कामाचे तास 90 तास
कामाचे तास 90 तास
मूर्ती म्हणतो 70 तास काम करा, सुब्रमण्यम म्हणतो 90 तास काम करा महत्वाचे म्हणजे दररोज 8 तास पगार चालू असूनही किमान ऑफिसमध्ये 9 ते 10 घरी आल्यावर फोन लॅपटॉप वर 2 नाहीतर 3 तास काम करणारे आम्ही किमान दरदिवशी 13 तास काम करतोच तरीही पगारवाढीच्या मुलाखतीत आम्ही कसे बेजबाबदार अस मॅनेजमेंट पेटवून देते. तिथे कितीही खटाटोप केला तरी गुणांमध्ये वाढ होईल,पगारवाढ चांगली होईल ह्याची गॅरंटी नसते. भले आम्ही दिवसातील 13 ते 14 तास कंपनीतल्या कामाला देत असेल तरी वरिष्ठ पदाधिकारी लोकांसारखे आमचा पगार नसतो की भत्ते नसतात ना आम्हाला हॉटेल, मॉल मध्ये जावून खरेदी करण्याचे कूपन मिळत ना आम्हाला कंपनीच्या शेयरचा वाटा मिळत, ना आम्हाला वर्षभरात पगारी सुट्टीवर परदेशी फिरायला मिळत. थोडे कंपनीत जायला उशीर झाला तर लेट आलो म्हणून रजिस्टर वर सह्या करायला लागतात जर महिन्यात 3 वेळा लेट आलो तर एक अर्धा दिवसाची रजा भरावी लागते. लवकर घरी जायचे असेल तर साहेबाला सांगा, पास भरा, काम पूर्ण करा किंवा आपल्या सहकाऱ्याला जवाबदारी द्या इतक्या गतिरोधानंतर घरी गेलेच तर मोबाईलवरून घरी आलोच कशाला असा मनस्ताप होतो. हे वरिष्ठ पदाधिकारी कधी येतात कधी जातात त्यांना मात्र सिक्युरिटी कधी विचारत नाही. सगळे नियम सामान्य कामगारांना च. भले तुमची पदे मोठी म्हणजे टेन्शन जास्त असेल पण आमच्या जागी किती टेन्शन असते हे कोण पाहत का? मुळात 2 माणसांना काम संपवणे अवघड जाईल इतका कामाचा व्याप आमच्या डोक्यावर टाकलेला असतो त्यात ते काम बिनचूक करायचे असा अट्टहास मॅनेजमेंटचा असतो. डिपार्टमेंट आणि कंपनीतील माणसाच्या राजकारणात प्रत्येकाचे मन राखत, बॉसच्या शिव्या खात आपली कामे करताना आमची किती तारेवरची कसरत होते हे कोण पाहत का? बरे कंपनीतील राग,टेन्शन घरी घेवून गेल्यावर घरातील टेन्शन, कामे यामुळे नको हे जीवन त्यापेक्षा मेलेले बरे अशी अवस्था मनात येते. आजकाल रस्त्यावर रहदारीचा जो हैदोस असतो ते पाहता कंपनीतून घरी पोहचण्यासाठी तास दोन तास लागतात अश्या वेळी घरी जाण्याचा वेळ म्हणजे कपडे काढून, हात पाय धुवून जेवायला बसायचे थोडा वेळ टिव्ही, मोबाईल आणि तसच बेडवर झोपायचे म्हणजे सामान्य कामगार म्हणून आम्हाला वेळ मिळतो कधी? घरात काही ना काही कामे निघत असतात, मुलाची शाळा, बायकोची शॉपिंग, गरजेची महत्वाची कामे करायला तरी वेळ मिळतो का? आनंदाने, पोटाला चिमटा काढत घेतलेल्या घरात केवळ झोपण्यासाठी जाणारे आम्ही अक्षरशः गाढवापेक्षा अधिक काम करूनही महिन्या काठी फुटकळ पगार हातात येतो. पगार झाल्यावर हा हप्ता तो हप्ता, घर खर्च, मुलाच्या शैक्षणिक खर्च यातून बचत उरते त्यात महिना कसा काढायचा हा यक्ष प्रश्न तोंडाचा आ वासून उभा असतो. आमचे प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम नसतात अस मानणारे कंपनीतील हे बडे अधिकारी बॉस मात्र कंपनीतील प्रॉब्लेम किती मोठे,आम्ही किती चुकीचे हे दरदिवशी पेटवून देत असतात. आम्ही देखील स्वतः च्या प्रगतीसाठी कंपनीची प्रगती करण्यासाठी मरमर काम करतो पण आमची दखल कोणी घेतो का? प्रचंड लोकसंख्या वाढल्याने बाहेर बेरोजगारी असल्याने आमच्यापेक्षा कमी पगारात काम करायला 100 जण उभे असल्याने प्रत्येक गळाचीपीला मगरमिठी मारत बाजीप्रभू देशपांडे सारखी खिंड लढवत असतो. कितीही खिंड लढवली तरी दूर कुठे तोफेचे आवाज झाले तर आपण धारार्थी पडणार हे पक्के असेल तरी दोन्ही हातात तलवार घेत लढाई करत राहावे लागते. नवनवीन कल्पना शोधून कामगारांना कसं कोंडीत पकडायचे, कसे त्याला कामावरून बाद करायचे ह्यासाठी कंपनीत एक गट काम करत असतो. मिडल मॅनेजमेंट मध्ये काम करणारे आमचे अक्षरशः सँडविच होते त्याला जोड घरातील अडचणीमुळे मस्त फोडणी लागते. कधी कधी वाटते की नको हा साहेबी रुबाब, त्या मीटिंग, ते काम त्यापेक्षा मशीनवर काम करणारा कामगार असतो तर बरे झाले असते पण सामान्य कामगाराला पगार 20 हजाराच्या आत,शिवाय कॉन्ट्रॅक्ट बेस काम, 12 तास काम याशिवाय इतर अनेक डोक्यावर असलेले कंपनीतील जवाबदारी पाहता आपण किती सुखी मानत इच्छा नसली तरी दररोज हसतमुखाने कंपनीत कामाला जाणारे आम्ही,तरीही ही लोक खुश होत नसतील तर आता कंपनीत रहायला जावे का असा प्रश्न मनात डोकावतो. साधं काही समारंभ, लग्न, फिरायला जायला मिळत नाही, घरातील मुलाशी, बायको,आई बापाशी बोलायला वेळ मिळत नाही पण कामगारांनी आठवडा 90 तास काम केले पाहिजे असे मत मांडणारे हे आधुनिक जगाचे सर्वेसर्वा स्वतःची आणि आमची तुलना केवळ कामाच्या तास यावरूनच करणार का? कामगार म्हणून आमच्याशी कसे वागले जाते हे कधी पाहणार. सगळच कामगाराच्या बाजूने पही नका पण आपण नक्की बोलतोय काय, वस्तुस्थिती काय हे तर पहा.कामगार म्हणून आम्हाला योग्य तो न्याय, सन्मान आणि विश्वास मिळायला हवा. फक्त वेळेच्या आणि कामाच्या आधारावर तुलना न करता, कामगारांशी कसे वागावे याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. आजची परिस्थिती बदलली नाही तर कधीतरी सगळं मोडून पडेल, आणि तेव्हा बदलाचा विचार करायला वेळ उरलेलाच नसेल.कामगार फक्त एक साधन नाही, ते कंपनीचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांना त्यांचा योग्य तो सन्मान मिळायलाच हवा.
मी काहीही मत व्यक्त केल्याने माझ्या किंवा तुमच्या आयुष्यात काही फरक पडेल याची सुतराम शक्यता नाही पण सोशल मीडियावर मनातील भडास काढून तोडासे मन मोकळे केले आहे. प्रत्येक कामाला जाणारा माणूस वर उल्लेख केलेल्या अडचणींना सामोरे जात असणार यात शंका नसली तरी "आलीय भोगासी, भोगले पाहिजे" तत्त्वावर जीवन जगत राहणे क्रमप्राप्त आहे. तसही समर्थ रामदास स्वामी म्हणून गेले आहेतच की
जनीं सर्वसूखी असा कोण आहे।विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥मना मानसीं दु:ख आणूं नको रे।मना सर्वथा शोक चिंता नको रे॥विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी॥१२॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा