चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी संभाव्य भारतीय संघ:
"क्रिकेट म्हणजे भावनांचा दरवळ... भारतीय संघ म्हणजे त्या दरवळाला दिलेली एक सुंदर, पण कधीकधी विस्कटलेली परिमळाची वेष्टिका!"
चॅम्पियन्स ट्रॉफी जवळ आली की प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनात हा प्रश्न उठतो – "आपल्या संघात कोण असेल?" भारतीय संघ तयार करणे म्हणजे रणधुमाळीतला डाव... कोणी फलंदाज, कोणी गोलंदाज, तर कोणी अष्टपैलू खेळाडू संघाचा प्रवास ठरवतो.
या संभाव्य संघात आपल्याला यशस्वी जयस्वाल दिसतो. हा तरुण फलंदाज म्हणजे एका झाडाला आलेले कोवळं पण भक्कम पान! डावखुरा असूनही तो डाव्या-उजव्या संघटनेला योग्य तोड देता येतो. त्याच्याबरोबर रोहित शर्मा, जो भारतीय संघाचा अनुभवी खलाशी आहे. रोहितच्या फलंदाजीची शैली म्हणजे "सहज सुंदरतेची" परिभाषा!
त्याच्या जोडीला शुभमन गिल. शुभमन म्हणजे भविष्याचा दीपस्तंभ, ज्याने वेळोवेळी दाखवले आहे की तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. मग, विराट कोहलीच्या उल्लेखाशिवाय भारतीय संघाचा विचार तरी कसा होणार? तो जिथे फलंदाजी करतो, तिथे धावांची कारंजी उडतात. विराटच्या अनुभवाचा फायदा हा संघाला दिशादर्शन करणाऱ्या कंपाससारखा आहे.
मधल्या फळीत के.एल. राहुल (माझे व्यक्तिशः मत नसले तरी त्याच्या नावाची जी जोरदार चर्चा असल्याने लेखात उल्लेख करावा वाटला आहे अन्यथा ह्याला घेवू नये ह्या मतचा मी आहे)
आणि ऋषभ पंत हे संयम आणि ऊर्जा यांचे परिपूर्ण मिश्रण आहेत. राहुलच्या सुसूत्र फलंदाजीने अनेक वेळा संकटातून वाट काढली आहे, तर पंतचा तोरा म्हणजे आपल्या 'माझं ठरलेलं' धोरणाचा जल्लोष! पंतसोबत संजू सॅमसन हा पर्याय आहे, जो टी-20 पासून एकदिवसीय सामन्यांतही आपली चमक दाखवत आला आहे.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये "सुपरमॅन" हार्दिक पंड्या. हार्दिक म्हणजे पाचव्या चेंडूवर षटकार मारून खेळ फिरवण्याची क्षमता असणारा खेळाडू. त्याच्यासोबत अक्षर पटेल आहे, जो फलंदाजीत उपयोगी आणि फिरकी गोलंदाजीत धार आहे. फिरकीच्या दुनियेत कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल हे आपले अनुभवसंपन्न जादूगार आहेत. कुलदीपच्या 'चायनामन' गोलंदाजीने अनेकांना गोंधळात टाकले आहे, तर चहलचा प्रभावी अनुभव संघासाठी मोलाचा आहे.
गोलंदाजीत आपल्या संघाचं तेजतर्रार अस्त्र म्हणजे जसप्रीत बुमराह! त्याच्या यॉर्करने प्रतिस्पर्धी फलंदाजांचे मनोबल तोडलं आहे. त्याला मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग यांची साथ आहे. शमी म्हणजे चेंडूचा जादूगार, तर अर्शदीप तरुण रक्ताचं उदाहरण आहे.
संघात एका नवा चेहरा चर्चेत आहे – हर्षित राणा किंवा वॉशिंग्टन सुंदर. दोघेही आपल्या जागेवर आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात. शिवाय, वरुण चक्रवर्ती या गूढ फिरकीपटूला स्थान मिळेल का, यावरही चर्चेचं वातावरण आहे. नितीश रेड्डीसारख्या अष्टपैलू खेळाडूच्या नावाने देखील विचार सुरू आहे.
शेवटी...
हा संघ फक्त नावांचा संग्रह नाही, तर ती भारतीय क्रिकेटची जाणीव आहे. मैदानावर वाघासारखी झेप घेताना या खेळाडूंनी संघभावनेत एकात्म राहावे, कारण चॅम्पियन्स ट्रॉफी ही फक्त ट्रॉफी नाही, ती भारतीय क्रिकेटचं ग्रीष्मवैभव आहे!
सध्या सतत मिळालेली पराजय आणि विश्वचषक २०२३ मध्ये मिळालेल्या अपयशावर फुंकर मारण्याचे काम ही चॅम्पियन्स ट्रॉफी करणार आहे त्यामुळे संघाची निवड योग्य झाली पाहिजे अन्यथा एक प्रेक्षक म्हणून भळभळती जखम अजून खोल होईल.
तुम्हाला काय वाटते, असाच संघ असेल का? काही बदल असतील, तुमच्या मते कोणाला काढावे कोणाला संघात घ्यायचे यात मतांतर असतील तर ते व्यक्त व्हा. संघाची निवड झाल्यावर ह्या लेखाला संलग्न लेख परत घेवून येईपर्यंत माझा स्वल्पविराम
जयोस्तुते...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा