हा जीवंत करण्यासाठी नवनवीन कल्पना पुढे येत आहेत. त्यातलीच एक म्हणजे ‘टू-टायर सिस्टीम’.

ही कल्पना काहींना नवसंजीवनीसारखी वाटते, तर काहींना ती कसोटीच्या आत्म्यावर गदा आणणारी वाटते.

टू-टायर सिस्टीम म्हणजे काय

या योजनेनुसार कसोटी क्रिकेट दोन स्तरांत विभागले जाईल. पहिल्या स्तरात म्हणजेच टॉप टायरमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड यांसारखे प्रमुख संघ असतील. दुसऱ्या टायरमध्ये झिंबाब्वे, बांगलादेश, आयर्लंड, अफगाणिस्तान, वेस्ट इंडीज, पोर्किस्तान आणि श्रीलंका यांसारखे तुलनेने कमकुवत संघ असतील.

या दोन्ही गटांमध्ये वर-खाली जाण्याची म्हणजेच प्रमोशन आणि रेलेगेशनची पद्धत असेल. वरच्या टायरमधला सर्वात कमजोर संघ खाली येईल आणि खालच्या टायरमधला सर्वात चांगला संघ वर जाईल.

ही कल्पना मांडण्यामागचा हेतू

मुख्य उद्देश म्हणजे कसोटी अधिक स्पर्धात्मक आणि दर्जेदार करणे. जेव्हा समान ताकदीचे संघ एकमेकांविरुद्ध खेळतात तेव्हा सामने अधिक रोमांचक होतात, टीव्ही प्रेक्षक वाढतात आणि आर्थिकदृष्ट्या खेळाला आधार मिळतो. त्याचबरोबर खालच्या संघांना वर जाण्याची संधी देऊन त्यांना प्रगतीची प्रेरणा मिळावी हा उद्देशही आहे.

फायदे

या योजनेमुळे कसोटी क्रिकेटचा दर्जा वाढेल, सामने अधिक अर्थपूर्ण आणि परिणामकारक होतील. प्रत्येक संघाला टिकण्यासाठी अधिक झटावं लागेल. मालिकांना फक्त औपचारिकता न राहता स्पर्धेचं रूप मिळेल. प्रेक्षकांनाही लीगसारखा अनुभव मिळेल.

तोटे

दुसऱ्या बाजूला काही गंभीर धोकेही आहेत. खालच्या टायरमधील संघ जर टॉप संघांशी खेळलेच नाहीत, तर त्यांचा विकास थांबेल. त्या संघांना आर्थिकदृष्ट्या फायदा मिळणार नाही आणि त्यामुळे क्रिकेट काही देशांपुरतं मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

वरच्या टायरमधील संघ अधिक श्रीमंत आणि प्रभावशाली होतील, तर दुसऱ्या टायरमधील संघ अस्तित्वासाठी झगडतील. कसोटीचा जागतिक पातळीवरील समतोल बिघडू शकतो.

भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांना ही कल्पना जोखमीची वाटते. कारण कसोटी क्रिकेटमध्ये एखादा खराब सीझन आला तर त्यांना खालच्या टायरमध्ये जावं लागू शकतं. दुसरीकडे, बांगलादेश, आयर्लंड किंवा झिंबाब्वेसारख्या संघांना वाटतं की ते कायम खालच्या स्तरातच अडकून राहतील आणि वरच्या संघांशी खेळण्याच्या संधी मिळणार नाहीत.

थोडक्यात सांगायचं तर, कुणालाच ही प्रणाली पूर्णपणे फायद्याची वाटत नाही.

माझे वैयक्तिक मत

सध्याच्या स्थितीत बाराच कसोटी मान्यता असलेले देश आहेत. जर त्यांना दोन गटांत विभागलं, तर प्रत्येक गटात सहा संघ राहतील. अशा परिस्थितीत एक नियम ठेवता येईल – प्रत्येक बलाढ्य संघाने दर वर्षी किंवा दोन वर्षांत एकदा तरी खालच्या टायरमधील संघाशी कसोटी मालिका खेळावी यामुळे टॉप संघांना कसोटीचा दर्जा कायम ठेवता येईल आणि दुसऱ्या टायरमधील संघांना अनुभव, आर्थिक संधी आणि प्रसिद्धी मिळेल. अशा प्रकारे टू-टायर सिस्टीम ही फक्त विभागणी न राहता विकासाचा टप्पा ठरू शकेल.

टू-टायर सिस्टीम ही कल्पना वरकरणी कसोटी क्रिकेटचा दर्जा वाढवणारी वाटते, पण तिची अंमलबजावणी करताना समतोल राखणं अत्यंत गरजेचं आहे. कसोटी हा खेळ केवळ निकालासाठी खेळला जात नाही, तो क्रिकेटच्या आत्म्याचं प्रतीक आहे. त्या आत्म्याला जपण्यासाठी प्रत्येक देशाला समान संधी मिळणं तितकंच आवश्यक आहे.

याच पार्श्वभूमीवर आधारित अजून एक लेख सादर करेपर्यंत माझा छोटासा स्वल्प विराम,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रपती

तिरुपती बालाजी: जगातील सर्वात श्रीमंत देवाच्या संपत्तीचे 'हे' आहे रहस्य!

मुक्त विद्यालय (Open School)