धर्मो रक्षति रक्षितः
इतिहास केवळ तारखांचा नसतो, तो असतो रक्ताने लिहिलेल्या पराक्रमाचा आणि बलिदानाचा. आज जेव्हा आपण आपल्या मुलांना 'सुपरहिरोज्'च्या काल्पनिक कथा सांगतो, तेव्हा आपण विसरतो की आपल्याच मातीत असे 'खरे' वीर होऊन गेले, ज्यांच्या शौर्यापुढे मृत्यूनेही नतमस्तक व्हावे. शिखांचे दहावे गुरु, गुरु गोबिंदसिंग जी यांचे चार सुपुत्र ज्यांना आपण आदराने 'चार साहिबजादे' म्हणतो यांची ही कथा केवळ शिख धर्माची नाही, तर ती धर्मासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक भारतीयाची प्रेरणा आहे.
चार साहिबजादे: रक्ताने लिहिलेली धर्माच्या रक्षणाची अमर गाथा!
जेव्हा अन्यायाचा डोंगर उभा राहतो आणि धर्माचा गळा घोटला जातो, तेव्हा तो धर्म टिकवण्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं. गुरु गोबिंदसिंग यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाची आहुती देऊन या देशाला 'धर्मासाठी कसं जगावं आणि कसं मरावं' हे शिकवलं. औरंगजेबाच्या जुलमी राजवटीत, जेव्हा हिंदू आणि शिख धर्मावर संकट आलं होतं, तेव्हा या चार बालवीरांनी जे बलिदान दिलं, ते पाहून आजही पाषाणहृदयी माणसाच्या डोळ्यात पाणी येईल.
चमकौरचं युद्ध: अचाट शौर्य आणि धाकट्यांचे बलिदान
१७०४ साल होतं. आनंदपूर साहिब सोडून गुरु गोबिंदसिंग आपल्या सैन्यासह निघाले होते. वाटेत 'सरसा' नदीच्या काठावर मोठी पडझड झाली आणि कुटुंब विखुरलं गेलं. गुरुजी आपल्या दोन मोठ्या मुलांसह साहिबजादा अजीतसिंग (१८ वर्षे) आणि साहिबजादा जुझारसिंग (१४ वर्षे) यांच्यासह चमकौरच्या एका कच्च्या गढीमध्ये पोहोचले. शत्रूचं सैन्य होतं १० लाखांच्या घरात (काही इतिहासकार हा आकडा अफाट मानतात) आणि गुरुजींसोबत होते अवघे ४० शिख! पण औरंगजेबाच्या सैन्याला हे माहीत नव्हतं की, ज्यांच्या पाठीशी गुरुजींचा आशीर्वाद आहे, त्यांना मृत्यूची भीती नसते. अजीतसिंगांनी जेव्हा युद्धात जाण्याची परवानगी मागितली, तेव्हा एका पित्याने आपल्या मुलाला केवळ आशीर्वाद दिला नाही, तर त्याच्या हातात तलवार देऊन मृत्यूच्या तोंडावर पाठवलं. अजीतसिंग आणि त्यानंतर अवघ्या १४ वर्षांच्या जुझारसिंगांनी मोगल सैन्यात जी काही कापाकापी केली, ती पाहून शत्रूही थक्क झाला. धर्मासाठी लढता लढता हे दोन सिंह चमकौरच्या मातीत शहीद झाले.
सरहिंदची भिंत: दोन चिमुरड्यांचा अचल निश्चय
एकीकडे मोठे बंधू युद्धभूमी गाजवत होते, तर दुसरीकडे गुरुजींचे दोन धाकटे पुत्र साहिबजादा जोरावरसिंग (९ वर्षे) आणि साहिबजादा फतेहसिंग (७ वर्षे) हे आपल्या आजी, माता गुजरीजींसोबत शत्रूच्या तावडीत सापडले. सरहिंदचा नवाब वजीर खान याने या दोन चिमुरड्यांना आपल्या दरबारात उभे केले. त्यांना लालच दाखवण्यात आली "इस्लाम स्वीकारा, तुम्हाला धनदौलत मिळेल, राजवाडे मिळतील." पण वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारी ही गुरु गोबिंदसिंगांची लेकरं होती! त्यांनी कडाडून उत्तर दिलं, "आमचं डोकं कापलं जाऊ शकतं, पण झुकू शकत नाही!" वजीर खान संतापला. त्याने या दोन ७ आणि ९ वर्षांच्या मुलांना जिवंत भिंतीत चिणून मारण्याची अमानवी शिक्षा दिली.
भिंत बांधली जात होती, जसजशी भिंत त्यांच्या गळ्यापर्यंत आली, तसतसे हे दोन साहिबजादे 'वाहेगुरु'चा जयघोष करत होते. मरणाच्या दारात उभे असूनही त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची एक लकेरही नव्हती. अखेर श्वास कोंडला, पण धर्माचा अभिमान त्यांनी सोडला नाही. त्यांच्या या बलिदानाची बातमी ऐकून माता गुजरीजींनीही आपले प्राण सोडले.
चार साहिबजाद्यांचा महत्त्वपूर्ण संदेश
१. धर्मनिष्ठा: वय कितीही असो, सत्य आणि आपल्या धर्माशी कधीही तडजोड करू नका.
२. निर्भयता: जर तुम्ही सत्याच्या बाजूने असाल, तर समोर कितीही मोठं संकट असलं तरी डगमगू नका.
३. स्वाभिमान: गुलामगिरीत सुखाचं आयुष्य जगण्यापेक्षा, स्वाभिमानाने मरणाला कवटाळणं हेच खऱ्या योद्ध्याचं लक्षण आहे.
स्मरण आणि प्रेरणा
दरवर्षी डिसेंबर महिन्यात 'शहीदी सप्ताह' पाळला जातो. हे केवळ शिखांचं दुःख नाही, तर तो आपल्या सांस्कृतिक इतिहासातील सर्वात गौरवशाली क्षण आहे. आजच्या काळात जेव्हा आपण आपल्या मुळांपासून लांब जात आहोत, तेव्हा या साहिबजाद्यांची आठवण आपल्याला 'सनातनी' मूल्यांची जाणीव करून देते.
चार साहिबजाद्यांचं बलिदान ऐतिहासिक आहेच, पण ते आजच्या काळासाठी 'अलार्म' आहे. आपण प्रत्येक वेळी कोणा अवताराची किंवा 'कोणीतरी येईल आणि आपलं रक्षण करेल' याची वाट पाहत बसतो. पण सात आणि नऊ वर्षांच्या मुलांनी दाखवून दिलं की, अवतार येईपर्यंत थांबण्यापेक्षा स्वतः धर्मासाठी 'गतिरोधक' बना. जर आपण आपल्या मुलांना आपल्या धर्माची, शौर्याची आणि बलिदानाची ही गाथा घरातूनच शिकवली नाही, तर पुढच्या पिढीला आपला वारसा कसा कळणार? देव, देश आणि धर्म या तीन गोष्टींपेक्षा मोठं या जगात काहीही नाही. साहिबजाद्यांनी रक्ताने सिंचलेला हा धर्मवृक्ष वाळू देणं, हा त्यांच्या बलिदानाचा अपमान ठरेल. जागे व्हा, आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगा आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हा!
जयोस्तुते! वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह!
#चारसाहिबजादे #सिखइतिहास #धर्मरक्षण #बलिदान #कथावाचक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा