शेयर मार्केटमधील ससा
शेअर बाजाराचा जंगलप्रवास
शेअर बाजार म्हणजे फक्त आकडे, चार्ट्स आणि नफा-तोट्याचा हिशेब असा सरळसोट खेळ नाही. अनेकांना वाटतं की ज्याच्याकडे जास्त ज्ञान, अनुभव आणि आकड्यांचा अभ्यास आहे तो नक्कीच पैसा कमावू शकतो. पण प्रत्यक्षात असं होत नाही. कारण हा बाजार चालतो तो लोकांच्या भावनांवर. लोकं घाबरतात, आनंदी होतात, लालच करतात, आणि त्यानुसार बाजाराची दिशा ठरते. म्हणूनच हुशारी आणि अभ्यास असूनही अनेक वेळा हुशार गुंतवणूकदारही बाजारात तोटा करतात. ही परिस्थिती आपण लहानपणी ऐकलेल्या एका गोष्टीतून सहज समजू शकतो. जंगलातला एक ससा झाडाखाली विसावलेला असतो. त्याच्या अंगावर झाडाचं पान पडतं. पण सशाला वाटतं की आभाळ कोसळलं. तो घाबरून जंगलभर धावायला लागतो आणि ओरडतो की आभाळ कोसळलं. त्याचं पाहून एकामागून एक बाकी प्राणीही न विचार करता पळायला लागतात. शेवटी संपूर्ण जंगल गोंधळात पळतं, पण खरी घटना म्हणजे फक्त एक पान खाली पडलं होतं. शेअर बाजाराचं चित्र ह्यापेक्षा वेगळं नाही. जगात एखाद्या देशात युद्ध सुरू झालं किंवा आर्थिक संकटाची बातमी आली की गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरते. काही गुंतवणूकदार आपले शेअर्स विकू लागतात. इतर लोक ते पाहून घाबरतात आणि तेही विक्री करतात. मग बाजार कोसळतो. दुसरीकडे, एखादी सकारात्मक बातमी आली की खरेदीचा ओघ सुरू होतो आणि बाजार वेगाने वर चढतो. या सगळ्या हालचाली नेहमी तर्कावर चालत नाहीत. लोकांच्या मनातला भावनिक कल बाजाराच्या आकड्यांवर आणि दिशेवर मोठा प्रभाव टाकतो. म्हणूनच शेअर बाजारात टिकण्यासाठी फक्त गणित आणि हुशारी पुरेशी नसते; बाजाराचं मानसशास्त्र समजून घेणं, भीती आणि लालचेवर नियंत्रण ठेवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे.
म्हणूनच माझे असे मत आहे की ज्याची बुद्धिमत्ता चांगली आहे, हुशार आहे त्या लोकांना शेयर मार्केटमध्ये यश मिळेलच असे नाही कारण शेयर मार्केट चालवणाऱ्या बहुतांश ससे जो निर्णय घेतील त्यावरून शेयर मार्केट आपली कुस बदलत असतो अश्यावेळी एखादा हुशार, बुद्धिमान व्यक्तीला जे घडतंय ते चुकीचे वाटत असले तरी तो स्वतः बरोबर असूनही त्याला फायदा होईल असे नसते. प्रत्येक माणसाचे स्वतःचे ठोकताळे त्यात रेसिस्टन्स, सपोर्ट सारखे नियम आपल्याला कुठे गुंतवायचे, कुठे विकायचे, कुठे होल्ड करायचे असे कैक फंडे सांगत असते आणि त्या भूतकाळातील घटनांवर आधारित संकल्पना इतक्या फिट गुंतवणूकदाराच्या डोक्यात बसलेल्या असतात की लोक बरोबर सपोर्ट शोधून खरेदी करतात, निश्चित ठिकाणी विक्री करतात आणि याचाच फायदा काही बडे गुंतवणूकदार घेत कोट्यावधी रुपये छापत असतात. आता मी जे काही बोलतोय ते त्यालाच समजेल जो शेयर मार्केट मधे थोडीफार गुंतवणूक करून ह्या मृगजळात फसला आहे. शेयर मार्केट चांगले की वाईट हा विषय नाही पण शेयर मार्केटची ही बाजू अनेकांना माहीत असेल का? असली तरी त्यांनी कधी यावर विचार केला असेल का? असे प्रश्न पडल्याने हा लेख लिहला आहे. शेयर मार्केट असेच असत अस मी म्हणत नाही पण निदान असे देखील असू शकते हा विचार तुम्ही करण्यासाठी लिहला आहे. तुम्हाला नक्की काय वाटत?
आजकाल शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना शेयर मार्केट नक्की चालते कसे? त्यातील काही महत्वाच्या गोष्टी न समजून घेता केवळ कोणाच्या तरी सल्ल्यावर, टीव्हीवरील विद्वानांची बोलणे एकूण वा यूट्यूब वरील लोकांचे एकूण बरेच कष्टाने कमावलेल्या पैशाचे तीन तेरा वाजवत असतात त्याच्यासाठी बेसिक माहितीचा पुढचा लेख घेऊन येत आहे त्यामुळे अश्याच अनेक माहितीपर विचारांसाठी ब्लॉगला लाइक करा, फॉलो करा.
तोपर्यंत रामराम.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा