सुखकर्ता-दुःखहर्ता : भक्ती, संकेत आणि शौर्य


नमस्कार मंडळी,

गणेशोत्सव अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. गल्लोगल्ली मखर सजवले जात आहेत, ढोल-ताशांचा नाद कानावर पडतो आहे, आणि प्रत्येक मनात एकच नाव गुंजत आहे –

गणपती बाप्पा मोरया!

आपण बाप्पाला घरी आणतो, आरत्या गातो, नाचतो-गातो… पण कधी विचार केला आहे का –
आपली सर्वाधिक प्रिय असलेली आरती “सुखकर्ता दुःखहर्ता” ही केवळ भक्तिगीत नाही, तर त्यामागे एक थरारक लोककथा दडलेली आहे?

संत समर्थ रामदास स्वामी (१६०८–१६८१) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु. त्यांच्या ग्रंथांतून त्यांनी भक्ती, स्वराज्य आणि धैर्याचा धडा दिला. “मनाचे श्लोक” आपल्याला अंतर्मुख करतात, “दासबोध” जीवनाचा मार्ग दाखवतो आणि हाच समर्थ भक्तीच्या मार्गाने शौर्याला दिशा देत होते. “सुखकर्ता दुःखहर्ता” आरती तुम्ही कितीतरी वेळा गायली असेल.

पण तुम्हाला माहीत आहे का –

लोकश्रुती किंवा लोककथा सांगते की ही आरती केवळ गणपतीची स्तुती नव्हती, तर प्रतापगडावरच्या अफजलखानाच्या कटाची गुप्त खबर होती!

अफजलखान प्रचंड सेना घेऊन प्रतापगडावर आला. वरवर तो म्हणत होता – “शिवाजी, आपली मैत्री होऊ द्या”. पण डोळ्यांत कपट दडलेले होते – मिठी मारून गळा आवळण्याचा त्याचा बेत होता. समर्थ रामदासांना हा डाव कळला पण थेट सांगितले असते तर गुपित उघड झाले असते. त्यांनी मार्ग निवडला – भक्तिगीताचा!

आरतीतला गुप्त संदेश

“सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची” – सुखाचा आव आणून विघ्न घेऊन येतो आहे.

“नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची” – आधी प्रेम दाखवेल, पण कपटी आहे.

“कंठी झळके माळ मुकुटीसरशी” – गळ्यात माळ, मुकुट, दिमाख… पण हे सगळं सोंग.

“रत्नखचित फरा, चंदनाची उटी” – बाहेरून झगमगाट, आतून कटकारस्थान.

“रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया” – त्याची प्रत्येक पावले कपटाचा नाद करीत आहेत.

असा संकेत महाराजांनी मनाने वाचला. प्रतापगडावर भेट झाली. अफजलखानाने खरोखरच मिठी मारली… आणि गळा आवळण्याचा डाव केला पण महाराज सज्ज होते. अंगात चिलखत, डोक्यावर जिरेटोप, कमरेला बिचवा आणि हातात वाघनखे क्षणातच अफजलखानाचा कपट नष्ट झाला. स्वराज्य सुरक्षित राहिले, आणि समर्थांचा इशारा खरा ठरला. या लोककथेचा भावार्थ इतिहासात याचा ठोस पुरावा नसला तरी लोककथा सांगते ही आरती केवळ भक्ती नाही, तर सावधानतेचा इशारा होती. भक्तीच्या स्वरांतून दिलेला गुप्त संदेश होता आणि म्हणूनच ही आरती आजही गाताना आपल्याला भक्तिभावाबरोबर शौर्याचा थरार जाणवतो. आज गणेशोत्सव साजरा करताना आपण जेव्हा ही आरती गातो, तेव्हा आपल्या ओठांवर फक्त भक्ती नसते, तर डोळ्यांसमोर उभा राहतो प्रतापगड – समर्थांचा संकेत, महाराजांचे धैर्य आणि स्वराज्याची गाथा!

सुखकर्ता-दुःखहर्ता म्हणजे बाप्पाची स्तुतीही आहे आणि संकटाच्या वेळी सजग राहण्याची शिकवणही म्हणूनच ही आरती आजही प्रत्येक घराघरात घुमते – भक्ती, सावधानता आणि शौर्य यांचा संगम म्हणून!

गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!

जयोस्तुते..

तळटीप

इतिहासात ठोस पुरावा नसला तरी लोकश्रुतीनुसार असे मानले जाते की – रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना थेट गुप्त संदेशापेक्षा आध्यात्मिक आणि नैतिक संदेश देऊन सजग ठेवले. लोकांच्या भावविश्वात मात्र त्यांनी महाराजांना भक्तिगीतांतूनही गुप्त इशारे दिले, ही कल्पना आजही जिवंत आहे. मी ही कथा खरीच आहे असा कोणताही दावा करत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रपती

तिरुपती बालाजी: जगातील सर्वात श्रीमंत देवाच्या संपत्तीचे 'हे' आहे रहस्य!

मुक्त विद्यालय (Open School)